You are currently viewing विंदा..

विंदा..

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांचा विंदांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने लिहिलेला अप्रतिम लेख

१४मार्च .विंदांचा स्मृतीदिन.त्यानिमीत्ताने
त्यांच्या साहित्य सेवेचा मागोवा..
गोविंद विनायक करंदीकर हे त्यांचे जन्मनांव.मात्र साहित्यक्षेत्रात त्यांची ओळख
विंदा करंदीकर या टोपण नावानेच आहे.
अतिशय साध्या पद्धतीची जीवनशैली जगणारे विंदा साहित्यक्षेत्रात मात्र अतिशय उंच स्तरावर होते.
मराठी साहित्यक्षेत्रात,विंदांनी कवितांच्या माध्यमातून आपल्या विचारांचा ठसा जनमानसावर उमटवला.त्यांनी अनेक
कविता प्रकार हाताळले.बालकविता,विरुपिका,छंदोबद्ध काव्य,मुक्तछंद हे त्यांनी हाताळलेले प्रमुख
काव्यप्रकार.त्याशिवाय त्यांनी लघुनाबंधही लिहिले.
किंग लीयर ही शेक्सपीयरची अनुवादित केलेली त्यांची नाट्यकृती रंगभूमीवर प्रचंड गाजली.
१९४९ साली स्वेदगंगा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि तिथूनच
त्यांच्या कारकिर्दीची सुरवात झाली.

*स्वेदाची ही अखंड गंगा*
*धापा टाकीत वाहत आहे*
*अनंतातुनी अनंताकडे*
*खडकावरती हाणित डोके,*
*कडेकपारी फोडत सार्‍या*
*दरीदरीतून मारी भरार्‍या…*
लुप्त झालेली तिसरी गंगा कोणती? तर ही…
स्वेदगंगा!अपरंपार कष्ट करणार्‍यांच्या घामाची गंगा .या कवितेत त्यांनी मोलमजुरी
करणार्‍यांना गंगेची पवित्र उपमा देऊन त्यांनी या कवितेत त्यांचा गौरव केला.
अनेक वेगवेगळे सामाजिक घटक आणि विषय त्यांनी कवितांच्या माध्यमातून प्रखरपणे मांडले.समाजातील निंद्य प्रकारांवर त्यांनी थेट बोट ठेवले.त्यांच्या कविता वाचताना त्यांचे गडगडाटी विचार वाचकांच्या मनावर अक्षरश:आदळतात.
जीवनाकडे बघण्याची निराळी दृष्टीही देतात.
*अंधाराच्या मस्तीवरती रक्ताचीगुळणी थुंकून*
*तू मातीच्या कुशीत शिरलास,*
*ती माती तुला विसरणार नाही*
*अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे*
*ह्या शेवटच्या दगडाचाआधार घेऊन*
*एक बुरुज अजून दात विचकीत राहील*
*तुझ्या अभावाजवळ मी अजुन ऊभा आहे*
*अंधार आणि अधिक अंधार*
*यांच्यामधील रित्या रेताडात डावा पाय रोवून*
*मी अजुन ऊभा आहे….*.
*पण हे श्रेय तुझेच आहे….*
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बळी पडलेल्या
सर्वसामान्य माणसाला उद्देशून लिहिलेली ही कविता आहे.सामान्य माणसांविषयी त्यांना अत्यंत कळवळा होता.
विंदांच्या बालगीतात विक्षिप्त कल्पनाविलास.गंमतीदार शब्दयोजना,निखळ मौज आणि दडलेले संदेश आढळतात.
*पर्‍या होतात*
*शेवटी लट्ठ*
*असे म्हणाला*
*एक मट्ठ*
*पर्‍यांनी दिला*
*त्याला शाप*
*पुढच्या जन्मी*
*झाला साप..*.
त्यांची बालगीतं वाचताना मुलंच काय थोरही खळखळून असतात.करमणुकीच्या या आनंददायी माध्यामातून मुलांना त्यांनी
संस्कारक्षमही केले.वरील बालकवितेतून
ते सहजपणे सांगतात,”करु नये टिंगल टवाळी…”
मराठी भाषा अग्रगण्य व्हावी व समाजाला
मराठी भाषेची गोडी समजावी म्हणून त्यांनी
स्वत:च्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून अनेक
प्रयोग केले.त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचं बीज त्यांनी समाजाच्या मनामधे रुजवलं.
वसंत बापट,मंगेशपाडगांवकर आणि विंदा
करंदीकर या त्रयींचे काव्यवाचन कार्यक्रम
सर्वत्र,परदेशातही प्रचंड गाजले.
मानवाचे अंती गोत्र एक,सर्वस्व तुला वाहुनी,
माझ्या घरी मी पाहुणी ,या त्यांच्या भावगीतांमुळे ते महाराष्ट्रातील घराघरात
पोहचले.
राष्ट्रीय कवी कबीर पुरस्कार,कालीदास पुरस्कार आणि असेच अनेक गौरवशाली पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.खूप मोठी जंत्री आहे ती.
मात्र त्यांच्या छंदोबद्ध काव्यरुप असलेल्या अष्टदर्शने या त्यांच्या साहित्यकृतीस,२००३
साली साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा
ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना देण्यात आला..
अयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत राहतात.जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी मिळत नाहीत.डगमगलेले मन उदास होते.औदासिन्य येते.जगणे परावलंबी होते.
रुक्ष ,शुष्क होते.अशा अवस्थेत जीवनाला वळण देणारी विंदांची कविता जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलवतात.
*उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली* *आयाळ घ्यावी*
*भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी*
*देणार्‍याने देत जावे,घेणार्‍याने घेत जावे*
*घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे…*
खरोखरच या अनमोल साहित्य निर्मीती आणि निर्मात्याविषयी लिहीण्यास माझी लेखणी तोकडी आहे.एक महान अथांग विचारधनअर्णव आहे हा…त्याच्या गर्भात अनंत शब्द माणिक मोत्यांचे भांडार आहे..

आज विंदाचा स्मृतीदिन!
त्यांच्या साहित्यदानाची मी प्रातिनिधीक
स्वरुपात ऋणी आहे…

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =