You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हयात २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद

सिंधुदुर्ग जिल्हयात २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद

सिंधुदुर्ग जिल्हयात २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद

ऑनलाईन औषध विक्री व कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणांविरोधात आंदोलन

कणकवली

अखिल भारतीय औषध विक्री संघटना ( AIOCD) यांच्या देशव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्हयातील औषध विक्रेत्यांनी दि. २० मे २०२६ रोजी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांची वाढती मक्तेदारी आणि औषध व्यवसायातील वाढती असमतोल स्पर्धा याविरोधात हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती जिल्हयातील औषध विक्रेता संघटनांकडून देण्यात आली.
औषध व्यवसाय हा Drug and Cosmetics Act 1940 व Rule 1945 अंतर्गत चालवला जात असून ऑनलाईन औषध विक्रीबाबत स्पष्ट कायदेशीर तरतूद नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने इंटरनेटद्वारे औषध विक्रीसंदर्भात GSR 817 (E) अधिसूचना जाहीर केली होती, मात्र ती अद्याप कायद्दयात रूपांतरित झालेली नाही. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केलेला आहे.
कोरोना काळात होम डिलिव्हरीसाठी देण्यात आलेल्या विशेष सवलतींचा गैरवापर करून काही ऑनलाईन कंपन्या मोठया प्रमाणात औषध विक्री करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Drug Price Control Order ( DPCO) 2013 अंतर्गत औषधांवरील नफा मर्यादित करण्यात आला असताना कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठया प्रमाणात सवलती देऊन बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे छोटया औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व मेडिकल दुकाने या बंदामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले असून नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा अगोदर करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपात्कालीन सेवा व अत्यावश्यक औषध पुरवठा सुरू ठेवण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा