You are currently viewing नाधवडेच्या अमोल खांडेकर यांचा रेल्वे अपघातात मृत्यू

नाधवडेच्या अमोल खांडेकर यांचा रेल्वे अपघातात मृत्यू

नाधवडेच्या अमोल खांडेकर यांचा रेल्वे अपघातात मृत्यू

मोबाईलवरील संभाषण ठरले जीवघेणे? इसार एक्सप्रेसची धडक

वैभववाडी प्रतिनिधी :

कोकण रेल्वे मार्गावर इसार एक्सप्रेसची धडक बसून विवाहित तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६, रा. नाधवडे हेळकरवाडी, सध्या मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना वैभववाडी रेल्वे स्थानकापासून खारेपाटणच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

याबाबत रेल्वे पोलीस प्रवीण राजाराम मोरे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रविवारी सकाळी ड्युटीवर असताना खारेपाटण स्टेशन मास्तर यांनी रेल्वे अपघाताची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता रेल्वे ट्रॅकवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला. यानंतर वैभववाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस कर्मचारी उद्धव साबळे व धनाजी धडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहापासून काही अंतरावर सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता मृत व्यक्ती अमोल खांडेकर असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या मेहुण्यांना मृतदेहाचे छायाचित्र पाठविल्यानंतर ओळख निश्चित करण्यात आली.

मृतदेह ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी येथे शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.

अमोल खांडेकर हे TCS मध्ये कार्यरत होते. त्यांच्या पत्नी मेडिकल क्षेत्रात कार्यरत असून शनिवारी रात्री त्या मुलाखतीसाठी विमानाने बंगळुरूकडे रवाना झाल्या होत्या. तर अमोल हे कोकण कन्या एक्सप्रेसने आपल्या मूळ गावी नाधवडे येथे येत होते.

यंदाच्या पावसाळ्यात काजू लागवड करण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी जमिनीची साफसफाई करण्यासाठी त्यांनी जेसीबीही बोलावली होती. रविवारी सकाळी वैभववाडी रेल्वे स्थानकावर उतरल्यावर ते नाधवडे हेळकरवाडीच्या दिशेने रेल्वे ट्रॅकवरून पायी जात असताना गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इसार एक्सप्रेसची त्यांना जोरदार धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताच्या वेळी ते मोबाईलवर बोलत असावेत, त्यामुळे ट्रेनचा आवाज त्यांच्या लक्षात आला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अमोल यांच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे नाधवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा