You are currently viewing तू मात्र धीर सोडू नकोस

तू मात्र धीर सोडू नकोस

बारा महिने होऊन गेलेत व्यवहार सारे ठप्प झालेत .
साठवलेले चार पैसे कधीच सारे फस्त झालेत .
मांडणीच्या वरच्या कप्प्यातले धान्यांचे डब्बे रिते झालेत .
आता मोजून मापून तेलाची फोडणी भाजीला द्यावी लागतेय .
सध्या या साऱ्या परिस्थितीत सामान्य माणूस जगत आहे .
पण तु सुरक्षित तर आहेस ना ? मग सैरभैर होऊ नकोस
हे ही दिवस जातील तू मात्र धीर सोडू नकोस …….
काळ वाईट आहे पण आपल्या नकळत जगणं शिकवून जातोय .
अन्न वस्त्र निवारा यांचं महत्व पटवून देतोय .
लाखों रुपयांत न होणारी लग्न काही हजारांत होत आहेत .
कित्येक मुलींच्या बापाच्या खांद्याचे भार हलके होत आहेत .
बाहेर खेळायला जाण्याचा हट्ट मुलांनी कधीच सोडून दिलाय .
गजबजलेल्या रस्त्यांचा आवाज
भयाण शांततेने वेढून गेलाय .
वाहवत चाललेल्या माणसाला एका विश्रांतीची गरज होतीच
ती मिळाली पण , तू मात्र हताश होऊ नकोस
हे ही दिवस जातील . तू मात्र धीर सोडू नकोस ……..
सर्वात जास्त हाल हातावर पोट असणाऱ्यांचे झालेत ,
दिवसभर राबून संध्याकाळी तेल मीठ आणणाऱ्यांचे झालेत .
व्यापारी वर्ग सद्य परिस्थितीत पुरता कोलमडून पडला आहे .
कमाई शून्य पण मागणाऱ्यांचा त्याच्या डोक्यावर बडगा आहे .
मध्यमवर्गीय माणूस आपलं उघडपण दाखवायला घाबरतोय .
लोक काय म्हणतील ??? या विचाराने अजूनही बावरतोय .
सगळीच माणसं चार भिंतीत मनाविरुद्ध कोंडून बसलीत ,
हा शरीराचा कोंडमारा मनावर जड होऊ देऊ नकोस .
हे ही दिवस जातील तू मात्र धीर सोडू नकोस …….

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =