You are currently viewing राणे कुटुंबीयांवर टीका केल्यास याद राखा

राणे कुटुंबीयांवर टीका केल्यास याद राखा

*युवा नेते विशाल परब यांचा शिवसेनेला इशारा*

कुडाळ :

पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर या सर्वांचे राजकारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केल्याशिवाय पुढे सरकत नाही, असा आरोप भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केला. यापुढे केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या कुटुंबियांवर टीका झाल्यास याद राखा, ‘बडी बडी बाते आणि वडापाव खाते’ हे सगळं एका वेळेला बंद केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा भाजपा युवा नेते विशाल परब यांनी दिला. कुडाळ येथील हॉटेल लेमन ग्रास मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभा मतदारसंघाला बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, ब्रि. सुधीर सावंत, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांची परंपरा आहे. मात्र या परंपरेला काळीमा पुसण्याचे काम खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचा कोणताही कार्यक्रम असू दे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर या सर्वांचा एक कलमी कार्यक्रम म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करणे त्याशिवाय यांचा दिवसही ढकलत नाही. तसेच त्यांचं राजकारणही पुढे सरकत नाही. आतापर्यंत या जिल्ह्यात याच राजकारणाच्या आधारावर आणि दहशतवादाचा मुद्दा घेऊन मतांची झोळी भरून घेतली. मात्र या सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी एक तरी विकास काम आणले आहे का? असा सवाल विशाल परब यांनी केला.

सी वर्ल्ड, विमानतळ, मुंबई-गोवा महामार्ग, टाळंबा धरण हे सगळे प्रकल्प केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून या जिल्ह्यात आले. पण या शिवसेनेच्या नेत्यांनी एकही प्रकल्प जिल्ह्यात आणला नाही. फक्त आपल्या राजकारणाची पोळी दहशतवाद या मुद्द्यावर भाजून घेतली.

आता शिवसेनेत राऊत यांना म्हणावी तशी किंम्मत राहीलेली नाही. त्यामुळे त्यांना लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारे राणेंवर टिका करावी लागत आहे. मात्र काही झाले तरी येणार्‍या निवडणूकात आम्ही राऊत यांना त्यांची जागा दाखवून देवू, मोदींच्या लाटेवर निवडून आलेल्या विनायक राऊत यांनी हिम्मत असेल तर पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी,तर शिवसेनेचा एक बडा नेता लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. अनेक जण आमच्या संपर्कात आहेत, असेही परब यावेळी म्हणाले.

यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, माजी सभापती मोहन सावंत, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, तालुका सरचिटणीस, विजय कांबळी, तालुका उपाध्यक्ष राजा धुरी, निलेश परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा