You are currently viewing बालदिन… (की बालदी..न ?)
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

बालदिन… (की बालदी..न ?)

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांचा बालदिन विशेष अप्रतिम लेख

मुले म्हणजे फुले … बागेतली फुले नि घरातली मुले सारखीच
नाही का..? दोघे ही सारखाच आनंद आपल्याला देतात ..
जसे बागेतील फुल पाहताच मन प्रसन्न होते , त्या प्रमाणे
खुदकन् हसणारे मुल पाहताच आपल्या चेहऱ्यावर हास्य
उमलते … क्षणात आपले विश्व बदलून जाते .. क्षणभर का
होईना आपल्या चिंता काळज्या दु:ख्ख आपण विसरून जातो
एवढी निरागसता त्या हास्यात असते.मला तेवढीच निरागसता
गांधींजींच्या हास्यातही दिसते ….(इथे राजकारण नको)..

पण …

हो, हा पण फार भयंकर असतो …! नेहरूंना मुले आवडत असत
म्हणून हा बालदिन, त्यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो.
जागतिक पातळीवर बालदिन हा २० नोव्हेंबरला साजरा केला
जातो कारण १९८९ साली ह्याच दिवशी बालहक्क मसुद्यावर
सह्या झाल्या नि आता पर्यंत १९१ राष्ट्रांनी हे हक्क मान्य केले.
सर्व देशांनी मुलामुलींमध्ये सौहार्द वाढवावे , आपआपसातील
प्रेमादर वाढून मुलांनाही आनंदी जीवनाचा उपभोग घेता यावा,
अशी या मागे संकल्पना होती.नेहरूंनाही मुलांना सुखी आनंदी
जीवन मिळावे असे वाटायचे … अर्थात आपणा सर्वांनाही तेच
वाटते हे ही खरेच आहे …

पण … म्हणून मी पण टाकला होता..वाटते तसे होते कां..?
खूप गोष्टी नेहरूंना ज्या व्हाव्या अशा वाटत होत्या, आज ही
आपल्याला वाटते.. त्या तशा होतात का? होत नसतील तर
का होत नाहीत…? या प्रश्नांविषयी आपल्या मनात खरोखर
आस्था आहे का…? आपण त्या साठी काय प्रयत्न करतो..
किती वेळ, पैसा आपण त्या साठी खर्च करतो हा प्रश्न प्रत्येक
भारतीय नागरिकाने स्वत:स विचारायला हवा …! खरेतर ज्या
घरात मुल नाही त्यांचे जीवन किती निरस होऊन जाते हे आपल्याला चांगलेच माहित आहे .मुलांशिवाय जगण्यात व
घरातही चैतन्य निर्माण होत नाही याचा अनुभव आपणा सर्वांना
आहे.घरातील मुले म्हणजे खळखळता आनंदाचा झरा असतो.
एकदा मुल झाले की, आई वडील मुलांसाठीच जगतात, त्यांना
स्वत:चे असे आयुष्य रहातच नाही हे अक्षरश: खरे आहे.म्हणजे
मुले म्हणजे आनंद हे समिकरणच आहे म्हणा ना?

मग ही मुले जर राष्ट्राची संपत्ती असतील तर त्यांच्या विषयीचे
आपले दायित्व .. कर्तव्य अधिकच वाढते नाही का? हो , हीच
मुले पुढे नेते बनून देश चालवणार असतील तर आपण त्यांच्या
बाबतीत किती सजग रहायला हवे…! पण .. आपल्या बाबतीत
सर्वत्र आनंदी आनंदच आहे ….आपण आपल्या भोवती असे काही वर्तुळ आखून घेतो की, त्या परीघा पलीकडे आपण
बघतच नाही .. किंबहूना आपले ते कामच नाही असे आपण
सोयीस्कर रित्या मानतो व स्वत:ची सुटका करून घेतो.राष्ट्राचे
म्हणून काही देणे असते हे आपल्या वर्तुळात येतच नाही इतके
आपण स्वार्थी असतो .. हो.. प्रत्येक काम सरकारचेच ..!
असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटते व त्यात काही गैर आहे
अशी आपली मुळीच भावनाही नसते.. आपल्याला सोयिस्कर
असे जीवनाचे सारे अर्थ आपण लावत असतो इतके आपण
हुशार असतो….!

म्हणूनच …

आज ही बालमजुर .. वेठबिगार .. भूक …दारिद्र्य ..उपासमार
भूकबळी .. शिक्षणाचा अभाव ह्या प्रश्नांनी आपली पाठ सोडलेली नाही. देश आणि संस्था पातळीवर अशा अनेक संस्था मुलांसाठी काम करतात पण त्यास जर सामान्य
नागरिकांची साथ मिळाली तर किती तरी मोठ्या प्रमाणावर
हे काम होऊन बालांच्या समस्या कमी होतील. पण आपली
ह्या प्रश्नाकडे बघण्याची जी अनास्था आहे ती भयावह आहे.
मी आणि माझे कुटूंब …! बस्स.. मला जगाशी काही घेणे नाही, ही स्वार्थी भावना भयंकर घातक आहे . मला देवाने
सुखात ठेवले आहे मी इतरांसाठी करंगळी लावून कुणाचे
भले होणार असेल तर मी कां करू नये असे प्रत्येकाला
वाटले पाहिजे म्हणजे अनाथ मुलांना हक्काचे घर मिळेल..
नाही तर सरकार व सेवाभावी संस्था आहेतच .. त्या काम
करीत आहेतच पण आपला ही हातभार लागला तर बालांचे
जगणे सुखाचे नक्कीच होईल.

बालदिन साजरा करतांना ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार
करायला हवाच हवा …! आपण स्वत:ला त्यांच्या जागी ठेवून
पाहिले की.. अंगावर काटा येतो. का देवाने यांचे नशिब असे
लिहिले असे मी देवाला विचारते .. अर्थात उत्तर मिळत नाहीच!
म्हणून जे अनाथ आहेत, रस्त्यावर आहेत, ज्यांच्या डोक्यावर
छप्पर नाही , रहायला जमीन नाही( आमचे दोन दोन तीन तीन
फ्लॅटअसतात, बंगले असतात .. हो.. कष्टाचे असतात मला
माहित आहे)अशांसाठी आपण काही करू शकलो तर परमेश्वरही आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही
हे नक्कीच…

चला तर..
आज कंबर कसू या .. प्रतिज्ञा करू या की…
ह्या बालदिना पासून मी राष्ट्राचे काही देणे लागतो ही भावना
मनात ठसवून उपेक्षित बालकांप्रती माझे काही कर्तव्य आहे
असे प्रामाणिकपणे मानून यथाशक्ती माझे त्यांच्याप्रती योगदान देण्याचा निश्चय करून तशी कृती माझ्या हातून
घडेलच याची ग्वाही देतो….!

।। जयहिंद.. जय महाराष्ट्र….।।

( ही फक्त माझी मते आहेत )……..

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि.१३ नोव्हेंबर२०२१

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + fourteen =