You are currently viewing रमेश देव ..एक कसदार अभिनेते
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

रमेश देव ..एक कसदार अभिनेते

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या श्रीम.राधिका भांडारकर यांनी दिवंगत चित्रपट अभिनेते रमेश देव यांच्यावर लिहिलेला अप्रतिम लेख

उमदं आणि सांस्कृतिक व्यक्तीमत्व..अत्यंत मनमोकळा,
चैतन्यमय,राजबिंडा कलाकार…मराठी चित्रपट सृष्टीतील कोहिनूरच…गेली अनेक दशके त्यांनी
रसिकांच्या मनावर राज्य केले…
केवळ मराठी चित्रपट सृष्टीच नव्हे तर बाॅलीवुडमधेही त्यांनी त्यांच्या वास्तववादी अभिनयाचा ठसा उमटवला.
आंधळा मागतो एक डोळा हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट!आणि आरती हा त्यांचा बाॅलीवुडमधला पहिला चित्रपट.
हिंदी ,मराठी, मिळून जवळ जवळ त्यांनी दोनशे ऐंशी चित्रपटात काम केले…
नाटक,चित्रपट,टेलीव्हीजन या तिन्ही माध्यमातून त्यांनी काम केले.जाहिरातपट, लघुपट, दूरचित्रवाणीपट आणि फीचर फिल्मचे दिग्दर्शनही त्यांनी केले…
आनंद ,या हिंदी चित्रपटात,राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन बरोबरची त्यांची भूमिका
ऊल्लेखनीय ठरली.
वास्तविक रुपाने ते राजबिंडे.परंतु नायकांच्याच भूमिकांबरोबर त्यांनी खलनायकाच्याही भूमिका
जबरदस्त वठवल्या.
सुवासिनी,वरदक्षिणा,पाठलाग,अपराध,जगाच्या पाठीवर असे एकाहून एक ,त्यांचे चित्रपट तुफान गाजले..आजही ते आमच्या पीढीला
आवडतात.आठवतात.गुंतवतात…
वरदक्षिणा चित्रपटातील..एकवार पंखावरती
फिरो तुझा हात…शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात…हे गाणे आणि रमेश देव यांचा अभिनय कधीही विसरु शकणार नाही…मनोरंजनाच्या या क्षेत्रात या कसदार कलाकाराने रसिकांना भरभरून दिले…
सीमा आणि रमेशदेव ही त्याकाळची एकदम हिट
जोडी…आलिया भोगासी या चित्रपटाच्या वेळी सीमा रमेश देव यांच्यात प्रेमांकुर उगवला.त्यांनी
लग्न केले आणि आजपर्यंत त्यांची चित्रपट आणि प्रत्यक्ष जीवनातील केमीस्ट्री जुळूनच राहिली.
त्यांचा जन्म जरी कोल्हापूरचा असला तरी मूळचे ते राजस्थानचे. त्यांचे मूळ नाव ठाकूर.
त्यांंचे वडील राजर्षी शाहु महाराज ,यांच्या दरबारी न्यायालयीन काम बघत. एकदिवस शाहु महाराज त्यांना म्हणाले ,”तुम्ही तर देव आहात…”आणि तेव्हांपासून ते ठाकूरचे देव झाले..
रमेश देव यांनी “गेले ते दिन”असा सूर कधीही छेडला नाही…नवनवीन कलावंतांमधे ते
रमायचे.ते हिंदी चित्रपट सृष्टीच्या जगात गेले आणि यशस्वी झाले.
वास्तविक लहान वयातच त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली.एकदा त्यांच्या वडीलांनी त्यांना पृथ्वीराज कपूर यांच्या सेटवर नेले.शूटींग चालू होतं.एका बालकलाकाराच्या अभिनयाने त्यांचे समाधान होत नव्हते.त्यांनी सहज लहानग्या रमेशला म्हटले”,तू करतोस कां हे काम..बघ तुला जमतंय् का?…”आणि त्याने ते उत्कृष्टपणे बजावले..वास्तविक सिनेमा क्षेत्रातले हे त्यांचे पहिले पाउल…!!
अनेक राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा गौरव झाला,
राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला.
पुणे अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना
लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्कार दिला होता..
नुकताच त्यांनी त्यांचा ९३वा वाढदिवस साजरा केला ..तेव्हां ते अत्यंत उत्साहाने म्हणाले होते..
मी शंभरी पूरी करणारच…!!
पण पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…
आज एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला…
३०जानेवारी १९२९ ते ०२/०२/२०२२ हा त्यांचा
जीवनकाल…
संपूर्ण आयुष्य त्यांनी अभिनय कलेला वाहून घेतलं..एक गौरवशाली व्यक्तीमत्व काळाच्या
प्रवाहात विलीन झालं..
या उत्तुंग मराठी अभिनेत्याला सकल रसिकांतर्फे मानाचा मुजरा….

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 5 =