You are currently viewing कोचरे मागासवर्गीय वस्तीच्या नावात बदल करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश

कोचरे मागासवर्गीय वस्तीच्या नावात बदल करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश

सरपंच सौ साची फणसेकर यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

वेंगुर्ला

तालुक्यातील कोचरा मागासवर्गीय वस्तीचे असलेले हरीजनवाडी हे जातीवाचक नाव बदलून वाडीचे नाव “अशोकनगर” असे नामकरण करून मिळण्यासाठी वाडीतील ग्रामस्थ गेली ४ वर्षे सरपंच साची फणसेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करत होते. मात्र प्रशासकीय दृष्ट्या याला तांत्रिक अडचणी येत होत्या. परंतु त्यावर योग्य तोडगा काढून या वाडीचे नाव बदलण्यात येईल असे आश्वासन सरपंच सौ फणसेकर यांनी दिले होते. त्यानुसार योग्य तो पत्रव्यवहार सरपंचांनी शासनाकडे केला.


महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ निर्णय २ डिसेंबर २०२० अ. नु. क्र. २ विभाग सामाजिक न्याय विभाग यांच्या आदेशाने अनुसूचित जाती आणि जमातीसाठी हरिजन हे संबोधन वापरले जाते. मात्र सदरचा शब्द अपमान, अहवेलना, मानहानी करणारा व असंविधानिक असून अनुसुचित जाती जमातीच्या समुदायाला तो मंजूर नाही. त्यामुळे हरिजन हा शब्द न वापरण्याकरता शासनाचे आदेश झालेले आहेत. या आदेशान्वये सरपंच यांनी वाडी बदलाचा ठराव ग्रामपंचायतच्या मासिक सभेत करून त्या वाडीचे नाव बदलून “अशोकनगर” असे नामकरण केले.
त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या अशोकनगर फलकाचे अनावरण या वाडीतील ग्रामस्थ बापू कोचरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व सरपंच सौ फणसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अनावरण करण्यात आले. यावेळी कोचरे सोसायटी चेअरमन ब्रिजेश तायशेटये, जेष्ठ शिवसैनिक बाळा हंजनकर, माजी उपसरपंच अनंत म्हापणकर, तलाठी श्री ठाकूर, आरोग्यसेवक संभाजी आचरेकर, ग्रा. प. सदस्य, ग्रामसेवक श्री भोई, ग्रामपंचायत कर्मचारी व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच यांच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून सरपंच यांचे आभार मानले आहेत. तसेच यावेळी सरपंच यांनी या वाडीतील राहिलेली सर्व विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन ग्रामस्थाना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा