You are currently viewing उर्वी फाऊंडेशनतर्फे पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

उर्वी फाऊंडेशनतर्फे पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

सावंतवाडी

कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्धे अर्थात कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांप्रती सद्भावना व्यक्त करीत उर्वी फाऊंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबदी लागू करण्यात आली असून नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात तापमानात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असून अशा परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत भर उन्हात पोलिस कर्मचारी उभे असतात. अशा पोलिस बांधवांना सहकार्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे उर्वी फाऊंडेशनचे अध्यक्ष दूर्गसेवक रोहन पुळासकर यांनी सांगितले.

यावेळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, सहा. पोलिस निरीक्षक स्वाती यादव, पो. कॉ. राजलक्ष्मी राणे, प्रसाद कदम, सतीश कविटकर, पांडु सावंत, सखाराम भोई, प्रवीण सापळे, प्राजक्ता कदम, तृप्ती कळंगुटकर, सुनिता नाईक, पलक गवस तर उर्वी फाऊंडेशनतर्फे सिताराम पुळसकर, सुजाता पुळसकर, रतिश पुळसकर, अनुश्री पुळसकर, रोहन पुळसकर, अश्विनी पुळसकर, पत्रकार सचिन रेडकर, रुपेश हिराप, राजाराम धुरी, रामचंद्र कुडाळकर, सामाजिक कार्यकर्ते सुधा राणे आदी उपस्थित होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातही यावेळी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याच बरोबर सावंतवाडी शहरातील चिटणीस नाका, राऊत दुकान नाका, गांधी चौक, जयप्रकाश चौक, शिरोडा नाका, बांदा नाका, कोलगांव नाका येथील पोलिस व होमगार्ड बांधवांनाही यावेळी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

सोनुर्ली येथे गतवर्षी शिमगोत्सवादरम्यान उर्वी रोहन पुळास्कर या चिमुकलीचे एसटी अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्यानंतर तिचे वडील रोहन पुळास्कर व कुटुंबियांनी तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक बांधिलकीतून उर्वी फाऊंडेशनची स्थापना केली होती. या फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबईत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तसेच यावर्षी सोनुर्ली माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेला एईडी संच देण्यात आले होते. तसेच अलिकडेच या योद्ध्यांना पाणी व खाऊचे वाटपही करण्यात आले होते. कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविला असल्याची माहितीही रोहन पुळास्कर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 8 =