You are currently viewing दहशतवादा बरोबरच धनशक्ती विरोधातही लढणार…

दहशतवादा बरोबरच धनशक्ती विरोधातही लढणार…

आम.दीपक केसरकरांचा निर्धार

विशेष संपादकीय….

सात आठ वर्षांपूर्वी सावंतवाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार असताना दीपक केसरकर यांनी २५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारणातील अनभिज्ञ सम्राट असणाऱ्या खुद्द नारायण राणे यांच्या विरोधात दादागिरी आणि दहशतवादाचा मुद्दा पुढे करत रणशिंग फुंकले आणि नारायण राणे यांना आयुष्यात पहिल्यांदाच पराभवाचा सामना करण्यास भाग पाडले. नारायण राणे स्वतः कुडाळ मधून पराभूत झाले तर निलेश राणे खासदारकीची निवडणूक हरले होते. दीपक केसरकर हे सावंतवाडीतील शांत संयमी नेतृत्व. असं म्हणतात की तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेले केसरकर हे पूर्वीपासून श्रीमंतीत वाढलेले. त्यामुळे मोठेपणा, घमेंड त्यांच्या वागण्यात कधीही दिसून येत नाही. मधाळ भाषेमुळे अनेकजण त्यांचे चाहते झाले. दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या दादागिरी आणि दहशतवादा विरोधात मैदानात उतरून त्यांच्याशी पंगा घेतला आणि त्यात ते नारायण राणे यांची जिल्ह्यातील हुकूमत कमी करण्यात यशस्वी देखील झाले. २५ वर्षात नारायण राणे यांच्या विरोधात एकही शब्द जिल्ह्यात कोणी बोलत नव्हते तिथे दीपक केसरकर यांनी केवळ बोलून गप्प राहिले नाहीत तर शांतपणे त्यांनी राणेंची जिल्ह्यातील दादागिरी, दहशत नेस्तनाबूत करून जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केलं.
होय, अगदी १००% दीपक केसरकरांच्या मैदानात उतरून दिलेल्या लढ्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची संपलेली ताकद पुन्हा आली, शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ दूर होऊन शिवसैनिक भगवा फडकविण्यासाठी सज्ज झाले आणि जिल्हा भगवामय करून सोडला. राष्ट्रवादीतून सेनेत आलेले केसरकर मंत्री, पालकमंत्री झाले परंतु पक्षासाठी जे कार्य वरिष्ठांना अपेक्षित होतं ते सरळमार्गी चालणाऱ्या केसरकरांकडून झालं नाही, त्यामुळे पक्षातील नाराज गटाने पक्षप्रमुखांकडे तक्रारी देत केसरकरांना बाजूला केलं गेलं. केसरकर राष्ट्रवादीतून येऊन मंत्री झाले, परंतु खुद्द नारायण राणेंचा पराभव करणारे वैभव नाईक आमदारच राहिले. हे देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. “कानामागून आले आणि तिखट झाले” असेच काहीसे दीपक केसरकर मंत्री झाल्यावर इतरांना वाटणे साहजिकच होते. जिथे शिवसेनेच्या सुरेश प्रभूंचा पराभव झाला होता, तिथेच मुंबईतून येऊन पक्षाचे सचिव असलेले विनायक राऊत दीड लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येतात हे देखील दीपक केसरकरांनी लावलेल्या सुरुंगामुळेच शक्य झालं होतं. परंतु मग दीपक केसरकरांना पक्ष नेतृत्वाने बाजूला का केले? पक्ष नेतृत्वास पक्षहीत महत्त्वाचे वाटले की जिल्ह्यातील सत्ता? कारण जिल्ह्यात सत्ताच राहिली नाही तर भविष्यात पक्षहीत कसं काय साध्य होणार?
दीपक केसरकर यांना खड्यासारखे बाजूला करत जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातून मूळ सिंधुदुर्ग वासीय असे म्हणत मंत्री आयात करून शिवसेनेचा तरुण चेहरा म्हणून उदय सामंत यांचा जिल्ह्याच्या राजकारणात *उदय* झाला. केसरकर मवाळ परंतु उदय सामंत आक्रमक असं म्हटलं जायचं, त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेला आलेली मरगळ दूर होऊन शिवसैनिक उदय सामंत यांच्या ताकदीवर जोमाने कामाला लागतील आणि जिल्ह्याचा केसरकरांच्या काळात रखडलेला विकास मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली होती. उदय सामंत यांच्या एक दोन दौऱ्यात तशी झलक देखील दिसली. एखादी गाडी घेऊन दौरा करणाऱ्या केसरकरांपेक्षा सामंत यांच्या दौऱ्यात गाड्यांचा ताफा दिसू लागला, परंतु गेल्या दोन जिल्हावासीयांना ना विकास दिसला ना शिवसेना पक्षाचा जिल्ह्यात दबदबा वाढला, उलट जिल्ह्यातील शिवसेना हळूहळू कमी होऊ लागली आणि भाजपा,काँग्रेस, राष्ट्रवादी जिल्ह्यात वाढू लागली. पालकमंत्री जिल्हा दौरा करतात, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्याना त्यांच्याकडून बळ मिळाल्याचं दिसत नाही. परिणामी जिल्ह्यातील शिवसेना पुन्हा एकदा २०१३। पूर्वीची शिवसेना बनत चालल्याचे चित्र उभे राहत आहे. केसरकरांना बाजूला करून बाहेरून पालकमंत्री जिल्ह्यावर लादल्याने केसरकरांना संपवता संपवता भविष्यात कुडाळची शिवसेनेची जागा देखील जिंकणे जिकरीचे होणार यात शंकाच नाही, आणि तेव्हाच पक्षीय राजकारणाचे बळी कोण हे शिवसेना नेतृत्वास समजून येईल.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक शिवसेनेकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. कणकवलीत सुशांत नाईक विजयी झाले परंतु तिथेच सतीश सावंत सारखे मातब्बर पडले यामुळे नक्की पाणी कुठे मुरते आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात उत्पन्न झाला आहे. मागील नगरपंचायत निवडणुकीत देखील संदेश पारकर यांच्याबाबत देखील अशीच परिस्थिती झाली होती. त्यामुळे भविष्यात शिवसेना नेतृत्वास याबद्दल खोलवर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दीपक केसरकर यांनी सावंतवाडी, दोडामार्गातून उभे केलेले दोन उमेदवार निवडून आले असले तरी कणकवलीत झालेला हल्ला आणि शेवटच्या पाच सहा दिवसात झालेल्या धनशक्तीच्या प्रयोगामुळे काही मतदार फुटले, पैशाला बळी पडले त्यामुळे येत्या काळात धनाचा वापर वाढला तर लोकशाहीच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहशतवाद मुद्द्यावरून जिल्हावासीयांच्या मनात जागा निर्माण करणारे केसरकर धनशक्तीच्या वापराच्या विरोधात उभे ठाकण्याची भाषा करत असल्याने भविष्यात केसरकर आपला मोर्चा नारायण राणेंपुरता मर्यादित न ठेवता आम.रवींद्र चव्हाण यांच्याकडे देखील वळविणार हे स्पष्ट होत आहे. केसरकर यांनी कोणाचे नाव जरी घेतले नाही तरी आम.रवींद्र चव्हाण जिल्ह्यात आल्यानंतर बदललेली निवडणुकीची समीकरणे सर्व काही सांगून जात आहेत.
खासदार विनायक राऊत हे देखील जिल्ह्यातील बँकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरल्याने दिसले नाही. खासदार राऊत यांनी जिल्ह्यातील शिवसेनेची ढासळत चाललेली बुरुज जर आताच सावरली नाहीत तर येत्या काळात जिल्ह्यात जसा सावंतवाडीचा “दीपक” मालवत जाऊन रत्नागिरीचा “उदय” झाला तसाच पुढील काळात “विनायक” कृपेनेच रत्नागिरीच्या सूर्याची “किरण” खासदारकीवर पडली नवल वाटू नये.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =