You are currently viewing राजकीय संघर्षाचा पर्यटनावर परिणाम

राजकीय संघर्षाचा पर्यटनावर परिणाम

सिंधुदुर्गात कधी थांबणार हत्या,राडे, जीवघेणे हल्ले. ?

संपादकीय….

निवडणुकीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण होतं आणि तसाच इतिहास जिल्ह्याच्या राजकारणाला गेली २५/३० वर्षे राहिला आहे. निवडणूक पूर्व कणकवली मतदारसंघाला आजपर्यंत राजकीय गुन्ह्यांची पार्श्वभूमी लाभली आहे, त्यामुळे जिल्ह्यात मतदानापूर्वी राजकीय अशांतता माजवून मतदारांना भयभीत करण्याची प्रथाच बनली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा अशांततामय वातावरणाचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटनावर होत असल्याचे निदर्शनास येत असून “यासाठीच केला होता का पर्यटन जिल्हा? असा प्रश्न उभा राहत आहे.
निसर्गाचं वरदान लाभलेलं काश्मीर खोरं एकवेळ पर्यटनासाठी पोषक होतं, अनन्यसाधारण सौंदर्यामुळे पर्यटक काश्मीरला पसंती देत होते. परंतु दहशतवादी कारवायांमुळे पर्यटक रोडावले आणि पर्यटनावर विपरीत परिणाम झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण, सिंधुदुर्ग किल्ल्यासारखे अभेद्य जलदुर्ग, समुद्र किनारे ही पर्यटन स्थळे गोव्यातील पर्यटन स्थळांपेक्षा कितीतरी स्वच्छ आणि सुंदर आहेत. जिल्ह्यात आल्हाददायक वातावरण आहे, राहण्याची, जेवणाची, उत्तम व्यवस्था आहे. परंतु पर्यटनाचे घोडे अडते ते जिल्ह्यातील राजकीय राडेबाजीमुळे. भरदिवसा रस्त्यावर डोळ्यादेखत केवळ राजकीय कारणांसाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर चॉपरचे हल्ले होतात, निरपराध माणसे मृत्युमुखी पडतात, कित्येकांची कुंकू पुसली जातात, कुणी गायब होतात तर कुणी बळी जातात. जिल्ह्यातील अशा अमानवी कृत्यांमुळे जिल्हा आज राजकीय निवडणुका आल्या की भीतीच्या छायेखाली वावरत असतो. त्यामुळे राजकीय दहशतवादासाठी जिल्हा बदनाम झाला आहे.
राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित केला गेला. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पर्यटकांचा ओढा जास्त असतो, परंतु गोव्यातील गर्दी आणि पर्यटन स्थळांवरील अस्वच्छता, असुविधा यामुळे बराचसा पर्यटक आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर किनार्याकडे आकर्षित झालेला दिसून येतो. परंतु जिल्ह्यात घडत असलेल्या जीवघेणे हल्ले आणि चालता बोलता अपहारणासारखे गुन्हे यामुळे पर्यटक गोंधळून जातो. जिल्ह्यातील गुन्ह्यांना राजकीय पार्श्वभूमी असली तरी पर्यटक त्याबाबत अनभिज्ञ असतात, त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनासाठी येताना घाबरतात परिणाम अलौकिक सृष्टी सौंदर्य लाभूनही जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत मागे पडत चालला आहे.
कणकवलीत मागील काही दिवसांपूर्वी संतोष परब या शिवसैनिकावर झालेला चॉपर हल्ला, कासार्डे येथील वायगंणकर गायब होणे या गुन्ह्यांच्या तपासासाठी, हल्ला प्रकरणातील आरोपी अटक केले तरी मुख्य सूत्रधार यांना अटक होण्यासाठी कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कणकवली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. पोलिसांना निवेदन देऊन मुख्य सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली. पोलीस स्टेशनसमोर “अटक करा अटक करा…..म्याव म्याव म्याव म्याव” तसेच “बाबा मला वाचवा….कॉक कॉक कॉक कॉक…. अशा घोषणा दिल्याने वातावरण तंग झाले. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून सदरच्या बातम्या वेगाने पसरत असल्याने “कणकवलीत राडा झाला” या भीतीपोटीच पर्यटक जिल्ह्याकडे वर्षाच्या अखेरचे पर्यटन जोमात असतानाही पाठ फिरवतात…त्यामुळे छोटी मोठी हॉटेल्स, दुकाने थाटून पर्यटकांच्या आशेवर कर्ज काढून धंदे उभारलेल्या जिल्ह्यातील भूमीपुत्राला मात्र नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्याला कोणीही लघु, मोठ्या उद्योगांसाठी सहकार्य केलं, कर्ज उपलब्ध करून दिलं तरी जोपर्यंत जिल्ह्यात शांतता नांदत नाही तोपर्यंत जिल्हा समृद्ध होणार नाही….सुजलाम सुफलाम बनणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
जिल्ह्यात भविष्यात उद्योग व्यवसाय उभे रहावे, पर्यटन वाढावे अशी जर जिल्हावासीयांची प्रामाणिक इच्छा असेल तर जिल्हावासीयांनी मतदानातून शांततेकडे वाटचाल केली पाहिजे, क्षणिक मिळणाऱ्या पैशांसाठी आयुष्यभराचं सुख दावणीला बंधू नये….अन्यथा समृद्धीकडे नेणारा आणि जिल्ह्याच्या विकासाला आवश्यक असणारा पर्यटन व्यवसाय कात टाकताना दिसेल आणि जिल्ह्याचं अलौकिक सौंदर्य हे केवळ पुस्तकातूनच वाचायला मिळेल..

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + six =