You are currently viewing मटक्याचे अर्थकारण…..फायदा तोटा…उलाढाल…

मटक्याचे अर्थकारण…..फायदा तोटा…उलाढाल…

मटक्यावरही जगताहेत शेकडो कुटुंब..

संपादकीय….

मटका….अनधिकृत धंदा.
होय मटका अनधिकृतच धंदा आहे. कारण विनापरवाना दिवसाकाठी होणारी लाखोंची उलाढाल… खाकीला दिला जाणारा हफ्ता….सरकारला ठेंगा दाखवत कसलाही टॅक्स, महसूल न भरता केली जाणारी बक्कळ कमाई, ऐश आराम, आलिशान गाड्या, श्रीमंती आणि गैरधंदा करूनही पैसेवाला म्हणून मिळणारा मान…यामुळेच मटका अनधिकृत धंदाच आहे.
मटक्याचेही राजकारण, अर्थकारण जोरदार असतं. मटक्याची कंपनी चालवायला लागणारे लाखोंचं भांडवल, भागीदार, ऑफिस, कामगारवर्ग, चिठ्ठी पोचवणारे पायलट, वसुली कर्मचारी, छोटे मोठे टपरिवाले विक्रेते, मटका लावणारे खेळाडू, कॉम्प्युटर, फोन, खाकीला हफ्ता, हफ्ता घेणाऱ्यांचे भागीदार वरिष्ठ-कनिष्ठ. असे कित्येकजण मटक्याच्या व्यवहारांवर जगत असतात. सावंतवाडी सारख्या एखाद्या छोट्याशा शहरात जवळपास पाचशे कुटुंबे मटक्याच्या कमाईवर अवलंबून असतील, किंबहुना मटक्याच्या जीवावर जगत असतील.
मटका सुरू करणारे भागीदार जे लाखोंची गुंतवणूक करतात त्यांचं कुटुंब आणि मटक्याच्या येणाऱ्या पैशातून सुरू होणार इतर उद्योग. त्यामुळे बरेच लोक मटक्यावर अवलंबून असतात. मटक्यावाल्यांच्या ऑफिसमध्ये लागणारा स्टाफ, मटका घेणारे छोटे दुकानदार, टपरी वाले, इत्यादींचे कुटुंब सुद्धा मटक्यावरच जगतं. मटक्याची चिठ्ठी ने आण करण्यासाठी लागणारी मुलं, मटका लावून काहीवेळा नुकसान तर काहीवेळा मिळणारा भरभक्कम पैसा यामुळे मटका लावणाऱ्यांचे कुटुंब सुद्धा मटक्यावर अवलंबून असते. मटका लागल्यावर होणारी अनावश्यक खरेदी, बाजारहाट यामुळे किराणा व्यावसायिकांना होणारा नफा. मटका सुरळीत चालावा तर खाकिसोबत हातमिळवणी करणे त्यातून खाकिवाले आणि त्यांचं कुटुंब सुद्धा ऐश आरामात राहत. वितरणासाठी लागणाऱ्या गाड्यांमुळे पेट्रोलपंप ला मिळणारा धंदा, असे कित्येकजण मटक्याच्या अर्थकारणावर आपली रोजीरोटी कमावत असतात. जवळपास ५०० कुटुंबाचे घर मटक्याच्या धंद्यांवर चालू असते.
मटका चालविणारी कंपनी खाकीला त्याचा हफ्ता देतच असते, त्यामुळे खरोखरीची धाड जरी एखाद्या मटक्याच्या दुकानावर पडली तरी त्याची नुकसानभरपाई मटका कंपनी करत असते. त्यामुळे टपरिवाला कधीच नुकसानीत नसतो. मटक्याच्या जीवावर कुटुंब चालविणारे सुद्धा अनेकजण आहेत. त्यामुळे मटक्याच्या धंद्यात मिळणारा बक्कळ फायदा पाहून काही नेते, लोकप्रतिनिधी सुद्धा मटक्याच्या धंद्यात गुंतले आहेत. मटक्याच्या धंदा अवैद्य, अनैतिक असला तरी पांढरपेशा जीवन जगणारे अनेक लोक मटक्याच्या धंद्यांकडे वळत आहेत. काही प्रकाशात येतात, तर काही दुसऱ्यांची नावे पुढे करत आपली पार्टनरशिप मात्र लपवून ठेवतात, आणि एखाद्या निष्कलंक धंद्यातून आलेला पैसा असे भासवून कॉलर टाईट करून आनंदाने जीवन जगत असतात.

क्रमशः ……!!

पुढे वाचा कोण कोण मटक्याची कंपनी काढतात आणि मटक्याची जीवघेणी स्पर्धा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 6 =