महेंद्रजी चव्हाण, अभिनंदन! जिवलग गमावलेल्या जनसामान्यांचा आवाज आपण मांडलात!

महेंद्रजी चव्हाण, अभिनंदन! जिवलग गमावलेल्या जनसामान्यांचा आवाज आपण मांडलात!

भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर यांनी जि.प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचे केले जाहीर अभिनंदन!

गेले काही दिवस अनेक रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेतानाच मृत्युमुखी पडले आहेत. यामागची नेमकी काय कारणे आहेत याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली होती. मृतांचे नातेवाईक या विषयावरून संतप्त असून इथल्या गैरव्यवस्थेनेच आपल्या जीवलगांचा बळी घेतला असल्याची भावना व्यक्त करत आहेत. गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर गेल्यानंतर त्यांचा जीव जगण्याऐवजी ते परतून येत नाहीत हा अनुभव आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती श्री महेंद्र चव्हाण यांनी केली आहे. या गंभीर प्रश्नी जनतेच्या मनातली खदखद जाहीरपणे मांडत त्याला स्थायी समितीच्या बैठकीत वाचा फोडल्याबद्दल सोशल मीडियातर्फे अविनाश पराडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना पेशंटची संख्या अचानक वाढल्यानंतर इथली वैद्यकीय व्यवस्था कोलमडून गेली. त्यातच शासकीय अनास्थेमुळे ती सावरणे शक्य झाले नाही. आपल्या रुग्णाच्या मृत्यूने नातेवाईक अस्वस्थ झाले असून अनेक अनुत्तरीत प्रश्नचिन्हे आजही त्यांच्यासमोर आहेत. किमान पन्नाशीच्या आतील काही रुग्णांचे पोस्टमार्टेम झाले असते तर मृत्यूचे नक्की कारण समजले असते असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. कोरोना आणि निमोनिया यात उपचारादरम्यान काहीच फरक न करता आल्याने मृत्युदर वाढला, त्याचप्रमाणे फिजिशियन उपलब्ध न झाल्याने व्हेंटिलेटरचा अयोग्य वापर झाला असल्याचेही अनेकांचे मत आहे. आपले नातेवाईक हे जिल्हा रुग्णालयातील शासकीय अनास्थेचे बळी मानून प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही पुढे येत आहे. या संतप्त वातावरणात इथल्या गैरव्यवस्थेची राज्य सरकारने तज्ञ टीम पाठवून सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थायी समितीत श्री चव्हाण यांनी केली आहे. भाजपा सोशल मीडिया यात त्यांना सक्रिय पाठिंबा देत असून मृतांच्या नातेवाईकांची मते आणि अनुभव मीडिया टीम रेकॉर्डवर आणणार असल्याचे अविनाश पराडकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा