फोंडाघाटमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान
शेतकऱ्यांकडून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी
फोंडाघाट
फोंडाघाट परिसरात आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यापूर्वी रात्री उशिरापर्यंतही पाऊस पडत होता. सततच्या ढगाळ वातावरणामुळे परिसरात पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून उष्णतेत आणि उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे.
आज दिवसभर आकाश ढगाळ राहिले असून रात्रीपर्यंत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अवकाळी पावसाचा फटका फळबागांना बसला असून आंबा, काजू, जांभूळ तसेच रतांबे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली.
अचानक झालेल्या पावसामुळे झाडांवरील फळगळ वाढली असून तयार मालाचेही नुकसान होत आहे. आधीच उत्पादन घट आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, संबंधित महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी, अशी रास्त मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
