You are currently viewing महाराष्ट्रभर वणवा भडकला तर उद्धव ठाकरेच जवाबदार

महाराष्ट्रभर वणवा भडकला तर उद्धव ठाकरेच जवाबदार

*भाजप नेते निलेश राणे कडाडले ; कुडाळात ओबीसी समाजाची वज्रमूठ*

कुडाळ :

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे. त्यामुळेच ओबीसी समाज आज रस्त्यावर उतरला आहे. ही फक्त सुरुवात आहे, समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला आणि संतापाचा वणवा महाराष्ट्रभर पसरला तर त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची राहील, असा गंभीर इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस खासदार निलेश राणे यांनी दिला. ते कुडाळ येथे झालेल्या ओबीसी समाजाच्या चक्का जाम आंदोलनात बोलत होते.

रद्द झालेले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा बहाल करण्याच्या मागणीसाठी तसेच निष्क्रिय राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आज कुडाळ येथे ओबीसी समाजातर्फे चक्काजाम  आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

आपल्या भाषणात राणे यांनी राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे, त्याचे परिणाम काय होतील याची राज्य सरकारला कल्पना आहे का ? असा सवाल त्यांनी केला. आज एक दिवसाचा चक्काजाम झाला आहे. उद्या हे आंदोलन कुठवर जाईल ? भर पावसात तुम्ही सारे आपल्या हक्कासाठी जमला आहात कारण तुम्हाला या प्रश्नाचे गांभीर्य कळले आहे.

मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजिबात माणुसकी नाही. संजय राऊत रोज सामन्यातून दुनियाभरच्या विषयांवर अग्रलेख खरडतात, मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी एक शब्द लिहिलेला नाही. सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम यांनी आपल्या हक्कांसाठी एक झाले पाहिजे. सरकारच्या पाठीत लाथ घातल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही, अशी टीका राणे यांनी केली.

कुणीतरी पाऊल पुढे टाकल्याशिवाय क्रांती घडत नाही. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत म्हणून आपण सारे परिणाम भोगतोय. जेव्हापासून ठाकरे सरकार सत्तेवर आले तेव्हापासून महाराष्ट्राला पनवती लागली आहे. यांच्या निष्क्रियतेमुळे रोज एक नवा विषय उद्भवतो आणि त्याची सोडवणूक करता करता दुसरे संकट आलेले असते. आणि त्याला ठाकरे सरकारच जबाबदार आहे, असा आरोप निलेशजी राणे यांनी केला.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आवश्यक असलेला डेटा गोळा करण्यासाठी सरकारकडे वेळ होता. तो वेळेत का दिला नाही ?समाजाला का रस्त्यावर उतरावे लागले ?डेटा राज्याचा द्यायचा होता, जगाचा नाही. काहीही झाले तरी केंद्राकडे बोट दाखवणे हाच राज्य सरकारचा एकमेव उद्योग आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत केंद्राचा काहीही संबंध येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजन तेली,आमदार नितेश राणे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संजना सावंत, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर,ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,आनंद शिरवलकर,रुपेश कानडे,पप्या तवटे,राकेश कांदे आदी पदाधिकारी तसेच ओबीसी प्रवगातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी,ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने कुडाळ ह्या ठिकाणी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 6 =