You are currently viewing ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गने केला रक्तदात्यांचा यथोचित सन्मान

ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गने केला रक्तदात्यांचा यथोचित सन्मान

*ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गने केला रक्तदात्यांचा यथोचित सन्मान*

सावंतवाडी:

ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गने संस्थेचे नियमित रक्तदाते ज्यांनी गेल्या वर्षभरात रुग्णसेवेचा वसा घेऊन “रक्तदान महापुण्यदान” हे ब्रीद अंगिकारून वेळोवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध रुग्णालयांसह गोवा बांबुळी आदी रुग्णालयांमध्ये दिवसा रात्री केव्हाही जाऊन रक्तदान केले अशा रक्तवीरांचा संस्थेने यथोचित सन्मान केला आणि रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी प्रेरणा दिली. हा सन्मान सोहळा आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस उपअधीक्षक तथा संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक कमलाकर धुरी, सामाजिक कार्यकर्ते श्री गुरू नार्वेकर, आरपीडी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, लायन्स अध्यक्ष अमेय पई, रोटरी अध्यक्ष ॲड.सिद्धार्थ भांबुरे, संस्थेच्या उपाध्यक्षा मीनल सावंत, कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, सचिव बाबली गवंडे, कार्यकारिणी सदस्य तथा पर्यटन संस्थेचे जितू पंडित, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी प्रास्ताविक करताना संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर यांनी संस्थेच्या सुरुवातीपासून कार्याचा आढावा घेतला आणि सदरचा सन्मान सोहळा आयोजित करण्या मागील उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिलाग्रीज हायस्कूलच्या माजी पर्यवेक्षक मेघना राऊळ, आरपीडी हायस्कूल मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, अमेय पई, ॲड.सिद्धार्थ भांबुरे, ७७ वेळा रक्तदान करणारे सुधीर पराडकर, कोमसाप अध्यक्ष तथा संस्थेचे निमंत्रित सदस्य कवी दीपक पटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून रक्तदात्यांचे व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. माजी मुख्याध्यापक कमलाकर धुरी यांनी रक्तदात्यांचा आहार आणि शारीरिक तंदुरुस्ती याबाबत मार्गदर्शन केले. संस्था सचिव बाबली गवंडे यांनी देखील मनोगत व्यक्त करून अलीकडेच गया येथे संस्थेला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबाबत माहिती दिली, त्याचप्रमाणे मित्र संस्थांच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त करून मित्रसंस्थानी अशीच सदैव साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे नियमित रक्तदाते रक्तदान करून रुग्णांचा प्राण वाचवतात, रक्तदाते करत असलेल्या अमूल्य कार्यामुळेच संस्था मोठी होते, नावलौकिक प्राप्त होतो असे कौतुक करून गेल्यावर्षी ९० रक्तदात्यांचा सामूहिक विमा उतरवला तसाच यावर्षी देखील आणखी ५०/६० नवीन रक्तदात्यांचा सामूहिक विमा उतरवणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी रक्तदान चळवळीत सहकार्य करणाऱ्या गावागावातील मित्रसंस्थांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून मान्यवरांच्या मनोगतादरम्यान वर्षातून चारवेळा, तीनवेळा, दोनवेळा असे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा अमेय पई पुरस्कृत ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या नावाची टी शर्ट देऊन तसेच ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून भेटवस्तू स्वरुपात ड्रायफ्रुट देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी यावर्षी रक्तदान चळवळीत मित्रसंस्था म्हणून साथ देणाऱ्या २५ मित्रसंस्थांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे वेळोवेळी संस्थेच्या समूहावर रक्तदान विषयी पोष्ट येताच तत्परतेने विविध रुग्णालयांत जाऊन रक्तदान करणाऱ्या १२० हून अधिक रक्तदात्यांचा तसेच ३० हून अधिक महिला रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रक्तदाते सन्मान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश रेमुळकर व बाबली गवंडे यांनी केले. या दरम्यान रक्तदात्यांच्या वतीने महावितरण मधून निवृत्त झालेल्या श्री दिनेश पवार यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे आजीव सभासद तथा कासार्डे कॉलेजचे प्राध्यापक रामचंद्र राऊळ यांनी केले तर आभार संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे यांनी मानले. यावेळी संस्थेचे खजिनदार सिद्धार्थ पराडकर, कार्यकारिणी सदस्य नाना राऊळ, सचिन कोंडये, मंगेश माणगावकर, श्रीया माणगावकर, मृणाली गवंडे, अपर्णा भाईप, आबा सुकी, गुंडू साटेलकर, राम वाडकर, बाळकृष्ण राणे, जयवंत गवस, सुंदरवाडी ग्रुपचे सदस्य, शरद शेटकर सत्कारमूर्ती रक्तदाते, संस्थेचे सदस्य, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा