You are currently viewing “भाई.. (स्व.श्रीपादजी काणेकर)आज तुमचा सातवा स्मृतीदिन

“भाई.. (स्व.श्रीपादजी काणेकर)आज तुमचा सातवा स्मृतीदिन

 

सात वर्षात अमुलाग्र बदल झाले… काही सकारात्मक तर काही नकारात्मक. आपण अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाचे आणि जनसंघाचेही आदर्श कार्यकर्ते होता. तुमचा जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ म्हणजे वैचारिक अधिष्ठान असलेल्या आणि तत्वनिष्ठ राजकारणाचा कार्यकाळ. तुमचे समर्पण , अभ्यास आणि अफाट वक्तृत्व ही तुमची संपत्ती होती. जिल्हाध्यक्ष पदाचा वापर ना तुम्ही कधी गडगंज संपत्तीसाठी केलात… ना पुढच्या आपल्याच पिढ्यांचा विचार केलात. स्वखर्चाने पक्ष चालवला. तुमचीच गाडी, तुमचेच इंधन आणि तुम्हीच चालक बनून अख्या जिल्ह्यात पक्षसंघटनेसाठी फिरत होता. अनेकदा तुमच्या बरोबर फिरता आलं. आदर्श नेतृत्वाचा अनुभव घेता आला.
महाराष्ट्रात युतीची सत्ता आली पण त्यावेळी सुध्दा कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. ना कधी आपल्या कुटुंबासाठी पक्षनेतृत्वाकडे याचना केली. तुमचं अचंबित करणारं सगळ्याच क्षेञातील ज्ञान, वाचन आणि अभ्यास यामुळे अनेक बुद्धीजीवी तुमच्या संपर्कात आले. खऱ्याखुऱ्या “पार्टी विथ डिफरंट” चे तुम्ही पाईक होता. मी भारतीय मजदूर संघाचे काम सुरू करण्यापूर्वी तुमचे आशिर्वाद घेतले होते तेव्हा श्रध्देय दंतोपंत ठेगंडीजी आणि भारतीय मजदूर संघाचा इतिहास, देशातील कामगार संघटना यावर तासभर तुम्ही माझे प्रबोधन केले.
तुमच्या अनेक आठवणी आहेत. तुमच्या सारखे आदर्श आज दिवसेंदिवस दुर्मीळ होत चाललेत.. तुमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या त्यागातून आजचं परिवर्तन दिसत आहे.. याची जाणीव माञ दिवसेंदिवस धुसर होत चाललीय याची मनापासून खंत वाटते…
भाई, माझ्या सार्वजनिक जीवनात आणि अटल वाटेवरच्या प्रवासात तुमचे स्मरण आणि चिंतन सदैव राहिल….
भाई, तुम्हांला शतशः वंदन….
… अॅड. नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा