You are currently viewing कळणे मायनिंग….घात अपघात

कळणे मायनिंग….घात अपघात

भविष्यासाठी धोक्याची घंटा

विशेष संपादकीय…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली कित्येकवर्षे रेडी येथे मायनिंग उद्योग सुरू होता, गावात बऱ्याच प्रमाणात आर्थिक सुबत्ता आली, कित्येकांना काहीवर्षं रोजगार मिळाले. समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आणि जमिनीखाली प्रकट झालेल्या द्विभुज गणेशाच्या आशीर्वादाने अभिजात सौंदर्य लाभलेलं सुंदर रेडी गाव आज तेच सौंदर्य टिकवून आहे का? वर्षाचे बाराही महिने रेडीच्या रस्त्यांवर, रस्त्याच्या कडेच्या घरांमध्ये धुळीचं साम्राज्य असतं, रस्त्यावर डांबर आहे की नाही हे शोधूनही समजत नाही. कनयाळ गावात जाणाऱ्या रस्त्यावर तर दुचाकी देखील चालवू शकत नाही अशी परिस्थिती असताना खरंच गावात सुरू झालेल्या मायनिंग उद्योगाने गावकऱ्यांना सुख समाधान मिळालं का? हा प्रश्न मात्र आजही दोलायमान राहिला आहे.


कळणे ता.दोडामार्ग येथे मायनिंग सुरू करण्यासाठी प्रयत्न होत असताना गावाने जोरदार विरोध केला. अनेक विरोधाच्या सभा झाल्या, जनसुनावणी झाली. प्रत्येकवेळी गावाने विरोधाची भूमिका कायम ठेवली. परंतु तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी कळणे गावात हा लोहखनिज प्रकल्प आणला व आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्यांच्या मुलाच्या मिनरल्स अँड मेंटल्स या मायनिंग कंपनीला लोहखनिज उत्खनन करण्यास परवानगी मिळवून दिली. जनसुनावणी, ग्रामसभा वगैरे सरकारने गाव पंचायतीला दिलेले अधिकार हे सरकारच्या मंत्र्यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यापुढे थिटेच पडतात तसंच काहीसं कळणे येथे झाले. कळणेतील डोंगराळ जमिनी चढया भावाने आधीच खरेदी केल्या गेल्या, त्यामुळे जमीन मालक म्हणून विरोध दाखवणारे कागदावर राहिलेच नाहीत. आणि लोकांना काही समजण्याच्या आधीच कळणेत मायनिंग कंपनीचे बुलडोझर घुसले. लोकांनी प्रखर विरोध केला, मारामारी, दगडफेक, आंदोलने बरंच काही झालं. मायनिंगला पाठिंबा देण्यासाठी राणेंचे समर्थक जिल्हाभरातून कळणे येथे दाखल झाले, गोरगरिबांना त्यांनी मारले,त्यामुळे जो तो सैरावैरा पळू लागला. सुरक्षा रक्षक देखील गावकऱ्यांचा रौद्रवतार पाहून पळू लागले त्यात कंपनीचा एक सुरक्षारक्षक मारला गेला आणि तिथेच गावात सुरू झालेल्या विरोधाची हवा गेली. आंदोलनकर्त्यांवर खुनाचे गुन्हे दाखल झाले, आंदोलक भूमिगत झाले आणि कळणे मायनिंगचा मार्ग सुकर झाला.


कळणे मायनिंग मधून गावात सुबत्ता येणार, नोकऱ्या रोजगार उपलब्ध होणार अशी रोजदार लॉबिंग करण्यात आली. गावातील लोकांना आमिषे दाखवली गेली, अनेकांना आर्थिक मदत देत डंपर घेण्यासाठी सहकार्य करण्यात आले, काहींना छोटी मोठी कंत्राटे दिली गेली आणि कळणे वासीयांचा मायनिंग विरोध मावळला, तिथेच गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला होता. मुळात कळणे गाव हा आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेला नदीच्या काठावर बारमाही पाणी असलेला सुंदर गाव. अगदी कळणे नदीचे पाणी गोव्यातील चांदेल वगैरे गावांमध्ये पिण्यासाठी वापरतात. अनेक कुटुंबाचा रोजगार स्वमालकीच्या नारळ फोफळीच्या, काजूच्या बागांवर चालायचा. आंतरपिके म्हणून केळी, अननस, मिरी, जायफळ सारखी मसाला पिके घेतली जायची. जवळपास ६०० हेक्टरवर १००% अनुदानातून काजू लागवड केली त्यातून लाखोंचे उत्पन्न यायचे. त्यामुळे गावकऱ्यांना निसर्गाचा, पर्यावरणाचा ऱ्हास करून वेगळा रोजगार शोधण्याची गरज नव्हती. त्यामुळे काहींना स्वतःच्या ऐहिक सुखापुढे गावाचं सुख दिसलंच नाही, आणि एकदा का राज्यकर्त्यांना गावातील लोकांना मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा स्वतःला मिळणारे उत्पन्न जास्त दिसलं की कितीही विरोध झाला तरी तो साम दाम दंड वापरून मोडून काढता येतो. तसंच कळणे गावात झालं आणि आज संपूर्ण कळणे गावाची परिस्थिती भीक नको पण कुत्र आवर अशी झाली आहे.


२०१३ मध्ये इको सेन्सिटिव्ह झोन साठी झालेल्या सुनावणीत गावाने २ विरुद्ध १५६ मतांनी इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध केला तेव्हा तर मायनिंग कंपनीला रान मोकळे झाले. त्यानंतर आजतागायत गावकऱ्यांनी कंपनीमुळे होत असलेल्या नुकसानीच्या, विहीर, ओहोळचे पाणी दूषित होण्याच्या अनेक तक्रारी केल्या परंतु अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्षच केलं. २०१९ मध्ये कंपनीच्या प्रकल्पात एक दुर्घटना घडली, दोन कामगार खोदलेल्या मायनिंगचा डोंगराचा कडा कोसळून दुर्घटना घडली त्यात एक कामगार मृत्युमुखी पडला होता तर एक वाचला होता. परंतु खाणीत कोणालाच प्रवेश नसल्याने नक्की खाणीत काय घडले हे त्यावेळी समजले नव्हते. खाणीत अंतर्भागात माती कोसळत असतेच म्हणून कोणाला तिथे प्रवेश नसतो. या घटनेनंतर केंद्र सरकारच्या खाण सुरक्षा महासंचालनाने चौकशी करून अपघाताच्या छायाचित्रांसह इशारा देणारी सावधगिरीची (caution notice) नोटीस दिलेली होती. त्याची माहिती सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. खोदकाम करताना बेंचमार्क चा नियम योग्य पद्धतीने पाळला न गेल्याने कडे निर्माण झाले आहेत, त्यामुळे खाण धोकादायक होती म्हणूनच खाण सुरक्षा महासंचालनालयाने सुरक्षा नोटीस दिली होती, परंतु खनिजकर्म विभागाच्या दुर्लक्षामुळेच २९ जुलै २०२१ची घटना घडली. त्यामुळे कळणे गावात घडलेल्या घटनेला खनिजकर्म विभागच जबाबदार आहे. वेळीच खाण सुरक्षा महासंचालनालयाच्या नोटिशीवर कारवाई करत उत्खनन बंद केलं असतं तर आजची ही घटना घडलीच नसती आणि गावाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले नसते. कंपनीच्या आणि खनिजकर्म विभागाच्या दुर्लक्षामुळेच खोदकाम करून खिळखिळा केलेला बेंचमार्क योग्य न पाळलेला डोंगराचा कडा कोसळून माती आणि पाणी जोरदार गावाच्या दिशेने सखल भागाकडे धावू लागले. त्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की रस्त्यावरील मोरीचे पाईप मातीने बंद होऊन माती मिश्रित पाणी रस्त्यावरून जवळपास तीन तास वाहत होते. दुसऱ्यांदा कोसळलेल्या कड्याने तर माती मिश्रित पाणी गावातील घरांमध्ये, बागांमध्ये, शेतीत घुसले. वीस पंचवीस घरांतील लोक जीव वाचविण्यासाठी पळत सुटले होते. मातीचा घातलेला बंधारा फुटल्याने मातीचा भलामोठा थर बागेत, शेतजमिनीत साचला. लोकांच्या कोंबड्या देखील वाहून गेल्या, गाडल्या गेल्या. अनेक झाडे डोंगरावरून वाहून आली. सगळीकडे तेलाचा तवंग पसरला. विहिरी गाडल्या गेल्या, नदीत पाणी आणि माती घुसल्याने नदीचे पाणी दूषित झाले. कळणे सहित गोव्यातील काही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला, लोकांचे पुढील पंचवीस तीस वर्षे भरून न येणारे नुकसान झाले आहे.
कळणे मायनिंगमध्ये घडलेल्या घटनेने मायनिंगला पाठिंबा देणाऱ्यांना भविष्यातील धोक्याचा साक्षात्कार झाला असेल परंतु आज नक्कीच पश्चाताप करून काहीही उपयोग होणार नाही. कळणे भागातील पर्यावरण, जैव विविधता, शासकीय वन, पट्टेरी वाघांसह परिसरात असलेला वन्य प्राण्यांचा संचार, स्थानिक आणि पर्यावरण प्रेमींचा विरोध तसेच भविष्यात याहूनही भयानक घटना, प्रसंग गावावर येऊ नये यासाठी कळणे मायनींग बंद होणे हीच काळाची गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा