११ हजार देवगड हापूसांनी दरवळले कुणकेश्वर मंदिर
दक्षिण कोकणच्या काशीत रंगला आंबा महोत्सव; भक्तिमय वातावरणात आकर्षक आंबा आरास
देवगड :
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसर तब्बल ११ हजार देवगड हापूस आंब्यांच्या सुगंधाने दरवळून गेला होता. श्रींच्या चरणी ११ हजार आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आल्याने भाविकांसाठी हा महोत्सव विशेष आकर्षणाचा ठरला.
श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात मंदिरातील शिवलिंगाभोवती तसेच गाभाऱ्यात देवगड हापूस आंब्यांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. बाहेरील नंदीगाभाऱ्यातही आकर्षक आंबा आरास करण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसर भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता. आंब्यांचा दरवळणारा सुगंध आणि भक्तिमय वातावरणामुळे भाविकांचे मन प्रसन्न झाले.
तरुणांच्या मेहनतीने खुलला महोत्सव
यंदाची आकर्षक आंबा आरास आणि विविध कलाकृती साकारण्यासाठी अनिकेत पेडणेकर, संकेत चव्हाण, आदित्य पेडणेकर, दर्शन सुतार, स्वप्नील सुतार, प्रदीप मुणगेकर आणि शुभम पेडणेकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या कल्पकतेमुळे यंदाचा आंबा महोत्सव अधिक देखणा आणि संस्मरणीय ठरला.
११ वर्षांची परंपरा जपणारा महोत्सव
दरवर्षी ११ मे रोजी साजरा होणाऱ्या या आंबा महोत्सवाला यंदा ११ वे वर्ष पूर्ण झाले. सुरुवातीला मिठमुंबरी-कुणकेश्वर येथील एका आंबा बागायतदाराने आपल्या बागेतील हापूस आंबे मंदिरात अर्पण करण्याची परंपरा सुरू केली होती. त्यातून पुढे या महोत्सवाची संकल्पना आकाराला आली. आज ही परंपरा संपूर्ण देवगड तालुक्यातील पंचक्रोशीतील आंबा बागायतदारांच्या श्रद्धेचा भाग बनली आहे.
नैसर्गिक संकटांनंतरही भाविकांची श्रद्धा कायम
यंदा ऋतुचक्रातील बदल आणि नैसर्गिक संकटांमुळे आंबा उत्पादन घटले असले, तरी श्री देव कुणकेश्वरांच्या कृपेने मिळालेल्या उत्पन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अनेक आंबा बागायतदारांनी स्वखुशीने देवगड हापूसच्या पेट्या महोत्सवासाठी अर्पण केल्या. त्यामुळे या महोत्सवाला अधिक भावनिक आणि व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व आंबा बागायतदार, भाविक आणि कुणकेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आभार मानले.
