आमदार वैभव नाईक आपण घोषणा केलेले मालवण नगरपालिकेचा विलगीकरण कक्ष कधी सुरू होणार?

आमदार वैभव नाईक आपण घोषणा केलेले मालवण नगरपालिकेचा विलगीकरण कक्ष कधी सुरू होणार?

….तर परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे भरवणार पोकळ आश्वासनांचे प्रदर्शन

पावसाच्या गळतीमुळे या विलगीकरण कक्षाचे काम रखडले आहे.रुग्ण तेथे दाखल होण्याच्या मनस्थितीत नाहीत.फक्त घोषणा आणि फोटोसेशन आमदार वैभव नाईक करत असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.
जिल्ह्यातील अन्य नगरपालिका क्षेत्रात विलगीकरण कक्ष आहे.सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.परंतु स्वतःचे कार्यक्षेत्र असलेल्या व सत्ता असलेल्या मतदारसंघात मालवण नगरपालिकेचे विलगीकरण कक्ष सुरू करू शकत नाहीत.हा विलगीकरण कक्ष गळणार्‍या जागेत सुरू करण्याच्या प्रयत्न आहे.त्यावर रंगरंगोटी करून पैसे खर्च केले जात आहेत.फक्त आमदारांना पैसे खर्च करण्यातच रस आहे.परंतु ते सुरू करून आजवर किती जण राहिले की सोडून अन्य ठिकाणी गेले,तेथे थांबण्यास रुग्ण का तयार नाहीत,याची माहिती घ्यावीशी वाटत नाही हे मालवणवासियांचे दुर्दैव म्हणावे लागेल.विलगीकरण कक्षात गरम पाणी,सुसज्ज शौचालय आवश्यक आहे.आज गावागावातही विलगीकरण कक्ष सुरू आहेत.तिथे सुविधा आहेत,कर्मचारी आहेत का? हे आमदारांनी फिरून पाहण्याची आवश्यकता आहे.पण असे होताना दिसत नाही
शासकीय तंत्रनिकेतन येथे मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू आहे.नजीकच असलेल्या मुलांच्या वसतिगृहातही बेड व आरोग्य सुविधा युक्त कोविड केअर सेंटर सुरू करणार या दीड महिन्यापूर्वीच्या घोषणेचे पुढे काय झाले? तेही स्पष्ट करावे.म्हणूनच आमदारांनी पोकळ घोषणाबाजी न थांबवल्यास मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली कोविड काळात केलेल्या खोट्या आश्वासनांचे मनसे प्रदर्शन भरवेल.
आज तालुकानिहाय सक्रिय रुग्ण संख्येत मालवण तालुका प्रथम क्रमांकावर असून सध्या १३०६ कोविड रुग्ण आहेत.खर्‍या अर्थाने मालवणला अधिक कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्षाची गरज आहे.शासनाने गृहविलगीकरण बंद केलेले आहे.सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे.पेपरबाजी,घोषणाबाजी,फोटोसेशन करणारे आमदार रुग्णांची काळजी घेऊ शकत नाहीत असेही मनसेच्यावतीने अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा