You are currently viewing हास्य एक वरदान
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

हास्य एक वरदान

*जागतिक ‘मराठी साहित्य कला व्यक्ती ‘ विकास मंचची सदस्या — ज्योत्स्ना तानवडे यांचा लेख*.

!! श्री !!

पहाट झाली नवीन आशा घेऊन आला रवी
कर्तृत्वाला सुखस्वप्नांना फुटेल नवी पालवी ||

मंडळी, सणासुदीचे दिवस आहेत.प्रसन्न वातावरण आहे.उगवणाऱ्या नवीन दिवसाचे स्वागत छान सुंदर हसू देऊन केलंत की नाही ? अहो,हे हास्यच आपल्याजवळचा अद्भूत ठेवा आहे. आनंदाची गुरूकिल्ली आणि माणसं जोडण्याचा सोपा मार्ग आहे.
उठल्याबरोबर घरातल्या माणसांकडे,जोडीदाराकडे नुसतं छान हसत पाहिलं तरी घरातल्या वातावरणात प्रसन्नतेची भर पडते. इतरांच्याही मनातले ताणतणाव,चिंता कमी करायला मदत करते.प्रसन्न अंत:करणाने अशी दिवसाची हसत सुरुवात झाली की, दिवस चांगला जाणार अशी भावना बळावते. आत्मबळ वाढते.सर्व कामांसाठी मन उस्फूर्तपणे तयार होते.हास्य योग हा मनाचा आणि शरीराच्या उत्तम व्यायाम आहे.
आपलं मन प्रसन्न असेल तर आपल्याला सर्वत्र आनंद भरलेला दिसतो.सहजपणे खिडकीतून एखादं सुंदर फुल आपलं लक्ष वेधून घेतं. एखादा गाणारा पक्षी आपल्याला ‘सुप्रभात’ म्हणून जातो. उगवणारा सूर्य मनाला आश्वस्थ करतो.हेच आपल्या कार्यसिद्धीचे आणि उत्तम आरोग्याचे गुपित असते.
तेच आपलं मन जर निराश असेल तर कित्येक चांगल्या गोष्टींच्या जवळून जरी आपण कितीदाही गेलो तरी तिकडे आपले लक्ष जात नाही.समोर असलेली गोष्टही आपल्याला सापडत नाही.उगाच चिडचिड होते. ‘हसणे’ हे आपल्या आनंदाचे प्रकटीकरण आहे.’हे’ हास्य संपूर्ण घरांमध्येही आनंद निर्माण करते आणि प्रत्येकाच्या मनातली सकारात्मक ऊर्जा जागी होते.
या हास्याचा चांगला अनुभव आपल्याला व्यवहारात अनेक ठिकाणी येतो. एखाद्या कामासाठी आपण रांगेत उभे असतो आणि आपला नंबर आल्यावर काऊंटर पलीकडच्या व्यक्तीला प्रसन्न हसत ‘नमस्कार’ म्हटलं तरी कामाच्या पूर्ततेची खात्री खूपच वाढते.एक हसू आणि नमस्कार आपल्याला समोरच्या माणसांशी जोडून जातो. याचा चांगला अनुभव अनेकदा घेतलेला आहे.
आपल्यापाशी मोफत आणि भरपूर असतं ते आपलं हास्य.ओळखीचं कोणीही भेटलं तरी तोंडभर हसून नुसती मान किंवा हात हलवला तरी एकमेकांतली स्नेहगाठ आणखीन पक्की होते आणि ते माणूसही आनंदून पुढे जाते.त्यामुळे हसून ओळख देण्यात अजिबात काटकसर करू नये.
कित्येक माणसे नुसती ओळख दाखवायला,थोडंसं हसायलाही तयार नसतात.त्यामुळे त्यांचेच नुकसान होते.तेच गर्दीतही एकटे पडायची शक्यता असते. हसणे हा इतरांशी जोडणारा हमखास दुवा आहे. तेव्हा आपण तर आनंदी राहू याच पण इतरांनाही आनंदी करू या.

रडलास जर तू,तूच रडे तुझ्यासंगे
हसलास जर तू,जग हसे तुझ्यासंगे ||

हा जगाचा नियम आहे.तेव्हा आत्तापासूनच स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंदी करायचा संकल्पच करू या.हसू या आणि हसवूया. दु:ख, संकटांशी धीराने सामना करीत आनंदात चालत राहू या.तेव्हा मस्त हसत रहा.

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे.
9423400492

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =