You are currently viewing वारस (भाग १३)

वारस (भाग १३)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री- आसावरी इंगळे, (जामनगर) लिखित अप्रतिम कथा*

*वारस (भाग १३)*

आता मिळेल..मग सापडेल..करता करता अख्खा दिवस उलटला. दोन दिवस गेले.. जुईचा पत्ता नव्हता. “कशाला शोधायचं नाटक करतो राघो..? तुला नकोच होती जुई.. तूच मारलं असशील तिला..”, कामिनीने जळजळीत नजरेने राघोकडे पाहिले. आज प्रथमच कामिनीची नजर राघोच्या आरपार गेली होती. त्याला प्रथमच अपराधी वाटलं!

जुई हरवल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळीच फोन वाजला. राघोच्या गोदामाला शॉर्ट सर्किटने आग लागली होती. आग लगेचच आटोक्यात आली होती. त्या धक्क्यातून सावरत नाही तोच धान्य वाहून नेणाऱ्या ट्रकला हलका अपघात झाला होता. थोडंफार धान्य वाया गेलं तरी ट्रक आणि चालक सुरक्षित होता..हीच काय ती समाधानाची बाब होती. लागोपाठच्या या घटनांत राघोचे तसे फार नुकसान झाले नसले तरी त्याच्या मनात नकळत शंकेची पाल चुकचुकली. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं होतं. शालूचे दिवस भरत आले होते…घराण्याचा वारस तिच्या उदरात वाढतोय.. काही विपरीत व्हायला नको! नंतरचे १-२ दिवस राघो कुठे गेला नाही. नंतर मात्र त्याला बाहेर जावंच लागणार होतं. नोकरांना शालूकडे लक्ष द्यायच्या सूचना करून तो गेला. खरंतर त्याला कामिनीलाही सूचना कराव्याशा वाटत होत्या पण त्याची हिम्मत झाली नव्हती. तो थोड्याच अंतरावर गेला असेल तोच घरातील नोकराचा फोन आला. शालूचा पाय घसरला होता. ती पडता पडता वाचली होती! ..राघोने तशीच गाडी वळवली. काहीतरी अघटीत घडत होतं..चार पाच दिवसांपासून..जुई हरवल्यापासून…

“निरागस कन्येला देवीचे रूप मानतो आपण. कशाला देवीला नाराज करायचे? उगीच शाप वगैरे लागला तर..” ..त्याच्या डोक्यात शालूचे वाक्य घुटमळत राहिले. राहून राहून जुईचा कोवळा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला.. सुशिक्षित असूनही आपण असं वागलोच कसं? त्याला पश्चाताप होऊ लागला.. तो घरी आला तेव्हा घरी सन्नाटा होता. त्याला ती शांतता भयाण वाटली. तो धावतच शालूच्या खोलीत गेला. तिला नुकतीच झोप लागली होती. तिच्या बाजूला तिच्या डोक्यावर एक हात ठेऊन कामिनी खुर्चीतच झोपी गेली होती. कामिनीकडे पाहून त्याला कसंकसं वाटलं. किती कृश झाली होती ती..डोळ्याखाली मोठ्ठी वर्तुळं, भकास चेहरा.. कधीकाळी ही सौंदर्याची मूर्ती होती असं सांगूनही कुणाला खरं वाटलं नसतं! काय केलं हे आपण?.. कशाकरीता? मुलाच्या हव्यासाकरीता? त्याला स्वतःची लाज वाटली! इतरांना अंधश्रद्धेविरोधात ब्रह्मज्ञान पाजळणारा राघो स्वतः कोरडा पाषाण उरला होता! तो कामिनीकडे पाहत असतानाच तिला जाग आली. तिचे लक्ष दाराकडे गेलं. दारात राघो उभा होता. तिच्या नजरेला नजर द्यायची हिंमत त्याच्याकडे नव्हती. तो वळणार इतक्यात शालूलाही जाग आली.

“राघो..”, तिने क्षीण आवाजात राघोला बोलावले. राघो खोलीत आला तसा कामिनी उठून चालली गेली.

“सगळं कसं विचित्र होतंय रे..मला वाटते, गुरुजींना बोलावून घे..त्यांनाच काही उपाय विचारू या..” शालू अगदी त्याच्या मनातील बोलली होती. त्याने वेळ न दवडता गुरुजींना बोलावून घेतले.
(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − five =