*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट:१९*
*अमवाश्येची लिंबू-मिर्ची*
काकल्याने येता येताच मला विचारले,”तुझी गाडी धुव्ची हा काय? धुतय मरे.” काकल्या एक विचारतो, तेव्हा त्याला दुसरेच काही तरी विचारायचं असतं.
” का रे?” मी प्रतिप्रश्न केला, तर म्हणाला,”नाय, आज अमवाशा हा मां, हुनान इचारतंय.”
“नको .मी घेतो धुऊन. ”
“मगे, लिंबू मिरची बांधतलंस मां?” काकल्या मुद्द्यावर आला. इथले तसे बरेच जण अमावास्येला गाडी धुऊन त्याला लिंबू आणि मिरची गाडीच्या पुढच्या बाजूला बांधतात. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण काकल्याच्या डोक्यात नेहमी वेगळंच काहीतरी तर्कट असतं. तो मला म्हणाला, “गाडयेक लिंबू आणि मिरची बानूकच होयी काय?” माझ्याकडे तसे काही उत्तर नव्हते, म्हणून मी गप्प बसलो.
” तसा न्हय, ह्या खयच्या शास्त्रात सांगलासा? खुयच्या ग्रंथात लिवलाहा, ता तरी सांग माका.”काकल्याने मुद्दा जाम पकडला होता. मी विचार केला तर, मलाही तसं काही आठवेना; पण बरेचजण असं करतात हे निश्चित. मग तो परत म्हणाला, “जास्त इचार करू नको, कारण गाडयेच जर मुळात हडे पन्नास-साठ वर्षात इले, तर हजार वर्सा पूर्वीच्या ग्रंथात ह्या आसतलाच कसा? येक बांधता हून दुसरो बांधता.”
“पूर्वी खटारा गाडीला बांधत असतील.”मी.
“मूळात पयल्या गाडयेचो शोध केवा लागलो?” बिनचाकाची काकल्याची गाडी वेग पकडत होती. “अरे, प्रवासातले ते उपयोगी वस्तू आसतीतय, पून ही काय परंपरा नाय. आसात तर दाखलो दिया. शास्त्राचो आधार सांगा. नायतर हेच्या पाटला लाजिक सांगा; आमी बांधतो.”
खरंच अश्या अनेक गोष्टी आपण रूढी- परंपरा म्हणून चालवत असतो. त्यामागे काय आहे, हे निश्चित आपल्याला माहितीच नसतं. एक प्रथितयश शास्त्रज्ञ म्हणायचे, ‘आम्ही कधीही इल्लॉजिकल कृती करीत नाही.’ आणि आपण मात्र भीतीपोटी अनेक बाबी चालू ठेवतो. काकल्या पुन्हा म्हणाला,” तू सायन्सचो मां? जरा तुजेकडचो डाटा तरी माका सांग. लिंबू मिरची बानल्यामुळे कितके अपघात टळले किंवा न बानणाऱ्यांचे कितके झाले.”
खरंच, गाडीची कागदपत्रं जवळ ठेवणे, वाहतुकीचे नियम पाळणे आदी गोष्टीत आपण चुकत असू आणि लिंबू-मिरची लक्षात ठेवीत असू; तरं काहीतरी गडबड आहेच. मी विचारात पडल्याचे पाहून काकल्या मनात खुदखुदत होता. त्याचं काम झालं होतं अन् तो निघालाही.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802