पॅरामेडिकल शाखेतून घडवा उज्वल भविष्य…

पॅरामेडिकल शाखेतून घडवा उज्वल भविष्य…

वृत्तसेवा
सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून आले ते वैद्यकीय क्षेत्रातील विविध घटक. अगदी डॉक्टरांपासून तर आरोग्य व्यवस्थेतील सर्व घटकांकडून दिवसरात्र मेहनत घेत रुग्णसेवा केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणाचा विचार केल्यास डॉक्टरांसोबतच परिचारिका व अन्य अनेक क्षेत्रांत चांगले करिअर घडविता येऊ शकते. पॅरामेडिकल शाखेत पदवी, पदविका अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

परिचारिका शिक्षणासोबत अन्य विविध शिक्षणक्रमांत पदवी

वैद्यकीय अभ्यासक्रमाप्रमाणेच पॅरामेडिकल शाखेतील बहुतांश अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून व जीवशास्त्र विषयासह शिक्षण घेतलेले असणे आवश्यक असते.

बारावीनंतर पदवीचा तसेच पदविका अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांना खुला आहे. पॅरामेडिकल अभ्यासक्रमामध्ये परिचारिका हा अभ्यासक्रम सर्वाधिक प्रचलित आहे. बी. एस्सी (नर्सिंग) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्लिटी कम एंट्रान्स टेस्ट (नीट) परीक्षेच्या कामगिरीच्या आधारावर प्रवेश दिला जातो.

पदव्युत्तर पदवी शिक्षणाचा पर्याय खुला

अन्य विविध अभ्यासक्रमांसाठीदेखील उमेदवारांना ‘नीट’ परीक्षा दिलेली असणे आवश्यक असते. बहुतांश पॅरामेडिकल अभ्यासक्रम हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येत असतात. परिचारिका क्षेत्राप्रमाणेच फिजिओथेरपी, स्पीच थेरपीचेही क्षेत्र विद्यार्थ्यांना खुणावत आहे. या क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पदवी शिक्षण घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुला असतो.

असे आहेत अभ्यासक्रम

बी.एस्सी. (नर्सिंग) बॅचलर ऑफ ॲक्युपेशनल थेरपी (बीओटी), बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (बीपीटी), बी.एस्सी. (ऑडिओ अ‍ॅन्ड स्पीच थेरपी), बी.एस्सी. (रेडिओग्राफी), बी.एस्सी. (न्यूक्लिअर मेडिसिन), बी.एस्सी. (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी), बी.एस्सी. इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, बी.एस्सी. इन रेडिओथेरपी, बी.एस्सी. इन क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी, बी.एस्सी नर्सिंग, डिप्लोमा इन मेडिकल लॅबरोटरी टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन अ‍ॅनेस्थिशिया, डिप्लोमा इन ओटी टेक्निशियन, डिप्लोमा इन नर्सिंग केअर असिस्टंट आदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

अशा आहेत संधी

पॅरामेडिकल शाखेतून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची आरोग्य क्षेत्रातील भूमिका डॉक्टरांइतकीच महत्त्वाची समजली जाते. अगदी रुग्णाची शुश्रूषा करण्यापासून तर पॅथॉलॉजी व अन्य तपासण्या करण्याकरिता या तज्ज्ञांचा सहभाग हवा असतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेतून सरकारी नोकरी मिळविता येऊ शकते. याशिवाय खासगी वैद्यकीय क्षेत्रातही वाव आहे. परदेशातही तंत्रज्ञांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा