You are currently viewing कोकण चित्रपट महोत्सवाची दिमाखदार सोहळ्याने सांगता

कोकण चित्रपट महोत्सवाची दिमाखदार सोहळ्याने सांगता

मालवण

सिंधुरत्न कलावंत मंच आयोजित कोकण चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे अलका कुबल, सिद्धार्थ जाधव अशा बड्या सिने कलाकारांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

या महोत्सवातून ‘फनरल’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित कलाकारांनी कोकण बद्दलचे आपले प्रेम व्यक्त करत कोकणात असे चित्रपट महोत्सव यापुढेही आयोजित करून कोकणातील कलाकारांना मंच उपलब्ध करून द्यावा अशा भावना व्यक्त केल्या. सिंधुरत्न कलावंत मंच आयोजित कोकण चित्रपट महोत्सव रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये संपन्न झाला. या महोत्सवाचे रत्नागिरी येथे उद्घाटन झाल्यावर दोन्ही जिल्ह्यात तालुकावार हा महोत्सव घेऊन विविध चित्रपट दाखविण्यात आले. महोत्सवाचा सांगता सोहळा व बक्षीस वितरण सोहळा मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे पार पडला. अभिनेते दिगंबर नाईक यांनी मालवणीमध्ये गाऱ्हाणे घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या सोहळ्यास मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेता प्रथमेश परब, आरोह वेलणकर, अभिनेत्री नूतन जयंत यांसह संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर, सचिव विजय राणे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सिने कलाकारांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी कोकण चित्रपट महोत्सवातून निवडलेल्या उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता, पटकथाकार, पार्श्वगायक, बालकलाकार यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थित राहिलेल्या आम. वैभव नाईक, मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, बाबा मोंडकर, अवि सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अलका कुबल यांनी स्थानिक कलाकारांना पाठिंबा व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, आज सिनेसृष्टीतील अनेक कलावंत हे कोकणचे आहेत, असे महोत्सव आयोजित करून कलाकारांना मंच उपलब्ध करून घ्यावा असे सांगितले.

तर सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विजय पाटकर यांनी कोकणात चित्रपट महोत्सव होणे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे होते. या महोत्सवासाठी मालवण वासीयांनी भरपूर दाद दिली तसेच चांगले सहकार्यही केले, असे सांगितले. यावेळी आम. वैभव नाईक यांनी जिल्ह्यात कोकण महोत्सव आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानत कोकणातील कलाकारांनी वेगळी उंची गाठली आहे, चित्रपट सृष्टी गाजवली आहे, येथील कलाकारांमध्ये क्षमता आहे. सिंधुदुर्गला निसर्ग सौंदर्य लाभले असून येथे चित्रपटांचे चित्रीकरणही होऊ शकते असे सांगितले.

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मालवणातील कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. तर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी यापुढे हा महोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी संपन्न झाला तरी आमचे सहकार्य कायम राहील, असे सांगितले. या सांगता सोहळ्यात बक्षीस वितरण दरम्यान स्थानिक कलाकारांचे बहारदार नृत्यांचे गाण्यांचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर नाईक यांनी केले. यावेळी कलाकार व मालवणातील चित्रपट प्रेमी नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + eight =