You are currently viewing स्री शक्तीचा जागर …
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

स्री शक्तीचा जागर …

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

स्री शक्तीचा जागर …

नऊ रात्रींचा जागर … नवरात्र… महिषासुर मर्दिनीची नऊ रूपे
आठवायची.. तिचा पराक्रम आठवायचा ..तिने कसा दुष्ट
प्रवृत्तींचा नाश केला हे आठवायचे व मग आपण कुठे आहोत
हे ठरवायचे.

मुघल काळात ज्या राण्या होऊन गेल्या, राजपूत , मराठा
राण्या .. पद्मिनी , महाराणी ताराबाई , झाशी ,अहिल्याबाई
होळकर , अशी अनेक नावे घेता येतील..ह्या सर्व महाराण्या
अत्यंत तेजस्वी व अग्निशिखा होत्या. राजाच्या पश्चात
काय आणि कसा निर्णय घ्यायचा हे त्या चांगलेच जाणून
होत्या. म्हणून प्रसंगी महाराष्ट्रात जिजाऊ व महाराणी येसूबाई
साहेब यांनी ही सुत्रे हातात घेतली हे आपण जाणून आहोत .

महाभारत कालीन स्रियातर याहून तेजस्वी होत्या. दौपदी तर
लखलखती वीज होती .सत्यवती कुंती गांधारी यांनी आपल्या
बुद्धीमत्तेने आपले स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले होते.
सारे राजपुरूष षंढा सारखे खाली माना घालून बसले असतांना द्रौपदीने अत्यंत तेजस्वी पणे भर सभागृहात जे
प्रश्न उपस्थित केले ते केवळ द्रौपदीच विचारू शकते .

ह्या पुरूषप्रघान राजवटीने कधी ही स्रियांची साथ दिली
नाही. एकट्या कृष्णाचा अपवाद वगळता सारे रूढी
परंपरांना शरण गेले ज्या त्यांनी स्वत:च्या सोयीने निर्माण
केल्या होत्या. त्यातून राम ही सुटला नाही. पवित्र अशा
सीतेला त्याने ही अग्निदिव्य करायला लावले .

ह्याच पराक्रमी स्रियांनी पुराणकाळात संकट समयी
पुरूषांच्या रथाचे सारथ्य केले त्यात सत्यभामा कैकयी
मंदोदरीसह अनेक स्रिया आहेत.म्हणजे प्रसंगी प्रेमापोटी
स्रियांनीच पुरूषांना अनेक वेळा मदत केली त्यात यमा
पासून पतीला वाचवणारी सावित्री आहे व ज्योतिबाच्या
खांद्याला खांदा लावून शेणमाती झेलणारी आधुनिक
सावित्री ही आहे .तसेच पदराला गाठी मारून अर्धपोटी
राहून परदेशात लंडन मध्ये नवऱ्याला शिकवणारी रमाई
देखील आहे .ह्याच रूढीग्रस्त समाजाने टिळक काळात
स्रियांचे , विधवांचे अतोनात हाल केले याचा साऱ्या
भारताला परिचय आहे. तेव्हा सुद्धा ताराबाई शिंदे रखमाबाई
राऊत पंडिता रमाबाई यांनी भरपूर झगडा दिला . ताराबाईंनी
तर ह्या जुलमी प्रथांविरूद्ध पुस्तिकाच काढून तेव्हाच्या
समाजधुरीणांची यथेच्छ टिंगल केली आहे . पण या पुरूष
प्रधान समाजाची मानसिकता अजूनही बदलली नाही व
बदलणार नाही हे आजकाल समाजात स्रियांबद्दल जे
क्रौर्य दिसते आहे ते तर वेदकाळाला ही लाजवणारे आहे.

जन्मदात्री स्री ला नऊ दिवस मखरात बसवायची व नंतर
तिचे अनन्वित हाल करायचे हे चित्र घडणाऱ्या घटनांवरून
ठळकपणे नजरेस पडते आहे व आम्ही सारे इतके निर्ढावलो
आहोत की आमच्या घराला आग लागे पर्यंत ते आमच्या
लक्षातही येत नाही .इतक्या पराक्रमी स्रियांचा वारसा
असतांनाही आज आम्ही कुठे आहोत? का आमचे रक्त पेटून
उठत नाही? का आम्ही अशा जुलुमां विरूद्ध संघटीत होत नाही ? का हा समाज सारे कळत असून डोळ्यांवर कातडे
ओढून गप्प राहतो .. का पुरूष संघटीत होऊन हा प्रश्न सोडवत
नाही? दुसऱ्याची बेटी इतकी परकी असते का की हळहळून
सोडून द्यावी ? आपल्या घरी आग लागणारच नाही याची
इतरांना खात्री असते का ?

असंख्य प्रश्न आहेत . कधी सुटतील की नाही ..? स्रियांना
सन्मानाने कधी वागवले जाईल …?
मला तर सारे प्रश्न अधांतरी न अनुत्तरीत वाटतात व
या जुलमी पुरूषप्रधान संसकृतीचीच
किळस येते .
इतका कसा समाज स्वार्थी आहे की आया बहिणींची अब्रू
चव्हाट्यावर आलेली त्याला चालते …?
किती ही लिहिले तरी कमीच आहे … आई भवानी तू तरी
उग्ररूप धारण करून या आधुनिक नराधमांचा संहार कर …

ऐकशील ना माझे एवढे .. माते ….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + four =