*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लघुलेख*
*रंगतरंग*
रंग , रंगत, रंगीबेरंगी, रंगतदार, … या सर्व शब्दातच प्रभूची माया सामावलेली आहे. त्याने हे विश्व नुसतेच निर्माण नाही केले तर ते टिकेल, सृजन होऊन नवनिर्मिती होईल, सर्वांना आवडेल, आनंद मिळवता येईल असेही बनवले आहे.
हे रंग आपण सहज डोळ्यांनी पाहू शकतो हे आणि विशेष !
डोळे ऊघडल्यावर रंग डोळ्यांना सुखावतो तो तरू वेली , माळराने, डोंगर दरी, यांचा घनदाट अशी हिरवाई. सारे जग जिवंत आहे. सृजनशील आहे हे मर्म हा हिरवा रंग डोलुन डोलुन सांगत असतो. मन अगदी सुखाऊन जाते.
नंतर मनात भरतात ते अनेक विध रंगांची फुले, रानटी फुलोरे, यांचे रंग. अनेक रंगांच्या सुंदर छटा मन मोहुन टाकतात. पिवळा सोनचाफा, हिरवा, पांढरा, लाल चुटूक चाफा, शुभ्र जाई, जुई, मोगरे, तगरी अनंत लिली , अनेक रंगछटातले गुलाब, सदाफुली , अग्नीफुलांचा गुलमोहर, तर हळदुल्या बहावा, रानात पळस पांगारा, कूडा, काटेसावर, सुरंगी
किती रंग घेऊन प्रभू यांना ऊमलवतो व आनंद देतो.
त्यातला शुभ्र पावित्र्य, पिवळा, शुचिता, लाल लक्ष्मीचे अस्तित्वच जणू दाखवतात.
बहावा ग्रिष्माची चाहुल तर गुलमोहर मृगाची चाहुल सांगतात.
निळे आकाश स्वच्छ प्रकाशाचा दिवस सांगतो तर मेघन आकाश वर्षेची आरोळी देतो.
रात्रीचे काजळ लेले आकाश निरव शांतता सांगते, आणि ऊद्याची नव्या आशेची पहाट जागवतो.
मयुराचा , मोरपीसाचा रंग , पोपटाचा पोपटी, हंसाचा अत्यंत शुभ्र, बदकांचा करडा, सिंहाचा सोनसळी, वाघाचा दुहेरी रंग, हत्तीचा कृष्णरंग, गाई म्हशींचे अशा अनगिनत पशुपक्षांचे रंग या भुतलावरची एकमेकांच्या संगतीने सृजनशील असणारी जबाबदारीने जगणारी जीवसांखळीच दाखवते. एकमेकांचे जगणे लोभस, जिव्हाळ्याचे पुरक असेल तरच जग जगेल हे मर्मच सांगुन जातात ते सारे रंग. यासाठीच श्रीरंगाच्या डोक्यावर निळे मोरपीस दिसते. मानव आणि इतर सजीव यांचे अद्वैत सुचवले आहे.
तिरंगा हा अभिमानाचा ध्वज तीन रंगात, शुभ्र हा शांतताप्रिय, भगवा हा शहिदांच्या सांडलेल्या रक्ताची, तुळशीपत्र ठेवलेल्या संसाराची, बलिदानाची आठवण व हिरवा समृदृधीचे मर्म सांगतात.
खळाळणारे पाणी जिवंतपणा सुचवते निळसर रंगातुन, सागराची अथांगता हिरवट शेवाळी रंगातुन , मातीची समृद्धता सुफलता काळा लाल रंग मर्म सांगुन जातो.
असेच भावनांना सुद्धा रंग असतात.
प्रितीचा गुलाबी, मायेचा गहिरा, द्वेषाचा काळा, वैराग्याचा पांढरा, त्यागाचा भगवा, आनंदाचा सोनेरी हे रंग मनात साठवले जातात, तर काही डोळ्यात तरंगतात.
यावर मनुष्यस्वभावाचे मर्म समजते.
या सर्व रंगांना मिसळुन इंद्रधनू ऊभे करण्यात प्रभू यशस्वी ठरला आहे.
या सातरंगात मर्यादांचे मर्म सुचवले आहे.
यापलिकडे काही नाही.
असे रंगतरंग आहेत म्हणुन ही धरती सुंदर आकर्षक झाली आहे.
जिवन सुरळीत, मर्यादेत राहुन सृजन, रक्षण, प्रेम हे सर्व राखले गेले आहे.
हे नसते तर ….. रंगहीन, बेरंगी किती झाले असते याची कल्पनाच येत नाही.
अनुराधा जोशी.
9820023605
