You are currently viewing आरोंदा पोलीस लाठीवरून सोडल्या जातात विनापरवाना गाड्या.

आरोंदा पोलीस लाठीवरून सोडल्या जातात विनापरवाना गाड्या.

विचारणा करणाऱ्यास अरेरावीची भाषा.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, शेजारील गोवा राज्यात येणारे पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच ये जा करतात, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन देखील मार्गी लागते. गेले दीड वर्ष जिल्ह्याच्या पर्यटनास कोरोनामुळे चाप लागलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटन उद्योग उभा राहणे आवश्यक आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या जिल्ह्याच्या गोवा सीमेवरील आरोंदा लाठीवर अडवल्या जातात, त्यांच्या गाड्यांमधील सामान काढून तपासणी केली जाते. त्यामुळे नाहक पर्यटकांना त्रास होतो. यातून पर्यटन व्यवसाय गोवा राज्यात वाढत असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला उभारी मिळत नाही.
सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येणाऱ्या आरोंदा पोलीस लाठीवर डुमिंग डिसोझा हे कार्यरत आहेत. तेथून प्रवास करताना अमेय नामक जागरूक नागरिकाने लाठीवरून विना परवाना डंपर मधून वाळू वाहतूक होणारे डंपर तपासणी, परवाना न पाहताच सोडले जातात, तसेच काळ्या फिल्म लावलेल्या दारूची तस्करी करणाऱ्या गाड्या भर दिवसा सोडल्या जातात म्हणून डुमिंग डीसोजा यांना विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी त्या गाड्या आपणच सोडल्या आणि अशाच पद्धतीने रोज सोडतो अश्या अरेरावीची भाषेत उत्तर दिले. पोलीस डुमिंग डीसोजा हे ज्या अविर्भावात बोलताना दिसत होते ते पाहता त्यांच्यावर वरिष्ठांची कोणत्याही प्रकारची भीती नाही, उलट वरिष्ठांचाच आशीर्वाद असल्याचे दिसून येत आहे. सदरची बातमी विश्वासाने संवाद मिडियाकडे पाठवताना अमेय याने डुमिंग डीसोजा यांच्यावर आरोन्दा लाठीवर काम करत असताना मारहाण केल्याची एक तक्रार देखील दाखल असल्याची माहिती दिली आहे.
गोव्यातून सिंधुदुर्ग व इतरत्र चोरटी दारू वाहतूक ही यापूर्वी रात्रीच्या अंधारात व्हायची. खाकीला हफ्ते मिळत असल्याने ते रात्रीच्या अंधारात गाड्या सोडायचे. परंतु मांजर डोळे मिटून दूध पिते, त्याला ते दिसत नाही, इतरांना दिसते तसेच आता व्हायला लागले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाचा ध्यास लागलेला असताना आरोन्दा लाठीवरून भर दिवसा पर्यटकांच्या गाड्या अडवून त्यांना त्रास दिला जात आहे, परंतु काळ्या फिल्म लावून हफ्ते देऊन दररोज दारूची तस्करी करणाऱ्या गाड्या, विना परवाना वाळू वाहतूक करणारे डंपर मात्र तपासणी न करताच सोडले जात आहे.
डुमिंग डीसोजा यांचा अरेरावी करतानाच विडिओ सावंतवाडीतील आमदार दीपक केसरकरांकडे न पाठवता कुडाळ मालवण चे आमदार आणि शिवसेनेचे डॅशिंग नेते वैभव नाईक यांच्याकडे अमेय याने पाठवला आहे. आमदार दीपक केसरकर हे मवाळ भूमिका घेतात, पोलीस प्रशासनवर त्यांचा वचक नाही, त्यामुळे जिल्ह्यातील जागरूक युवक बऱ्याचदा वैभव नाईक यांच्याकडेच तक्रारी करत असल्याचे दिसून येत आहे. आरोन्दा पोलीस लाठीवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोंदा लाठीवरून होणाऱ्या कारभाराची सविस्तर माहिती मिळू शकेल. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याबाबतची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + three =