You are currently viewing बळीराजा
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

बळीराजा

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रो. डॉ. प्रवीण जोशी लिखीत अप्रतिम कथा*

*बळीराजा*

नीरव शांतता !
होय,
पहाटेची नीरव शांतता ! ज्यात रव नाही आवाज नाही सगळं कसं स्तब्ध ! अशीच . आकाशात धुसर चंद्रबिंब ,अंधुक चांदणे , हवेत बोचरी थंडी , गर्द धुके , शुभ्र दुलई लपेटून घेतलेली अवनी ! रात किड्यांची किरकर , अधूनमधून .
दवबिंदु चा सडा, चुहकडेच पसरलेला . हिरवीगार गवत पाती,त्यावर दवबिंदु चिकटलेले . चंद्रकीरणात मोतीयाचे दाणे होऊन चिकटले होते .जस काही, आपल्याच तोऱ्यात ऐटीत , मिरवीत होते ! अगदी अमुल्य दागिनाच त्याच्या कोंदणात बसलेला वाटत होता ! अजून रात किड्यांचे साम्राज्य होतच , कुठेकुठे फुलू पहाणार्या कुंद कळ्या , सोबत ,
रात पक्ष्यांची फडफड ,थंड गार वाऱ्याची झुळूक . अंगावर काटा आणणारी !
ओढ्याच्या पाण्याचा खळ खळणारा आवाज , एकाद्या सवाष्णीच्या चुड्या गत किणकिणत होता ! झाडावर वेलीवर चमकणारे काजवे . पश्चिमेला शुभ्र शुक्रतारा, त्याच लोभस चकाकणारे व्यक्तिमत्त्व , हिऱ्यांच्या खड्या गत पाझरणारे शुभ्र दुधाळ रेषा ! टप्पोरा शुक्रतारा , समवेत असंख्य गगनातील तारका . चमचमणाऱ्या चंद्रकळा साडीगत लखकणार्या , नखशिखांत , शांत श्रांत अवनीच रूप मूक पण बोलकं . गर्द झाडी पलीकडे डोंगर रांगा ! आकाशात दिसणारे नक्षत्रे, स्वर्ग च अवतरला असे वाटणारे, विहंगम दृश्य . जे डोळ्यात ही समावत नव्हते !
उगवतीचे साक्ष देणारे, बदलणारे काहीं आकाशी रंग , किंचित जांभळा केशरी, ताम्बुस छटानी उघडत होता . मध्येच किरमिजी रंग, मावळत जाणारा शुक्रतारा. पाण्यात बर्फ वितळलेल्या सारखा अस्पष्ट होत होता .
मध्येच पक्ष्यांची थोडी हालचाल , चुळबुळ , फडफड, शुभ्र उमळणारी तगर , प्राजक्ताचा सडा विखुरलेल्या अवस्थेत लक्ष्य वेधुन घेत होता . त्याचा गंध रानोमाळ पसरलेला . मध्येच वटवाघुळ पक्षी आपले अस्तित्व दाखवत , गवसणी घालुन आजूबाजूच्या झाडावर लुप्त झालेला !
ओढ्याच्या कडेला मोरांच्या केका साद घालीत , त्यांचे ऐटीत मान वर करून चालणारे पद लालित्य . उगवतीला तांबडं फुटून झुंजू मंजू झालं असेल नसेल तस,
चिमण्यांचा किलबिलाट , घराघरात लागणारे दिवे . आळस झटकुन उघडणारे दरवाजे ! सडा समार्जन साठी बाहेर आलेल्या ललना. मंदिरातून पलीकडून येणारा घंटा नाद .
झोपडीतून येणार धूर व त्यात मिसळणारे दाट धुके .
टिपेच्या आवाजात येणारी
नमाजची बांग व कोंबड्या चे अरवणे , त्यातच घंटा नाद व चिमण्याचा चिवचिवाट , ध्वनी सरगम ,
पार्व्याची घुटूरघुम ही सर्व अवनीला जाग आल्याची नांदी . शुभ्र धुक्याची चादर व बोचरी थंडी !
सोनेरी किरणांची वरात,सहस्त्र रश्मीने बाहेर पडत , ऐटीत झाडातून कवडसे धारण करीत. अवनीला आलिंगन देत होती .तिचे चुंबन घेत होती , त्यातच गाई म्हशीचे हंबरणे, त्यांच्या गळ्यातील घुंगरूचे आवाज, शेतीकडे जाणारी काही आकृत्याचे वर्दळ पाणंदमध्ये , धुक्यात भिजलेल्या पाऊल वाटा , शीत वाऱ्याची झुळक , चिमण्यांचा चिवचिवाट , मध्येच कुठून तरी भारद्वाज पक्षी ह्या फांदीवरून त्या फांदीवर जात , त्याची शोधक नजर , कदाचित दर्शन देण्यासाठी अवतरला असावा . त्याला काय पाहिजे हे न कळणार ! विचित्र कोड्यात हरवल्या सारखा , त्याचे तांबडे डोळे व पंख उठून दिसणारे .
कुहुकुहू अशी साद आम्रवृक्षावर , आंब्याचा मोहर फुटून त्यातुन येणारा सुगंध , कुठंतरी लहान मोठया
कैऱ्या लांब देठावर हेलकावे घेत , सगळ्यांची नजर खेचुन घेत होत्या . सोबत राघु मैनेची जोडी त्यांचाच दिमाखात . हिरव्या कच्च्या कैरीवर चोच मारत, विठू विठू
मिटु मिटु ची भाषा, लांब बाकदार लाल चोच , पोपटी अंगरखा घातलेली जोडी .
जवळच्याच विहिरीवर येणारा मोटेचा आवाज , बैलांच्या गळ्यातील घुंगरूचा आवाज, पाटात पडणारे पाणी . विहिरीच्या कडेला भिंतीतून फुटलेला पिंपळ , त्याच्या फांद्यांवर लोम्बकळणारी कित्येक सुगरणीची अधोमुखी घरटी . घरट्यात असणारे चिमुकले जीव . मध्येच फडफड करत उडणारे मोर त्यांच्या केका
पटातील पाण्यात चोच मारणारी साळुंकी . व त्यांचा थवा खाद्य आराधना करत .
सकाळ होऊन एक कासरा वर आलेला सूर्य तसा
हवेत आलेला उबदारपणा पण . पानंदीच्या वाटेवर वर्दळ वाढलेली . मळ्यातील वस्तीवर चाललेली काम झोपडीतून येणार धूर त्याची साक्ष देत होता .
वाड्या वस्त्यावर जाग आली तशीच , गावच्या पाणंदीकडे पण वर्दळ वाढीला लागली . एव्हाना सुर्याने धरतीवर लाल रंगाचा मळवट भरला होता . पाणंद ची पायवाट मळलेली , थंडीच्या गार वाऱ्यामुळे जमिनीत ओलावा ! ठिकठिकाणी दिसत होताच, धुक्याची चादर आता कमी कमी होत असतानाच, पाणंदीच्या दोन्ही बाजुस शेंड एकमेकात गुंतून गच्च बसलेली . ते कमी म्हणुन की काय त्यातच अनेक वेलीनी आपला संसार उभा केलेला ! त्या वेलीची पांढरट व लाल चुटुकदार पाने पाहुनच ,डोळ्यांना समाधान मिळत होतच , शिवाय फुल पाखरांची गर्दी पण जमा झालेली . रंग लुब्ध पाखर , रुंजी घालण्यात गुंग झालेली . मध्येच कुठंतरी फडया निवडुंग आपलं अस्तित्व ताठ मानेने करत होताच . बाभळीच्या झाडांची संख्या त्यात भर घालत होतीच . पिवळ्या जर्द फुलांची आरास व बाजुला लांब शेंगा व असंख्य काटेरी जाळ विणलेला हा प्राणी अगदी तटस्थपणे दिमाखात उभा होता.अगदी प्रौढ असल्या सारखा त्याच्या अंगावर अनेक गांठी मुळे बाभूळ प्रांजळ वाटत होता . त्याच्या गाठीतून झिरपणारा चिकट स्त्राव , त्यावर फिरणाऱ्या शिस्तबद्ध काळ्या
मुंग्या !
तशी ही पायवाट तुडवून तुडवून, मळवाटीत धुरळ्याने चिकट झालेली . बैलगाडी , जनावर , , अधुन मधून बकऱ्याचा तांडा घेऊन जाणारे धनगर यांच्या खास परिचयाची व आवडती वाट . जरा वरच्या अंगाला वळलंकी शेतीमळाच फुलेला होता . त्याच्या उजव्या बाजुला अखंड वाहणारा गोड्या पाण्याचा ओढा , झुळझुळ वहात होता . आजूबाजूला दाट झाडीत लपलेला ओढा . तसा बक्कळ रुंद होता. दाट हिरव्यागार झाडीत, अनेक पक्ष्यांचे घरटी नांदत होतीच . पण मनमोहून घेणारे मोर , लांडोर यांची दाट वस्ती सुखनैव जगत होती . त्यांच्या प्रभात समईच्या केका व त्याला मिळणारी साद , अवचित उतरणारे त्यांचे दिमाखदार समुह , मन प्रसन्न करीत होती .
ओढ्याच्या दोन्ही कडेला असणारी हिरवीगार शेती व त्यांची घरे सुद्धा टुमदार वाटत होती . मका गहू , हळद ,ऊस , सर्व प्रकारच्या भाज्या इत्यादी नी , हिरवं स्वर्गीय आंनद उपभोगणारा बळीराजा त्यात त्यांना मिळालेले निसर्गाचे वरदान . मध्येच कुठं तरी झाडाखाली मयूर नृत्य देखावा हे वैभव त्यांना कायमचंच नशिबी होत . एवढंच काय
चक्क सर्प व सर्पिण यांचं गळ्यात गळा घातलेलं प्रेम शृंगार नृत्य , हे पण कायमचच !
विविध पक्ष्यांचे आवाज व ओढ्यातील पाण्याचा आवाज यांची जुगलबंदी सुद्धा नेहमीची ! त्यांना त्यात काही अप्रूप वाटत नव्हतंच ! दोन्ही बाजुला ओढ्यात कपडे धुणी भांडी घासली जात होती व तेथील बायकांचा राबता हा पण नेहमीचाच . मध्येच कोणी बाळ चमु
पाण्यात मनसोक्तपणे डुंबत जलक्रीडा करणारा ,शैशवं जपणारा . घरातील झाडून सगळी जनावरे इथेच येऊन पाणी पीत असत . ओढ्या कडेने असणारी
उतरतीला शेळ्या मेंढ्या बकरी यांचं मुक्त संचार ! चुकून एखादेवेळी सलींद्र बाहेर पडत असे ! काहीवेळा
नागराजच दर्शन पण मिळत असे!
पण कोणत्याही प्राणी मात्रांचं भय कुणालाही नव्हतं ! व प्राण्यांना पण !
” जिओ और जिने दो” च राज्य दिलखुलास पणे मुक्त पद्धतीनं नांदत होत !
साखर कारखाने असलेतरी कैक गुर्हाळही गुळ करण्यात पटाईत होती . बाजुने जाताना त्याचा एक विशिष्ट असा वास येत होताच . त्यांचं काम सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत चालुच होत. येणारा जाणारा गूळ खाऊन , उसाचा रस पण पिऊन तृप्तीची ढेकर देत होताच .
तसं दिवस कासराभर वर सरकलेला . सूर्य डोक्यावर आलेला , राबणारे हात पाय जरा मरगळलेल्या अवस्थेत . अंगावर घामाच्या धारा ! अंगावर म्हणाल तर फक्त अर्धी चड्डी , अन मांजरपाटच शिवलेला बनियन उर्फ बदाम ! ते पण घामाच्या धारांनी रापलेले , कळकट झालेले . तस सगळे राबणारी कष्टकरी आपापल्या पाणवठ्यावर आली व यथेच्छ मनसोक्त गार पाण्यात अंघोळ करीत असत . सोबत अंग घसणीला चपटा दगड असणारच ! कुणाचं पम्प चालु होता , तर कुणाची स्वतः ची विहीर तर कोणी चक्क ओढ्यावर येऊन अंघोळी करत असलेली !
तस तेव्हढीच त्यांना अंघोळीने तरतरीतपणा आलेला दिसत होताच . त्यांची पावलं आता झपझप आपल्या पालाकडे वळली , पोटात आगीचा डोंब उसळलेला केव्हा एकदा भाकरी खाईन अस झालेलं
बऱ्याचजणानी घरून बांधून आणलेली शिदोरी सोडलेली . तर काहीजणांच्या बायका डोईवरन बुट्टीत जेवण बांधून
आणलेल्या असत . त्या पण आपल्या धन्या बरोबरच जेवण करत असत . राबणारी गडी जेवण करून सुस्त होत. वामकुक्षी साठी तिथंच, झाडाखाली आडवी होत असत .
काहीजण चंची सोडून सुपारीच खांड तोंडात टाकीत , वर पानांची देठ खुडून त्याला अंगट्याने चुना लावून तोंडाखाली दाबत असत . त्यावर तंबाकू चोळून जिभेवर अलगद सोडत असत . घटकभर विश्रांती झाली की, परत ताजेतवाने होऊन कामाला लागत . कोण भांगळण , कोण कोळपणी , कोण पाणी पाजवण अशी सगळी काम झाल्यावर , इकडे त्यांच्या बायका शेळ्या मेंढ्या म्हैस काही असतील त्या जनावरांना बांधावर चरण्यासाठी सोडत असत .
काही बायका मळ्यातील माळवा विविध भाज्या तोडून आपली टोपली भरून घेत असत . त्यातील काही घरी खाण्यासाठी ठेवून उरलेली त्या बाजारात विकत .
दिवस मावळत होता सावल्या जरा लांबलचक पडत होत्या . मावळतीला सप्तरंगाची उधळण चालू होती . केशरी नारंगी पिवळसर ! सूर्य एकदम मोठा लाल भडक होऊन मावळला . पक्ष्यांची गडबड चालू झाली . आपापल्या घराकडे परतण्याची त्यांना घाई झाली . चित्र विचित्र आवाज आसमंतात निघत होताच . मध्येच पांढऱ्या शुभ्र
बगळ्यांची माळ मावळतीकडे लयबद्ध सरकताना दिसत होती . जणू लांबलचक शुभ्र फुलांची माळ घेवून ते रानदेवतेला घालण्यास निघाले होते !
मध्येच खंड्या उच्च स्वरात चित्कार करीत गप्प झालेला . सुतार पक्षाची टकटक थांबलेली . एव्हाना पूर्ण सायंकाळ होऊन थंडीचा गारठा वाढलेला होता . तारांगण सजल होत मध्येच कुठंतरी वटवाघळाचा
समूह आवाज करीत झाडात गप्प होत होता . घुबडाच विशिष्ट ध्वनी आवाज भय कंपित करत असतानाच , टिटवीच पण केकाटण शांततेचा भंग करत होते .
बरीच मंडळी आपल्या पाणंदच्या रस्त्याने घर जवळ करत होते .. त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व शेंड , झाडीत आता रातकिड्यांची किरकिर !
रस्त्याने जाणारी जनावर ! त्यांच्या गळ्यातील वाजणार घुंगरुचा लयबद्ध आवाज . थंडीने आता धुक्याची चादर घातलेली . मध्येच मोरांचे केकाटणे चालू होतेच . कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज
गावची वेस आल्याची साक्ष देत होता .
गावात सगळीकडे दिवाबत्ती केल्याने धूसर लाल प्रकाश धुक्यातून दिसत होताच . घरातून धुरांचे लोट बाहेर पडत हवा कुंद करत होते . घराघरातून चुली पेटल्याची खात्री ती धूरकांडे देत होतीच .
जनावर आपापल्या जागी दावणीत गेली . मालकांनी त्यांना तिथंच दोरखंडानी बांधलं . पुढ्यात कडवळची वैरण टाकून दिली . काहीजण धारा काढण्यासाठी चरवीत पाणी घेऊन बसले . समोर पेंड ठेवली व म्हसरच्या पाठीवर थापट मारत , कास धुतली व धारा काढून त्यांनी काही दूध घरी ठेवलं . तर काही दूध डेअरीकडे मोर्च्या वळवला .
दूध घालून झाल्यावर चौकातल्या वडाच्या झाडाखाली जो तो बसकण मारतोच . वडाच झाड हे अबालवृद्धांसाठी नित्याचे ठिकाण झाले होते . जणू आधारवड च ! वडाच झाड हे कित्येक वर्षांपासून त्यांच्या सुखदुःखाच्या आठवणीत रमलेला होता . त्यांचा भागीदारी सोबती होता
कित्येक गावच्या डोई त्यानं आपल्या हयातीत बघितल्या होत्याच !
बरीच मंडळी जमली होती . लहान चिल्लीपिल्ली वडाच्या पारंब्या धरून झोके घेत हुंदडत होते . तर कष्ट करून कामानी दमलेली हात चिलमीचा आस्वाद घेत होते . चिलीम एका हातातून दुसऱ्या हातात फिरत होतीच ! कोण चंची सोडून पानांची देवघेव करत होता तर कोणी सुपारी कातरत , शिळोप्याच्या गप्पा मारत होता . कोण तम्बाकुचा बार भरत अंतराळी बोलत होता .
एव्हाना थंडीची लाट वाढली होतीच , प्रत्येकजण आपल्या मनातील दुःख ओकत होता . आणि हे सारं गप्पाष्टक तो पुराणपुरुष वड
ऐकत होताच . वेळ होईल तस प्रत्येकांनी आपली घर जवळ केली व घरात आल्यावर त्यांनी दरवाजे आतून बंद केले .
वड एकटाच थंडीत स्तब्ध राहिला होता ते पण धुक्याची शाल पांघरून . त्याला ही एकट राहयची सवय झालेली ! उन्ह ,पाऊस, वारा, थंडी, धुके ,दिवस रात्र ,चांदण , याची त्यांनी तक्रारही कधी केली नाही ! त्याचे पण कित्येक डोई इथंच नांदल्या !
तो मात्र आश्रम म्हणून जगण्यात धन्यता मानत होता ! कित्येक पक्ष्यांची घरटी त्याने अंगाखांद्यावर घेतली ! सर्प कपी सारखे प्राणी पण अंतकरणाने जवळ केले ! तो पुराण पुरुष
एकमेव सर्व घटनांचा साक्षीदार होता ! आहे ! राहील ! !

 

प्रा डॉ जी आर प्रविण जोशी
9164557779
भ्रमण ध्वनी

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + five =