You are currently viewing काना मात्रा वेलांटी
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

काना मात्रा वेलांटी

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम कथा*

*काना मात्रा वेलांटी…(.*कथा*)

तीन दिवस झाले.सुरुची रोज सांगते ,
“मम्मी मला निबंध लिहून दे! विषय आहे “मी कोण होणार?”
मी तिला रोज, आज नक्की सांगेन हं असं आश्वासन देते आणि कामाच्या पसाऱ्या पुढे मला तिचा निबंध लिहून देणं काही जमत नाहीय.
” मम्मी आजचा लास्ट डे आहे. उद्या मिस बुक्स चेक करणार आहेत .मला इन कम्प्लीट रिमार्क नकोय. देशील ना लिहून? मराठीतून लिहाचं आहे म्हणून तुला मस्का नाहीतर मीच लिहिलं असतं .मला पटापट मराठी शब्द आठवत नाही.”

तुझं मराठी इतकं काही वाईट नाही. तू लिहून तर बघ. मी दुरुस्त करून देईन.
“ते काही नाही. तू टाळतेस हं मम्मी.तुला निबंध सांगायलाच हवा. मागच्या वेळेस मिसने माझा निबंध वर्गात वाचून दाखवला होता.”
“छान! म्हणजे मी लिहायचा आणि शाबासकी तुला!”
” बरं. संध्याकाळी घरी आल्यावरआधी तुझा निबंध. मी कोण होणार. बस?”
” प्रॉमिस ?”
“प्रॉमिस.”
तेवढ्यात सुरूची ची रिक्षा आली. मी तिला टाटा करून घरात वळले. सुरुची शाळेत गेली.


मी कोण होणार? थोडा विचार करायला हवा. घड्याळात ठोके पडले. आणि विचार बदलले. सात ते दहा. तीन तास. त्यात कामाची तुडुंब गर्दी. विस्मया ची पण आज टेस्ट आहे. तिचा अभ्यास घ्यायलाच हवा. अगदी जवळ बसून, तोंडावर पांघरूण घेऊन झोपली आहे. तिला उचलून उठवावे लागणार. थोडं रडणं कुरकुर. पुन्हा गादीवर जाणं.डोळे धू. चुळ भर. घे हा ब्रश. घास दात. दूध पी. आंघोळ कर. लवकर अटप गं! मला उशीर होतोय. तुझं होमवर्क राहिलंय. घे ते दप्तर. काढ वही. रबर सापडत नाही. पेन्सिलीला टोक नाही. चल ग लवकर अटप. किती वेळ घालतेस. अजून तारा पण आली नाही.
शी बाई!मम्मी तुझी किती घाई! करते ना सर्व काही! आणि आज ते झाडावरचं ऑरेंज फुल मी मिसला देणार आहे.”
” हो. ते नंतर बोलु.”
” नंतर कधी? मम्मी, तुला वेळच नसतो आमच्याशी बोलायला.”
” हे बघ आधी तू टेबल्स म्हण. वर्णमाला काढ.त वर अनुस्वार दे म्हणजे पतंग हा शब्द होईल.”
” मम्मी अनुस्वार म्हणजे काय?”
” अनुस्वार म्हणजे टिंब”
” म्हणजे शब्दाला कुंकू लावायचं ना?”
विस्मया चे विनोद आणि हसणे. पण आपल्या जवळ इतका वेळ नाही.
” तुझ्या कल्पना पुरे! आज टेस्ट आहे ना तुझी?”
ताराला आज उशीर झाला तिला किती वेळा सांगितलंय्, सकाळी उशीर करू नकोस. एखादे वेळेस ती येणारही नाही. सांगून कधी रजा घेतली आहे?वाट बघायची आणि कामाला लागायचे. अजून संजय चा ब्रेकफास्ट करायचाय्.तारा आली नाही तर विस्मयाला शीला कडे पाठवावे लागेल. विस्मया तयार होणारच नाही. तिची मनधरणी करताकरताच वेळ जायचा.
ती म्हणेलच,” मम्मी तू सुट्टी घे ना.मी शिलाआँटी कडे जाणार नाही. मला प्रेम चा रिक्षातून जायला आवडत नाही. तो चिडवतो मला.
आली तारा. उशीर केल्याबद्दल ओरडायला हवं होतं पण जाऊ दे उगीच सारा दिवस खराब जायचा. आणि शिवाय कुणी मुद्दाम वागत नाहीअसं. तिच्या काही अडचणी असतील.
एकदा ती म्हणाली होती,”ताई एक विचारू का? रोजच ठरवते आज विचारीन, पण तुम्हाला टाईम भेटत नाय, म्हणून म्हणावं जाऊ दे. पण आता अगदी गळ्याशी आलया”
“काय झालं? बोल.” तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून अंदाज आला होता. पैसे वगैरे हवे असणार.
” बाई लेकीच्या लग्नाला, महिला बँकेतून तीन हजार रुपये घेतले होते.ते काही फेडणं झालं नाही मजकडून. कुठे कुठे पुरी पडू? उधार उसनवारी करून दिवस निघत आहेत. बँकेने केस केली आहे. हा बघा कोर्टाचा कागद.”
तिनं साडीच्या पदरात बांधलेल्या पेपराची घडी माझ्या हातात ठेवली.
” माझी झोपडी तारण ठेवली होती. पैसे नाही भरले तर जप्ती येईल. माझ्यासाठी एवढं करा. तेवढे पैसे भरून द्या. माझ्या महिन्यातून कापुन घ्या. काय बी करा. आणि गरज भगवा. मी तुमचे उपकार जन्मात विसरणार नाही. लई कठीण झालंया बगा. झोपडी गेली तर राहू कुठे? दोन लहान लेकरं हायेत. शिवाय एकटी बाई कपाळकरंटी. तुमच्याशिवाय हवाला तरी कुणाचा मला? ”
बोलता-बोलता तारा रडू लागली. तसे हालच आहेत. शिवाय या बायकांचे नवरे असले काय नी नसले काय? त्यांच्या पीडा आहेतच. शिवाय ताराला माहेरचं कोणी नाही. तिचा भाऊ आहे. पण तोच हलाखीत. सासरी विचारत नाही कुणी.
तरीही मी म्हटलं,” का ग तुझे एवढे तीन-तीन दीर आहेत तुला काही मदत करत नाहीत?”
” कर्म त्यांचं !ही कापड गिरणी बंद पडली. आणि बेकार झालेत सर्व. कुठे मिळेल तिथे मजुरी करतात. असलं तर काम नाही तर असेच. त्यांच्यापासून काय मी अपेक्षा ठेवणार बाई? तुमची कंपनी देते ना कर्ज! तिथून काहीतरी करा ना??”
या बायकांच्या परिस्थितीची दया येते. पण मागे एकदा पारुच्या वडिलांना चहाची गाडी टाकण्यासाठी, एका बँकेतून, माझ्या ओळखीने कर्ज मिळवून दिलं. तर दुसऱ्याच महिन्यात त्यांनी पैसे मस्त वापरले. चैन केली. पुन्हा हातावर हात चोळत बसला. हफ्ते भरलेच नाहीत. मी मात्र विना कारण अडकले. गॅरंटी दिली होती मी. नकोच त्या भानगडीत पडायला.
” हे बघ! एक कर्ज फेडता आलं नाही. दुसरं कसं फेडशील ?इतके दिवस महिन्याच्या महिन्याला थोडेसे पैसे भरले असते तर फिटले नसते का कर्ज? शिवाय तू कामावर ही वेळेवर येत नाहीस. सारख्या रजा घेतेस. महिना तरी पुरा होतो का तुझा. मला काही जमणार नाही बाई! तू तुझं बघ.
मग काही न बोलता तारा गेली. त्यानंतर ताराने कधी विषय काढला नाही. मीही कधी विचारले नाही.
आज एकदम आठवण झाली. मधूनच सुरुचीच्या निबंधाचा विषय डोक्यात घोळत होता., मी कोण होणार?, एखादी समाजसेविका?
डोळ्यासमोर एक चित्र आलं. ब्रिज खालची वस्ती. जवळ जवळ असलेल्या अनेक पत्र्याच्या झोपड्या. ओला चिखल .कचऱ्याचे ढीग. घणघणणाऱ्या माशा. वाहणारे नळ. उघडी नागडी पोरं. शेंबडी मळकट.. दारू पिऊन खाटेवर लोळणारी सुस्त माणसं. आणि फाटक्या लुगड्या खाली स्तन्य करणाऱ्या, विटलेल्या बायका.काही सरकारी वर्दी घातलेली, चष्मा लावलेली माणसं, एका झोपडी जवळ फुटकळ सामान बाहेर काढत आहेत. हातात स्टॅम्प पेपर. कोणीतरी तारा चा डावा हात उचलला. इंक पॅडवर अंगठा दाबला आणि ठसा घेतला. रडणारी तारा, तिला बिलगलेली तिची मुलं, झोपडीजवळ सारी गर्दी जमलेली, अगदी एखाद्या हिंदी पिक्चर मधला सीन. आणि इतक्यात… श्रीदेवी किंवा जयाप्रदा गर्दीतुन वाट काढत आली.
” ठहरो! ही बघा कोर्टाची ऑर्डर. थांबवा हे सारे. तिचं घर तिला परत द्या. दूर व्हा सा!रे या घरावर फक्त तिचाच हक्क आहे. मग ती तारा जवळ गेली. तिच्या पाठीवर हात ठेवला. तिच्या मळकट मुलांचे पापे घेतले. मग म्युझिक गाणं वगैरे वगैरे… आणि सर्व आनंदी आनंद.
खरंच समाजसेविका होणच योग्य. बरंच काही लिहिता येईल. करू विचार. संध्याकाळपर्यंत पुष्कळ मुद्दे सुचतील.
तारा कामावर आल्यामुळे दिवसाचा कार्यक्रम बिघडला नव्हता. सारं काही वेळेस होणार होतं. रोज सकाळी काही वेळ येणार हे दडपण थोडं उतरलं. .अॉफिसची वेळ झालीच होती.
आता स्कूटर नीट सुरू झाली तर बरं! नाहीतर उगीचच उशीर व्हायचा. काल पेट्रोल भरायला हवं होतं. संजय नेहमी रागावतो.गाडी रीझर्वला येईपर्यंत तू पेट्रोल भरत नाहीस.
पण आज मी ऑफिसला वेळेवर पोहोचले.
घर आणि ऑफिस हे अंतर पार करताना जो वेळ लागतो. त्या वेळात, माझ्या व्यक्तित्वात बदल झालेला असतो. आता माझ्या डोक्यात ऑफिसचेच विचार. तारा, विस्मया ची टेस्ट, संजय चे टोमणे, सुरूची चा निबंध डोक्यात नाही.

कालचे डे बुक आऊट होतं. फारच फरक होता. आज प्रथम ते टॅली करावं लागेल. शिवाय इतर प्रॉब्लेम्सआहेतच. मिलवानीने हाऊसिंग लोन घेऊन घर बांधलं आणि विकलं. हेड ऑफिस मधून चौकशी चालू आहे. गेले सहा महिने तो विदाऊट पे रजेवर आहे. त्याच्यावर ॲक्शन अंडर डिसिप्लिन होणार.
आज एक व्यक्ती मला भेटायला येणार आहे
रमीला काटदरे.
काटदरे आमच्याच बॅचला होता. त्याची ही बायको. दोन वर्षापूर्वी काटदरेची नागपूरला बदली झाली होती. सर्व नाद होते त्याला. चिक्कार प्यायचा अलीकडे .सस्पेंड केला होता त्याला. ऑफिसमध्ये पिऊन यायचा म्हणून. बायकोने डिवोर्स घेतला होता. एक मुलगी होती त्याला. शेवटी काही महिन्यांपूर्वीच संपला. लिवर सिरॉसिस! खोलीत तीन दिवस प्रेत पडले होते म्हणे! म्युनिसीपालीटीच्या गाडी वरून नेला त्याला. नागपुर ब्रांच मधल्या शिपायाला काय वाटले कोण जाणे ! रस्त्यावरून त्याचे प्रेत जात असताना धावत जाऊन त्याने पांढऱ्या ,सुकलेल्या फुलांचा हार त्याच्या प्रेतावर टाकला.
काटदरे चा कसा बेवारशी शेवट झाला. सगळे असूनअनाथ! स्वतःच्या जीवनाचे अशी लांच्छनास्पद अवस्था करून घेतल्यानंतर मरताना यांना काय वाटत असेल? मरणार्‍या माणसाच्या अंत: चक्षू समोरून स्वत:च्या जीवनाचा एक चित्रपट सरकून जातो अस म्हणतात. काटदरे ने या चित्रात स्वतःला कसं पाहिलं असेल? मरताना निदान त्याच्याच पेशीतून तयार झालेली त्याची निष्पाप बालिका त्याला दिसली असेल का? तिच्या उरलेल्या भविष्याबद्दल तरी त्याला खंत वाटली असेल का?
आज त्याची बायको मला भेटायला येणार आहे. प्रॉव्हिडंट फंडावर तिने मुलीच्या नावे क्लेम केला आहे. मॅटर तसं सरळ नाही. युनीअन सेक्रेटरी ही मिटींगला हजर राहणार आहेत. मॅनेजमेंट च्या वतीने मला हे प्रकरण हाताळायचे आहे. काटदरेचे ड्युज बरेच आहेत. पण तसा तो सिनिअर होता. सर्व्हिस बरीच वर्ष झाली होती.
कशी असेल त्याची बायको? कुठल्यातरी प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. माहेरीच असते. एक स्त्री म्हणून मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. एका पुरुषाच्या बेजबाबदार बेताल व्यसनाधीन पणामुळे बळी पडलेल्या जीवनाची, साक्षीदार म्हणून मला तिच्याबद्दल अनुकंपा वाटत होती. पण नियमात बसेल तेवढीच मदत मी तिला करू शकणार होते.
आज फारच रेस्टलेस झाले होते मी. त्यातून सुरूचीने या निबंधाच्या विषयाचा किडा उगाचच माझ्या मनात वळवळत ठेवलाय.” मी कोण होणार?”
काहीतरी महत्वपूर्ण व्यक्ती बनून समाजाचे ऋण फेडावे असे लहानपणी मला फार वाटायचं. आपण डॉक्टर व्हावं डॉक्टरच्या गळ्यात अडकवलेल्या स्टेथॉस्कॉपची मला फार मजा वाटायची. पण आता वाटतं कशाला काही अर्थ उरला आहे का? पदवीपूर्व भ्रष्टाचार आणि पदवीनंतरही भ्रष्टाचार. त्यादिवशी राम स्वरूप ने मुलगा पास झाला म्हणून पार्टी दिली. एका हातात ड्रिंकचा ग्लास आणि दुसरा हात पोराच्या पाठीवर.
” बेटा पास हो गया हमको फिकर नही. हम कितना भी पैसा लगायेगा. कही ना कही इंजिनीयर को भेजही देंगे उसकोा.”
एका मार्गाने अॅडमीशन हुकली म्हणून विनु निराश झाला होता. रात्रीचा दिवस करून अभ्यास केला होता त्याने. मध्यमवर्गीय आई वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्याने कसून मेहनत केली होती. बऱ्याच वेळा माझ्याकडे डिफिकल्टी सोडवायला यायचा. मॅथ्स मध्ये मी त्याला खूप मदत केली होती. खरं म्हणजे मलाही फार उजळणी करावी लागायची. पण मजा वाटायची.
एक दिवस तो म्हणाला होता,” मावशी, तुम्ही टीचिंग लाईन घ्यायला हवी होती. खूप छान शिकवता तुम्ही.विनूने कॉम्प्लिमेंट्स दिल्या तेव्हा बरं वाटलं होतं पण आता तो स्वतः इतका हताश झालाय् की त्याची काळजी वाटते.
निबंध थोड्या निराळ्या कोनातून लिहावा. मी कोणीच होणार नाही. ध्येय, महत्त्वाकांक्षा याला काही अर्थ आहे का! मी चांगली होणार की वाईट होणार हेही ठरवू नये. मी वाईट झाले तर माझ्या विवेकबुद्धीला ते टोचत राहिल. आणि मी जर चांगली झाले तर? चांगली म्हणजे सत्यवादी, नीती प्रिय, स्वाभिमानी, तत्त्वांना महत्व देणारी वगैरे वगैरे…. त्यापेक्षा एक मातीचा गोळाच रहावे. जसा आकार मिळत जाईल तसं आकारत जावे. मनाशी कुठली आकांक्षा बाळगणं म्हणजे हवेला धोपटणं आहे. पण हा फारच निराशाजनक विचार झाला व्हेरी मच पेसिमिस्तिक. सुरुची अजून लहान आहे. तिच्यावर हे असे नकारात्मक संस्कार करणे योग्य नव्हे. जीवनाविषयीचा तिचा दृष्टीकोन गढूळ होईल. मी कोण होणार या विषयावर पारंपारिक निबंध लिहायला हवा. म्हणजे पिढ्या नी पिढ्या चालत आलेले आदर्श. उदात्त, ध्येयवादी.

 

सुरुचीच्या आणि माझ्या वयातलं अंतर! ती उमलणारी बालिका आणि माझे पक्व मन.खऱ्या खोट्यातून गेलेली मी. जागोजाग धुक्कळ पसरलेले. पण तरीही मला हे अंतर पार करून तिच्या लेव्हल पर्यंत जायला हवेच.

ऑफिसातला हाही दिवस माझा नेहमी प्रमाणे गेला. कामात गुंतलेला.मिलवानीची चार्जशीट तयार झाली. रमीला काटदरे येऊन गेली. वाटत होती तेवढी ती लेचीपेची नव्हती. चांगली संतुलित आणि कणखर दिसली.
लंच टाईम जरा हलकाफुलका रिकामा गेला.
सुरेंद्र पांडे भविष्य पहायचा. तो सहज म्हणाला
” मॅडम आज मी तुमचा हात पाहतो.”
तशी स्टाफशी माझी रिलेशन्स खेळीमेळीची आहेत. कधी कामापुरते वाद-विवाद होतात. वातावरण उष्ण आणि गढूळ होते. पण पुन्हा उडालेला धुरळा जमिनीवर बसतो आणि हवा मोकळी स्तब्ध शांत होते.

सुरेंद्र ला मी हात दाखवला.
” हं बघा.
त्यांनी माझा हात उलटासुलटा करून पाहिला. सांगितलं मात्र काहीच नाही. शेवटी मीच कंटाळून म्हणाले,
” अरे! काहीतरी सांग. वाईट असलं तरी चालेल मला.”
” मॅडम तुम्ही फार चांगल्या आहात!पण तुम्हाला चंद्रबळ कमी आहे. त्यामुळे मानसिक सौख्य कमी. तुम्ही सगळ्यांसाठी झटता. पण तुमच्या कृतीचे सगळीकडेच चुकीचे अर्थ निघतात. पण आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्ही बऱ्याच अध्यात्मिक बनाल.”
” का कोण जाणे! पण थोडीशी मी डिप्रेस्ड झाले. क्षणभर मनात आलं सुरेंद्र ला खरंच कळत असेल का काही .थोडेसे त्यांनी बरोबर हे सांगितले. पण मनाला बजावलं. आपण बुद्धिवादी आहोत. one must master our stars या विचारांचे आहोत. मनाची अशी घसरगुंडी होता नये.
पुन्हा केबिनमध्ये गेले. उगीचच माझीच केबिन मला नव्यासारखी आणि परकी वाटू लागली. भिंतीवरचे गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस ,इंदिराजींचे फोटो कोपर्‍यातली पृथ्वी, टेबलावरच्या ग्लास मधून दिसणारी कॅलेंडर्स,मॅथेमॅटिकल टेबल्स, कुणाकुणाचे पत्ते, वुमन मॅगझीन मधले माझ्या मुलाखतीचे कात्रण. पण त्या सर्व नीरस, रंगहीन कागदामध्ये एक चित्र होतं! विस्मयाने काढलेले. अनेक रंगांनी रंगवलेलं. एक घर होतं. पक्षी होते. उंच झाडे होती. दोन समांतर रेषा घरापासून निघालेल्या.ती एक वाट होती. दूर दूर जाणारी. या टोकापासून त्या टोकापर्यंत.
संध्याकाळची वेळ. दिवस संपत आल्याची चाहूल देणारी.
ऑफिस ते घर. परतीचा प्रवास. पुन्हा घराचे विचार. सकाळचं विस्मयाचं ठणठणीत बोलणं आठवलं.
” तुला वेळच नसतो आमच्याशी बोलायला.”
आजचा दिवस मात्र चांगलाच समजायचा. नाही तर रोज काही ना काही कारणावरून ऑफिस मधून परतायला उशीर होतोच. आज ऑफिसर्स कोआॅर्डीनेशन मिटींगला जाण्याचे टाळले म्हणून. पुढल्या सेशनला चंद्रमणी बोलेलंच काहीतरी. नोकरी करणाऱ्या स्त्रियांविषयी त्याला फारच राग आहे. म्हणजे तसं आपण कधीही मिटिंग चुकवत नाही पण आज सकाळीच सुरुची ला प्रॉमिस केले होते . तिचा निबंध आज लिहून दिलाच पाहिजे.
मी कोण होणार.?
अजून काही ठरलं नाही. स्कूटरवरून जाताना समोरून चेहऱ्यावर येणारा वारा कसा सुखद वाटत होता! हा वारा, ही गती, मला फार आवडते. मनातल्या विचारांना एक ठेका देते.. आज काय झालं असेल ते असो, पण उद्या नक्की चांगलं होईल असा आशावाद निर्माण करते. आज सिग्नल पाशी ही थांबावं लागलं नाही. समाधान वाटलं. तेवढाच वेळ वाचला.
घरी आले तेव्हा सुरुची खेळायला गेली होती. विस्मयाला अमृता घेऊन गेली होती. काय केले टेस्ट मध्ये कोण जाणे! बहुतेक नीट केली असणार. तसा व्हेरी गुड रिमार्क असतोच तिला. तारा ही सर्व आवरून माझीच वाट पाहत होती. मी वाॅश घेतला. हाऊस गाउन चढवला. ताराने गरम चहा आणून दिला. तो घेतला. हातात वही पेन्सिल घेऊन बसले. सुरुची येईपर्यंत काहीतरी मुद्दे काढून ठेवू या. सुरूची चा निबंध चांगला झालाच पाहिजे.
टेबलवर वही होती सुरूचीची . शेवटच्या पानावर पेन्सिलीने काहीतरी लिहिले होते.
मी कोण होणार? डॉक्टर, इंजिनियर, पत्रकार, पुढारी, समाजसेविका, गायिका की चित्रकार? नको रे बाबा!! यापैकी मला काहीही व्हायचे नाही. मी सांगू? मला कोण व्हायचंय?
आई …
एक चांगली आई . म्हणजे विद्वान नव्हे. ऑफिसात जाणारी आई नव्हे. मला मुलांवर कधीही न चिडणारी, सदैव प्रेमाने वागणारी, मुलांशी खेळणारी, गप्पा मारणारी, हसरी, खेळणारी आई व्हायचे आहे. श्यामच्या आई सारखे. रात्री झोपताना गाणं म्हणणारी. गोष्टी सांगणारी. आई होणं किती महान आहे! जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी! या जगातली चांगली आईच कुठेतरी हरवलेली आहे.
पुढच्या ओळी मला दिसल्साच नाहीत. माझे डोळे पाण्याने डबडबले. ही माझी अकरा वर्षाची मुलगी विचार करू शकते? तिच्या बाल मनातून ओघळलेले नैसर्गिक भाव! शब्द चुकले असतील. काना, मात्रा वेलांट्या कुठेकुठे राहिल्या होत्या. चुका शुद्धलेखनाच्या होत्या. पण विचार प्रामाणिक आणि निडर होते. आयुष्याला ही असेच व्याकरण असते का? काना मात्रा वेलांट्या तिथेही असतात कां? जशा त्या शब्दाला आकार देतात, अर्थ देतात. त्या चुकल्या तर शब्दाचा उच्चार बदलतो. शब्द बेढब, अर्थहीन बनतो. सुरुची चे शुद्धलेखन सुधारण्याचा मला अधिकार आहे का? तिचे विचार पुस्तकी नव्हते. ते सहजस्फूर्त होते. कसल्यातरी उपोषणामुळे निर्माण झालेला तो विद्रोह होता. एका चौकटीतल्या सुंदर चित्रातला न दिसणारा,तो एक प्रमाण चुकलेला आकार होता. तो टिपून घ्यायला एखाद्या कलाकाराची दृष्टी हवी. डोळे झाकले म्हणून दोष जात नाहीत. जे एखाद्याला सुंदर दिसतो ते दुसऱ्याला तसं दिसेलच असं नाही. सुरुची ने लिहिलेल्या त्या ओळी वाचून मी एकदम पराभूत झाले. मी कोण होणार होते, कोण झाले, मला काय मिळालं ?


धपकन सुरूची ने माझ्या गळ्यात हात घातले.
” मम्मी केव्हा आलीस? आणि मी लिहिलेलं तू वाचलंस मम्मी? मी असंच लिहिलं. गंमत म्हणून. मला वाटलं म्हणून. आय डोंट मिन ईट मम्मी! आय लव यु व्हेरी मच! मेरी अच्छी मम्मी! चल आपण परत लिहूया. फेअरबुकमधे असं काही लिहून चालणार नाही. दुसरं काहीतरी लिहूया.
मग मी सुरुचीचा एक पापा घेतला.
” नको काय हरकत आहे हेच लिहिलं तर? हे छान आहे. खूप सुंदर लिहिले आहेस तू. तेवढे काना, मात्रा, वेलांट्या कुठे कुठे विसरली आहेस.. तेवढं दुरुस्त कर…..

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + seventeen =