You are currently viewing आठवणीतील स्व.विनायक धाऊसकर (जेपी) न्हावेली गावातील चाकरमानी…

आठवणीतील स्व.विनायक धाऊसकर (जेपी) न्हावेली गावातील चाकरमानी…

कोकण आणि गिरणी कामगार यांचं एक वेगळंच नातं होतं. गिरणगावात गिरणी सुरू होत्या तोपर्यंत कोकणातील अनेक घरांमध्ये पैसा यायचा, कमी अधिक का असेना पण घरात आनंद नांदायचा. गिरणी कामगार आणि मुंबई असे गणित असायचे. मुंबईत गिरण्यांमुळे अनेक हातांना कामे होती, कित्येक कुटुंबे गिरण्यांच्या आजूबाजूला चाळीत वास्तव्यात होती, गुण्यागोविंदाने नांदत होती. सण सोहळे म्हणजे चाळीत दिवाळीच असायची. मुंबई वाले म्हणजे त्यावेळी बॉम्बे वाले बॉम्बे वाले गावात आले की पांढरी बनियान आणि कानाला रेडियो. येताना गावातील लोकांसाठी पत्र्याच्या डब्यातील सुतरफेनी, मैसूर पाक अशी मिठाई आणायचे. मुंबापुरीतील गिरण्या बंद झाल्या, गिरणी कामगार बेरोजगार झाले, हाताला येतील तेवढे पैसे घेऊन आपल्या मुलखात आले. असेच एक गिरणी कामगार २५ वर्षांपूर्वी मुंबईतून न्हावेली गावात आले होते ते म्हणजे कै. विनायक धाऊसकर…..
विनायक धाऊसकर यांना गावात जेपी याच टोपण नावाने ओळखायचे. मुंबईकरांना गावात खूप मान असायचा. गिरणी बंद झाल्या तरी जेपीनी कधी हिम्मत हारली नव्हती. गावात येऊन त्यांनी लाऊड स्पिकरचा व्यवसाय सुरू केला. गावात कोणताही कार्यक्रम,समारंभ असला की लाऊडस्पीकर हा लावायचेच. त्यावेळी लाऊडस्पीकर ही मोठी क्रेझ असायची. त्यानंतर त्यांनी समारंभासाठी लायटिंग करण्याचाही व्यवसाय सुरू केला. साधारणपणे २५ वर्षांपूर्वी गावात आलेल्या धाऊसकरांना चार मुली आहेत, पैकी दोघी नानावटी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहेत. आपल्या वडिलांच्या उतारवयात मुंबई मुलींनी त्यांची खूप सेवा केली.
जेपींना शेवटच्या दिवसात मूळगावी न्हावेली येथे आणण्यात आले. मूळगावी आल्यानंतर वयाच्या ९० व्या वर्षी १५ दिवसांपूर्वी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. टिपटॉप राहणे, सुस्वभाव यामुळे गावात अनेकांच्या मनात आजही जेपी जिवंत आहेत. त्यांच्या आठवणींना संवाद मिडियाकडून उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न….!

प्रतिक्रिया व्यक्त करा