मालवण – कसाल मार्गावर भीषण अपघात
पर्यटकांच्या अर्टिगा कारची उभ्या बलेनोला धडक; चार युवक जखमी, झाडाला धडकून कार थांबली
मालवण | प्रतिनिधी :
मालवण येथे पर्यटन सफर करून पुण्याकडे परतणाऱ्या पर्यटकांच्या अर्टिगा कारचा रविवारी सायंकाळी मालवण – कसाल मार्गावर कुंभारमाठ येथे भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बलेनो कारला अर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात चार युवक जखमी झाले. धडकेनंतर बलेनो कार पुढे जाऊन दगडी कंपाउंडला धडकली, तर अर्टिगा कार सुमारे २५ ते ३० फूट पुढे जाऊन झाडाला धडकून थांबली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भोर येथील नऊ युवक शुक्रवारी मालवण येथे पर्यटनासाठी आले होते. पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर रविवारी सायंकाळी हे युवक अर्टिगा कारने (एमएच १२ टीव्ही १२०६) परतीच्या प्रवासासाठी निघाले होते. कुंभारमाठ येथे त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बलेनो कारला (एमएच ०७ एजी ८२०६) जोरदार धडक दिली.
सदर बलेनो कार देवबाग येथील विवेक ताम्हणकर यांची असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने अपघाताच्या वेळी बलेनो कारमध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
या अपघातात अर्टिगा कारमधील ओंकार राजाराम धोंडे (वय २२), सिद्धेश तुकाराम धोंडे (वय २२), श्रेयस पांडुरंग सडांबर (वय २२) आणि रोहित संभाजी चव्हाण (वय २२, सर्व रा. भोर, पुणे) हे युवक जखमी झाले. त्यांना डोक्याला, डोळ्याला तसेच शरीरावर दुखापती झाल्या असून इतरांना मुका मार लागला आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
