You are currently viewing मोती तलावाच्या काठावर फडफडणारा डोम कावळा

मोती तलावाच्या काठावर फडफडणारा डोम कावळा

सामनाच्या अग्रलेखातून ना.दीपक केसरकरांवर प्रहार

महाराष्ट्राच्या राजकारणात अविश्वसनीय घडामोडी घडल्या आणि अडीज वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले उद्धव ठाकरे पायउतार होऊन राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सोबतीने स्थापन झालेले महविकास आघाडी सरकार कोसळले होते. शिवसेनेचे विधिमंडळ पक्ष नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सत्तेतील ४० आमदार, मंत्र्यांनी शिवसेनेला रामराम ठोकून वेगळा गट स्थापन केला. शिवसेना नेतृत्वाची राष्ट्रवादी पक्षाची झालेली जवळीक शिवसेनेला ४० आमदारांच्या रूपात मोजावी लागली. त्यामुळे अल्पमतात आलेले महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा राजकीय भूकंप झाला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युती महाराष्ट्रात सत्तेवर आली, त्यामुळे विरोधकांनी “५० खोके एकदम ओके” अशा प्रकारच्या घोषणा देत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना डिवचले आणि याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर येथे सुद्धा पाहायला मिळाली. त्यातच सातारचे आमदार महेश शिंदे यांनी “होय होय आम्ही पन्नास खोके घेतले तुमच्या पोटात का दुखते..?” अशा प्रकारे वक्तव्य करून पैसे घेतल्याची जाहीर कबुली दिल्याचे सामना मधून सांगण्यात आले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बँका लुटणाऱ्या, कर्ज बुडव्यांना युतीच्या सरकारने क्लीन चिट दिल्याने विरोधक संतप्त झाले आणि त्यांनी सरकारवरच ठग – पेंढार्यांचेच सरकार आले, मग आणखी दुसरं काय होणार..? आता फक्त “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार द्यायचे तेवढेच बाकी राहिले… असे ताशेरे ओढले.
शिवसेना पक्षातून ४० आमदार बाहेर पडले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते ना. दीपक केसरकर यांनी खूप मोठा रोल निभावला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या रडारवर सावंतवाडीचे ना. दीपक केसरकर हे राहिल्याचे सामनाच्या अग्रलेखातून ना. दीपक केसरकर यांच्यावर होणारी टीका पाहिली असता प्रकर्षाने दिसून येते. “सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा” अशा प्रकारचे खोचक विधान सामनाच्या अग्रलेखातून ना. दीपक केसरकर यांच्या विरोधात करून आगपाखड केली. यापूर्वी देखील दीपक केसरकर सफेद सदरा वापरत असल्याने त्यांना “पांढरा बगळा” अशीही उपमा देण्यात आली होती. दीपक केसरकर हे शिवसेना आणि भाजप युती सरकारमध्ये अर्थ वित्त राज्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले होते. परंतु भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली त्यावेळी दीपक केसरकर यांचा या आघाडीला विरोध होता. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत न जाता शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा युती करावी, अशा प्रकारची मागणी ना. दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचबरोबर माजी राज्यमंत्री म्हणून उत्कृष्ट कार्य केलेले ना. दीपक केसरकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. खरंतर यामागील कारण म्हणजे, महाविकास आघाडीची सगळी सूत्रे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्याकडे होती, आणि राष्ट्रवादीचा त्याग करूनच दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत भव्य सोहळा करत शिवसेना प्रवेश करून मोठ्या मताधिक्याने सावंतवाडी विधानसभा सुद्धा जिंकली होती. त्यामुळे शरद पवार यांचा दीपक केसरकर यांच्यावर रोष होता, हे दीपक केसरकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदावरून डावल्यावर प्रकर्षाने दिसून आले होते.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून आपल्या संपूर्ण हयातीत सत्तेतील कुठलीही पदे स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांना दिली नव्हती, उपभोगली नव्हती. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची धुरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर प्रथमच ठाकरे कुटुंबीयातील कोणीतरी मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाच्या शर्यतीत उतरले. ठाकरे कुटुंबाकडेच महाविकास आघाडीतील वाट्यास आलेल्या मंत्रिपदापैकी मुख्यमंत्री पद हे स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडे तर पर्यावरण मंत्रीपदी त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे विराजमान झाले. स्वतःच्याच घरात दोन दोन मंत्रिपदे घेऊन बाळासाहेबांचा आदर्श पायदळी तुडवल्याने अनेक वर्षे शिवसैनिक म्हणून शिवसेनेची सेवा केलेले जुने जाणते आमदार, मंत्री नाराज झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना देखील नव्यानेच मंत्रिमंडळात आणि राजकारणात आलेले युवराज आदित्य ठाकरे हेच मंत्री व आमदार यांना आदेश द्यायचे. त्यामुळे बऱ्याच आमदारांमध्ये आणि वरिष्ठ मंत्र्यांमध्ये देखील अंतर्गत धुसफूस सुरू झाली होती. याच धुसफुशीमुळे हळूहळू शिवसेना पक्ष पोखरला गेला आणि चाळीस आमदारांनी त्याचबरोबर ज्यांच्याकडे मंत्री पदे होती त्या मंत्र्यांनी देखील महाविकास आघाडीतून आणि शिवसेना पक्षातून काढता पाय घेत शिवसेनेचाच एक वेगळा गट स्थापन करून आपणच खरी शिवसेना यावर दावा केला.
त्यानंतरच्या काळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ भूखंड प्रकरणावरून जेलची हवा खावी लागली, काही मंत्र्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले, काहींच्या प्रॉपर्टीज जप्त केल्या गेल्या, तर खुद्द उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केले गेले. कालांतराने खासदार संजय राऊत यांची जेलमधून सुटका झाली आणि त्यांच्या अटकेवर न्यायालयाने ताशेरे देखील ओढले. त्यामुळे मानसिक बळ मिळालेले संजय राऊत अधिक आक्रमक झाले आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करून देखील काहीही न बोलणाऱ्या सरकारच्या विरोधात सामनाच्या अग्रलेखातून बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीच्या सरकारवर ठग – पेंढार्यांचेच सरकार असा सरळ सरळ आरोप केला गेला. “ढेकणासंगे हिराही भंगला” अशी देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल कोपरखळी करत नागपूरच्या अधिवेशनात सरकारची लक्तरे निघाली असून एका क्रांती मधून सरकार आले असे सांगणाऱ्यांची क्रांती कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या आक्रमणा विरोधात शेपूट घालून थंड पडली. खोके सरकारची क्रांती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यास कमी पडली. अशा प्रकारची टीका सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्र सरकारच्या विरोधात करण्यात आली.
एकंदरीत सामनाचा अग्रलेख वाचला असता पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांच्या हत्या प्रकरणे उकरून काढण्यात आली, सरकारवर बँक बुडवणाऱ्या, कर्ज बुडवणाऱ्यांना क्लीन चीट दिल्याचे आरोप करण्यात आले, “५० खोके एकदम ओके” म्हणत शिवसेनेतून फुटून बाळासाहेबांची शिवसेना हा वेगळा गट स्थापन करणाऱ्या चाळीस आमदारांवर पैसे घेतल्याचे जोरदार आरोप करण्यात आले. परंतु या सर्व प्रकरणात कोणावरही वैयक्तिक न लिहिता सामनाच्या अग्रलेखात सावंतवाडीचे नामदार दीपक केसरकरांवर अनपेक्षितपणे “सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावरील फडफडणारा डोमकावळा” म्हणून टीका करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि ना.दीपक केसरकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी एवढे महत्त्वाचे वाटले याचे आश्चर्य व्यक्त करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नंतर शिवसेनेचे कट्टर विरोधक सावंतवाडीचे ना.दीपक केसरकर की काय? असा प्रश्न उपस्थित झालाय….!

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + nineteen =