You are currently viewing आंबोली ग्रामपंचायतीत मागासवर्गीयांच्या १५ टक्के अनुदानात गैरकारभारा संदर्भात अरुण चव्हाणांचे पंचायत समिती समोर उपोषण

आंबोली ग्रामपंचायतीत मागासवर्गीयांच्या १५ टक्के अनुदानात गैरकारभारा संदर्भात अरुण चव्हाणांचे पंचायत समिती समोर उपोषण

दोषींवर कारवाई करण्याची मागणी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा

सावंतवाडी

आंबोली ग्रामपंचायतीत गेली वीस वर्षे मागासवर्गीयांना दिल्या जाणाऱ्या १५ टक्के अनुदानात गैर कारभार सुरू असून या योजनेसाठी पात्र गरजू गोरगरिबांना वगळून धनदांडग्यांना लाभ दिला जात आहे. यात ग्रामपंचायत आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांचीही नावे दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या प्रकाराला जबाबदार असलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, या मागणीसाठी ग्रामस्थ अरुण चव्हाण यांनी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान ही कारवाई होण्यासंदर्भात गेली पाच वर्षे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी मी वेळोवेळी उपोषणे-आंदोलने केली. मात्र अद्याप दोषींवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आजच्या उपोषणाला योग्य प्रतिसाद न मिळाल्यास २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या उपोषणावेळी आपल्या मागण्यांचे पत्र त्यांनी प्रसिद्धीस दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, आंबोली ग्रामपंचायतीत सन २००२ पासून मागासवर्गीयांना दिल्या जाणाऱ्या पंधरा टक्के अनुदानात गैरप्रकार सुरू आहेत. पात्र गोरगरिबांना वगळून धनदांडग्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. तर यात ग्रामपंचायत आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांचीही नावे दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. याला सर्वस्वी ग्राम विकास अधिकारी जबाबदार आहे. संबंधितावर कारवाईच्या मागणीसाठी आपण गेली पाच वर्षे वारंवार आंदोलने उपोषणे केली. त्यानुसार सिंधुदुर्ग उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माझ्या तक्रारीचे निवारण व चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आपण याच मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. दरम्यान आजच्या उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालया समोर थेट आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =