You are currently viewing या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन होणार बंद…

या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन होणार बंद…

कोविड सेंटर मध्येच व्हावं  लागेल भरती

मुंबई:

होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली.

राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. असं केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असं टोपे यांनी सांगितलं.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, सध्याच्या स्थितीला राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट एकूण राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे, त्यांना दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यातील पहिली म्हणजे, होम आयसोलेशन १०० टक्के बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा. त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. तसेच राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यास प्राधान्य देणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

पुढील जिल्ह्यांमध्ये होम क्वारंटाईन आता बंद होणार-

पुणे, नागपूर, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद

लॉकडाऊन संदर्भातील निर्णय गुरुवारी- टोपे

राज्यात १ जूनपासून चार टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे का? याबाबत विचारण्यात आलं असता राजेश टोपे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत, अशी माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 12 =