You are currently viewing कमल पुष्पें

कमल पुष्पें

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर यांनी येत्या १३ फेब्रुवारीला शेगावच्या श्री गजानन महाराजांचा ‌प्रगट दिन आहे. त्या निमीत्त श्री गजानन महाराज चरणी अर्पण केलेली “कमल पुष्पें.*

 

पहिले नमन, हेरंबाला

विघ्नहर्त्या श्री गणेशाला

दुसरे नमन श्री शारदेला

लिखाणास स्फूर्ती द्यावी, या मंजिरीला

 

*गजानन कमल पुष्प (१)*

 

प्राचीच्या बालरवीवत सुरूप

तपोबलाने तेजाळले रूप

उदयांचली ” गजानन कमल” उमलले

अखिल जगताला,सुवासे गंधाळले.‌

 

उष्ट्या पत्रावळीतील

शीते हो वेचीली

‘अन्नपूर्णब्रम्ह ‘श्रीं’नी

शिकवण ही दिली.

 

*गजानन कमल पुष्प(२)*

 

काशीच्या गोसाव्याचा

नवस, गांजा अर्पिण्याचा

स्विकार करूनी गांजाचा

पुरविला ‘लाड’ गोसाव्याचा.

 

जानरावाचा अंतकाळ

पदतीर्थाने चुकविला

साधुत्वाची चाड राखण्या

वरपांगी कडकपणा धरिला.

 

*गजानन कमल पुष्प(३)*

 

जानकीरामे विस्तव ना दिला

आव्हान दिले विस्तव पेटविण्याचे

नुसती काडी धरूनी,चिलमीवरी

“श्रीं” नी प्रगटन केले वैश्वानराचे

 

चिंचोलीच्या माधव विप्रास

धाक दाखविला,कळी काळाचा

अशाश्वताचा पाठलाग सोडून

संदेश दिला, शाश्वत ईश पूजनाचा.

 

*गजानन कमल पुष्प(४)*

 

बंकटलाला सदनी

महाराजांचे आगमन

विविध पक्वांनाचा थाट

भक्तांचे ,प्रसन्न मन.

 

पचन शक्ती असूनही

उलटी केली खळाळून

आग्रह करणे न चांगले

शिकविले स्व कृतीतून.

 

*गजानन कमल पुष्प(५)*

 

पिंपळगावचे भोळे रहिवासी

भजनी लागले,”श्री” चरणासी

बंकटलाल अक्रूर बनूनी

गजाननासी, परत नेले शेगावासी

 

समाज हिताचे भान राखत

कोरड्या विहिरीस भरविले जळाने

भास्करास दिली उपरती

भक्तीमार्गास लाविले,श्री गजाननाने.

 

*गजानन कमल पुष्प (६)*

 

पेंच ठरले निर्बळी,हरीचे

गर्वहरण हरीपाटलाचे केले

पाटलाच्या दुस-या मुलांनी

उसाचे वार करूनी परिक्षले.

 

चरकावाचून ईक्षुरस काढला

योगशक्तीचा दाविला चमत्कार

बलशाली राष्ट्रासाठी

करा योगाचा अंगीकार..

 

*गजानन कमल पुष्प(७)*

 

मधु तेथे माशा जमती

कुणीच नसे संकटकाळी

जीवनातले कटु सत्य

बंकटास समजविले योग्य वेळी.

 

कर्मठ व्रजभूषण विप्रास

आलिंगले श्री गजाननाने

तपा‌चरणाचे फळ मिळाले

धन्य झाला विप्र “श्री” दर्शनाने

 

*गजानन कमल पुष्प (८)*

 

बाळाभाऊस देऊनी मार

अधिकार त्याचा दाखविला

त्यायोगे भास्कराचा अहंकार

महराजांनी हो निवटला.

 

सुकलालची द्वाड धेनु

महाराजांनी केली शांत

लक्ष्मण घुडेची व्याधी हरली.

पण दांभिकता पाहून झाले संतप्त

 

*गजानन कमल पुष्प (९)*

 

स्वार्थ दृष्टी बळावता

निती विलया जातसे

पाटील देशमुख भांडणात

अंती ,सत्याचा विजय झालासे.

 

जळत्या पलंगावरी बैसोन

महाराजांनी केले सिद्ध

नैनं छिन्दन्ती पावक

पहाता,ब्रम्हगिरी झाला हतबुद्ध.

 

*गजानन कमल पुष्प (१०)*

 

अश्वाच्या द्वाड पणाचे उच्चाटन

महाराजांनी केले लीलया

श्रींच्या कृपेने आपणा सर्वांचे

सर्व दुर्गुण जावोत विलया.

 

बाळकृष्ण बुवाला दर्शन

“रामदास स्वामींच्या” दिले रूपात

शरीर वस्त्र,आत्म्याचे निवेदन

केले किती सोप्या शब्दात.

 

*सौ.मंजिरी अनसिंगकर*

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + two =