शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे उद्यापासून जिल्हा रुग्णालयात लसीकरण

शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे उद्यापासून जिल्हा रुग्णालयात लसीकरण

विद्यार्थ्यांनी लसीकरण करुन घ्यावे – पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे उद्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आवर्जून याचा लाभ घ्यावा आणि लसीकरण पूर्ण करावे असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या लसीकरणाच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी याबाबत माहिती घेऊन निर्देश दिले. या बैठकीला खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्याकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब आदी उपस्थित होते.

            जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील लाभार्थी उच्च शिक्षणाकरिता परदेशात जाऊ इच्छित असतील, त्यांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे असे निर्देश पालकमंत्री श्री. सामंत यांनी आरोग्य विभागाला दिले.

            अशा लाभार्थ्यांची संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी, जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पुरावा, पासपोर्ट, व्हिसा, संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले 1-20 किंवा डीएस -60 अर्ज, परदेशात उच्च शिक्षणाकरिता निवड झाल्याचे प्रमाणपत्र/नियुक्तीपत्र याबाबतची माहिती संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी यांनी पाठवायची आहे. विद्यार्थ्यांनीही याबाबत संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा