You are currently viewing माझी माय मराठी

माझी माय मराठी

प्रा दिलीप सुतार, कुरुंदवाड यांनी मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

अ आ इ ई….
क का कि की…गिरवित…
बाराखडी अन्अंकलिपीच्या
मूळाक्षरातून…
पाटीवरच्या धुळाक्षरातून…
अंगण-आणि बालवाडीच्या
वयात अल्लड…
बोटधरूनी ममतेने
अक्षरओळख करविते
*माझी माय मराठी…!*

भल्या पहाटे… सोनसकाळी
होऊन लकेर ती वासुदेवाची…
अथवा गाऊन छान भूपाळी
बनून माध्यम
दूर -चित्र…अथवा आकाशवाणीचे…
गावा सोबत नित्य मलाही
जागविण्या रोजचं…येते
*माझी माय मराठी…!*

वयात शब्द भेटण्याच्या
लिलया घेऊन जाते मुशाफिरीला
मुलुखात
कथा कादंबरी कवितांच्या
आणि दरबारी…
कवि-साहित्य संमेलनांच्या
दिग्गजां सोबत
नवोदित साहित्यिकांच्या भेटीला…
अन् लावते छंद चौफेर वाचनाचा
संदर्भ देऊनी आपल्याच
भाषा भगिनींचे…
व्यासंगी मनाला बनवत जाते…
*माझी माय मराठी…!*

होऊनी लावणी शृंगार बैठकीची
नाचविते ठेक्यात रसिकाना…
तालावर ढोलकी अन् घुंगरांच्या…
रंगविते कलगीतुराही सवाल जवाबांचा ती
मंचावर लोकनाट्य तमाशाच्या…
घेऊनी साथ पेटी सारंगी तबल्याची…
कैफाने शेर शायरीच्या
बुडविते प्रेमी युगुलाना ती
गर्तेत खोल विरहाच्या…
जादुयी स्पर्शाने
रदीफ…काफिया …अलामतीच्या
दर्शविते शब्द सामर्थ्य गझलेचे
*माझी माय मराठी…!*

बनूनी थाप डफावरची…
साद बुलंद शाहिरी आवाजाची…
देते निमंत्रण तरूणाईला
दुर्गम दुर्ग ,गड कोट भ्रमंतीची…
कडेकपारीतून कणखर सह्याद्रीच्या
करविते ओळख…
छत्रपती शिवरायांच्या
अनोख्या गनिमीकाव्याची…
अन् जागविते मनांमनात
भावना जाज्वल्य देशभक्ती ची…
*माझी माय मराठी…!*

उघडूनी गाथा संत तुकयाची…
गाऊनी गौळणी,अभंग ,भारूडे
एकनाथ नामदेव …चोखा मेळ्याची
गोरा कुंभार..सावता माळ्याची…
घेऊनी साथ टाळ चिपळ्या मृंदगाची…
अन् भगवी पताका खांद्यावरी
होऊनी वारकरी..
युगे अठ्ठावीस ती चालते वाट
देहू…आळंदी…पंढरीची…
सांगत विश्वाला
महती विठू नामाची…
*माझी माय मराठी…!*

होऊनी संत कान्होपात्रा मुक्ताई…जनाई…सखू…
सोयरा आणि..बहिणाबाई
गात बसते ओव्या …
घालते नव नवीन उखाणे
दाखविते वाट …बुरसटल्या मनाना…
समाज परिवर्तनाची
सहज सोपी…
व्यवहारी ….संसारी…
दळत दळण ते जात्यावरी…
होऊनी लिन विठ्ठल चरणी
सांगते सहज किती
स्त्री जन्माची कहानी…
*माझी माय मराठी…!*

प्रकाशता मनी ‘आर्त विश्वाचे’
समजूनी रहस्य मानवी जीवनाचे
झाल्याने दीव्य आत्मज्ञान अद्वैताचे…
होऊनी ‘माऊली विश्वाची’
नित्य मागते ‘पसायदान’
जगत् कल्याणाचे …
*माझी माय मराठी…!*

प्रा.दिलीप सुतार
कुरूंदवाड
मो.नं 9552916501

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + ten =