You are currently viewing फोंडाघाटमध्ये वीज वितरणाचा गोंधळ; नागरिकांचा MSEB विरोधात संताप

फोंडाघाटमध्ये वीज वितरणाचा गोंधळ; नागरिकांचा MSEB विरोधात संताप

फोंडाघाटमध्ये वीज वितरणाचा गोंधळ; नागरिकांचा MSEB विरोधात संताप

लोडशेडिंग, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि बंद फोनमुळे ग्राहक त्रस्त; पालकमंत्र्यांच्या आदेशांचे काय झाले?

फोंडाघाट :

येथील वीज वितरण व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, वारंवार होणारे लोडशेडिंग, देखभाल कामाच्या नावाखाली तासन्तास खंडित होणारा वीजपुरवठा आणि अधिकाऱ्यांचे बंद फोन यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

सोमवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आल्याने नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. “मेंटेनन्स”च्या कारणाखाली वारंवार वीज बंद ठेवली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे उर्वरित दिवसभरातही दोन-दोन तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत तक्रार करण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेक अधिकाऱ्यांचे फोन स्विच ऑफ असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेणार तरी कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पालकमंत्र्यांनी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या. मात्र त्या आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होताना दिसत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सततच्या वीज खंडित प्रकारामुळे व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून फोंडाघाट परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा