You are currently viewing सावंतवाडीत वनविभागाची धडक कारवाई; १४ लाखांचा खैर साठा जप्त

सावंतवाडीत वनविभागाची धडक कारवाई; १४ लाखांचा खैर साठा जप्त

सावंतवाडीत वनविभागाची धडक कारवाई; १४ लाखांचा खैर साठा जप्त

थरारक पाठलागानंतर टेम्पो ताब्यात; चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला

सावंतवाडी :

येथील वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून खैर लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला. या कारवाईत सुमारे १२ ते १४ लाख रुपये किमतीचा २९ घनमीटर खैराचा साठा हस्तगत करण्यात आला असून वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ‘MH 07-1475’ क्रमांकाच्या टेम्पोमधून विनापरवाना खैराची वाहतूक होणार होती. या माहितीच्या आधारे आजगाव आणि बांदा वनपरिमंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बांदा फॉरेस्ट चेक पोस्ट तसेच इन्सुली-खामदेव नाका परिसरात सापळा रचला होता.

दरम्यान, संशयित टेम्पो बांदा चेक पोस्टवर न थांबता भरधाव वेगाने निघून गेला. वनरक्षक वैभव इथापे यांनी तात्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला. वनविभागाच्या पथकाला चकवा देण्यासाठी चालकाने खामदेव नाक्यावर अचानक यू-टर्न घेत गोव्याच्या दिशेने टेम्पो वेगाने पळवला. मात्र वनकर्मचाऱ्यांनीही पाठलाग कायम ठेवत अखेर पत्रादेवी गोवा चेक पोस्टच्या मागे टेम्पोला घेराव घातला.

आपल्याला पकडले जाणार असल्याचे लक्षात येताच चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. वनविभागाने टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खैराचे लाकूड आढळून आले.

प्राथमिक चौकशीत जप्त करण्यात आलेला खैर साठा आणि टेम्पो वजराठ येथील गोविंद गवस यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे. हा माल दोडामार्ग परिसरातून विनापरवाना गोळा करून तळवडे येथे नेला जात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

ही कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आजगावचे वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप यांच्या पथकाने केली. या मोहिमेत वनरक्षक वैभव इथापे, अतुल पाटील, प्रकाश रानगीरे, श्री. मोहिते तसेच गोवा वनविभागाचे वनरक्षक विशाल परब यांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा