You are currently viewing तडजोड

तडजोड

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख

तडजोड या शब्दावर एक भार आहे.
अदृष्य अशी नकारात्मकताही आहे.एक
रेटा आहे.विरोधी धार आहे.कुठेतरी मनावर झालेला आघातही असू शकतो.
नाईलाजाने केलेली ती अनैसर्गिक क्रियाही असू शकते.तडजोड या शब्दात
एक छुपी स्वीकृती जरी असली तरी त्या स्वीकृतीत प्रत्येकवेळी समाधान
असेलच असे नाही.कधी कधी ती असहायता किंवा शरणागतीची कृती
असू शकते आणि ती एकतर्फीही असू शकते.
मूळातच तडजोड ही आपोआप ,सहज
होणारी बाब नाही.तडजोड करावी लागते.मग त्यामागची पार्श्वभूमी, कारणे
विवीध असू शकतात.
एक मात्र खरं की ,अगदी जाणत्या वयापासून आपण ऐकत आलेलो आहोत,’जीवनात तडजोड ही करावीच
लागते.कधीतरी दोन पावले मागे घ्यावी
लागतात.’
तडजोड करणारी व्यक्ती ही नम्र
समंजस,दुसर्‍याचा विचार करणारी अशी
धीरगंभीर ,निस्वार्थी समजली जाते.
याउलट तडजोड न करणारी व्यक्ती
दुराग्रही,हट्टी,अहंकारी ,कुणाचीही पर्वा नसणारी ,आत्ममग्न, कठीण वाटू शकते.
विशेषत: स्त्री म्हणून वाढत असताना,
‘अग! संसारात सुख ,समाधान, गोडी टिकवायची असेल तर बाईला ,मनाला मुरड घालून तडजोड ही करावीच लागते.’
बाई आणि तडजोड यांची सदैव एकच म्यान.
आणि हा अभ्यासक्रम प्रत्येक इयत्तेत
सोबत राहिला.
विशेषत: विवाह जमवताना तर,’अग!असे स्थळ शोधूनही सापडणार नाही.
आणि जोडीदाराच्या तुझ्या कल्पनांशी
थोडीफार तरी तडजोड ही तुला नको का
करायला?’
मुलीच्या/मुलाच्या लग्नासाठी घरातली मोठी माणसे आजकाल इतकी त्रस्त झालेली असतात ,की हे सारं अपरिहार्य
पणे ऐकू येतं.
तडजोडी या अनेक प्रकारच्या असतात.
कौटुंबिक,सामाजिक,राजकीय.सोयीस्कर राजकीय तडजोडीं विषयी आपण न
बोललेलच बरं!कारण तो एक संपूर्ण वेगळ्या लेखाचा विषय आहे.आपण
कौटुंबिक आणि पर्यायाने सामाजिक
तडजोडींविषयी भाष्य करूया.
ऐका हे संवाद..
‘माझं लग्न झालं आणि माझ्यातल्या या कलेला पेटीतच ठेवून दिले.सांसारिक
जबाबदार्‍यांनाच अधिक प्राधान्य दिले.’

‘मी माझ्या वृद्ध आई वडिलांना सोडून
पर प्रांतात नोकरीसाठी नाही जाऊ शकलो.त्यासाठी मला मिळालेली बढती
नाकारावी लागली.’
‘मला मेडीकलला जायचे होते,पण आमची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नव्हती.’
‘त्याची करीअर ,प्रगती महत्वाची होती.
म्हणून मी मुलांसाठी राजीनामा दिला.’
‘माझा नाही विश्वास या रितीभातींवर
पण सासुबाई खूष होतात ना म्हणून
करते.’
अशाप्रकारचे संवाद सर्वसाधारणपणे
सर्वत्र ऐकायला मिळतात,आणि याला
जीवन ऐसे नाव या सदरात ते चपखल बसतात.शिवाय या तडजोडी त्यामानाने सौम्य भासतात.यात एक आशावादी
प्रतिक्षाही जाणवते.
जेव्हां ‘मीच कां?’ असा प्रश्न एखाद्या
संथ पाण्यात दगड टाकल्यासारखा पडतो तेव्हां कलह निर्माण होतात.घड्या
विस्कटायला लागतात,जुळलेले सूर बेसूर व्हायला लागतात.आणि त्यातून ती स्त्री असेल तर समाजाचा अंगुलीनिर्देश ,तिच्याकडेच प्रामुख्याने असतो.
छोट्या मोठ्या तडजोडींविषयी माझी
मुळीच तक्रार नाही.त्या स्वाभाविक
आहेत.
तडजोड म्हणजे माघार.तडजोड म्हणजे एक प्रकारचा तह.मनाशी केलेला.परिस्थितीशी केलेला,
समाजातल्या नियमांशी केलेला.रितींशी
केलेला.पण या माघारीत प्रत्येक वेळी
हारच असते असे नाही.कौटुंबिक,
सामाजिक अराजकता माजू नये म्हणून
केलेली ती एक शांतताप्रिय, समंजस कृती असू शकते.
मात्र जिथे अन्याय,अत्याचार असेल,
जिथे तत्वांची गळचेपी होत असेल,जिथे
नितीमत्ता पणाला लागत असेल ,जिथे
प्राथमिक मूल्यांची पायमल्ली होत असेल तिथे तडजोडीचे धोरण हे घातक
आहे.
‘मला पटत नाहीच.पण काय करणार?
आजकाल जगात हेच चाललंय् .’
अशी विचारांशी केलेली तडजोड ही
धोकादायक आहे.ती सारी समाजव्य
वस्था उलथवून टाकते.आणि आज व्यवस्थेची हीच विदारक लक्तरे आपण पहात आहोत ही अत्यंत खेदाची बाब आहे.
विंदांची एक कविता आहे.
।डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
।हे शीड तोडले की अनुकुल सर्व तारे।।
।मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
।विझले तिथेच सारे ते मागचे इशारे।।
लोक काय म्हणतील,समाज काय म्हणेल,ही भिती बाळगून जगणार्‍यांना
कवी परंपरेचे दास मानतात.गतानुगतिक
माणसे त्यांना डरपोक वाटतात.फुंकर
मारत जगणारा बलवान नसतो.
नशीबाचा नकाशा फाडणारा निग्रही ,
घट्ट मनोधारणेचा असतो.
तेव्हां तडजोड करणं अथवा तडजोड न
करणं यात भिन्न मानसिकतेचे प्रवाह
दडलेले असतात.
काय चांगलं काय वाईट,चूक
बरोबर हे ठरवणं मात्र काळाच्या हातात
रहातं.

राधिका भांडारकर पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =