You are currently viewing निवती समुद्रतळाशी ‘INS गुलदार’ यशस्वीरित्या स्थापित
Oplus_16908288

निवती समुद्रतळाशी ‘INS गुलदार’ यशस्वीरित्या स्थापित

आशियातील पहिल्या सागरी संग्रहालय प्रकल्पाला ऐतिहासिक यश

स्कूबा डायव्हिंगद्वारे पर्यटकांना घेता येणार युद्धनौकेचा थरारक अनुभव; सिंधुदुर्गात उभा राहणार कृत्रिम प्रवाळभिंती व सागरी पर्यटनाचा नवा अध्याय

सिंधुदुर्ग :

पश्चिम किनाऱ्यावरील अथांग सागर आणि सह्याद्रीच्या कातळकड्यांच्या साक्षीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी पर्यटनाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका “आयएनएस गुलदार” ही निवती समुद्रतळाशी यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली असून, आशिया खंडातील पहिल्या सागरतळावरील युद्धनौका संग्रहालय प्रकल्पाला ऐतिहासिक यश मिळाले आहे.

भारतीय नौदलाची तब्बल चार दशके सेवा बजावलेली INS गुलदार ही युद्धनौका १२ जानेवारी २०२४ रोजी अधिकृतपणे सेवामुक्त करण्यात आली होती. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या पुढाकारातून ही युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला सागरी संग्रहालय उभारण्यासाठी विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी २०२५ मध्ये नौदलाकडून या नौकेचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पामध्ये एकूण पाच टप्पे निश्चित करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात युद्धनौकेचे हस्तांतरण, दुसऱ्या टप्प्यात विजयदुर्ग किनाऱ्यावर आणणे, तर तिसऱ्या टप्प्यात नौकेतील पर्यावरणास अपायकारक घटकांचे संपूर्ण स्वच्छीकरण करण्यात आले.

प्रकल्पाच्या चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात दि. १९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयएनएस गुलदार ही युद्धनौका २० ते २२ मीटर खोल समुद्रतळाशी नियंत्रित पद्धतीने स्थापित करण्यात आली. मागील ३६ तासांपासून तज्ञांचे पथक, स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी अथक प्रयत्न करत होते. या कार्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे विशेष सहकार्य लाभले.

या सागरी संग्रहालयामध्ये पर्यटकांना स्कूबा डायव्हिंग आणि पाणबुडीच्या सहाय्याने थेट समुद्रतळाशी जाऊन युद्धनौकेचा अनुभव घेता येणार आहे. याठिकाणी कृत्रिम प्रवाळभित्ती निर्माण होऊन रंगीबेरंगी मासे, समुद्री गवत, प्रवाळ आणि विविध सागरी जीवसृष्टीचे स्वतंत्र परिसंस्था विकसित होणार आहे. स्थानिक स्कूबा डायव्हर्स आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पॅडी संस्थेचे प्रशिक्षित मार्गदर्शक पर्यटकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच युवकांसाठी “डाइव्ह मास्टर्स” या अभ्यासक्रमाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाचा उद्देश युद्धनौकेचा इतिहास जपणे, सागरी पर्यटनाला चालना देणे, नवीन सागरी परिसंस्था निर्माण करणे आणि किनारी भागातील रोजगार संधी वाढवणे हा आहे. कृत्रिम प्रवाळभिंतीमुळे एका वर्षाच्या आत स्वयंपूर्ण सागरी परिसंस्था तयार होते, ज्यामध्ये विविध प्रकारचे मासे, प्रवाळ, स्पंज आणि समुद्री वनस्पती विकसित होतात.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश  गठणे यांनी सांगितले की, “युद्धनौकेचे संपूर्ण स्वच्छीकरण करून ती नियंत्रित पद्धतीने समुद्रात स्थापित करण्यात आली आहे. पर्यटकांना प्रमाणित स्कूबा डायव्हर्सच्या मार्गदर्शनाखाली पाण्याखालील युद्धनौकेचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे नौदलाचा इतिहास आणि शौर्यगाथा पुढील अनेक शतकांसाठी जतन करता येतील.”

या उपक्रमासाठी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे तसेच पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे, वरिष्ठ व्यवस्थापक श्रीमती श्रीप्रा बोरा, प्रादेशिक अधिकारी दिपक माने तसेच व्यवस्थापक (बांधकाम) दिपक हरणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा