You are currently viewing ना. दीपक केसरकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

ना. दीपक केसरकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

आ.नितेश राणेंकडून केसरकरांचे अभिनंदन

दुसऱ्या फळीतील नेते टीका करण्यात व्यस्त

संपादकीय….

महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचे शिंदे गट व भाजपाची युती होऊन युतीचे सरकार स्थापन झाले जवळपास ३८ दिवसांच्या कालावधीनंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकूण १८ कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडला यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय नेते आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना.दीपक केसरकर यांचे कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली. ना.दीपक केसरकर यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा वर्णी लागली.
ना.दीपक केसरकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड होताच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कनिष्ठ सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी दीपक केसरकर यांचे अभिनंदन केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नारायण राणे आणि दीपक केसरकर हेच नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे. एकमेकांमध्ये कडवा संघर्ष असलेले हे दोन नेते शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती झाल्यामुळे पुन्हा एकदा जवळ आल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला पाहायला मिळत आहे. दीपक केसरकर यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला, त्याची जेवढी चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत नाही तेवढी चर्चा आमदार दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मनो मिलनाची होताना दिसत आहे. एकीकडे नारायण राणे यांचे कनिष्ठ पुत्र आमदार नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या अभिनंदन करत आहेत तर दुसरीकडे नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र माझी खासदार निलेश राणे हे मात्र “ड्रायव्हर म्हणून जागा खाली आहे” अशा प्रकारची शेलक्या शब्दात टिप्पणी करून दीपक केसरकर यांच्यावर तोंडसुख घेताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब हे निलेश राणे यांचे खंदे समर्थक आणि अत्यंत जवळचे मानले जातात. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या घडामोडींच्या वेळी शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते असलेले दीपक केसरकर हे शिंदे गटाची कमान सांभाळत मुंबईमध्ये असताना संजू परब मात्र “मतदारसंघ पोरका झाला, आमदार मतदारसंघाकडे लक्ष द्या, अन्यथा बिंकामाचा आमदार असा कलंक लागेल” अशी केसरकर मतदार संघात दिसत नसल्याने त्यांच्यावर बोचरी टीका करताना दिसून येत आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती होऊन महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाले आणि महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करेल अशी आशा निर्माण झाली असतानाच, भाजपाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून मित्र पक्षाचे मंत्री ना.दीपक केसरकर यांच्यावर केली जाणारी टीका हास्यास्पद आणि दुर्दैवी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले टीका टिपण्णीचे राजकारण म्हणजे जिल्हा विकासाकडे न नेता अधोगतीकडे नेण्याचे लक्षण आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती झाल्यामुळे भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देखील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांशी, त्याचप्रमाणे ना.दीपक केसरकर यांच्याशीही जुळवून घ्यावे लागणार. तरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यात विकासाची गंगा येण्याची आशा असेल. अन्यथा “ये रे माझ्या मागल्या” प्रमाणे पुन्हा जिल्हावासीय विकासाच्या नावाने बोंब मारतानाच दिसून येतील…आणि विकास मात्र शोधावाच लागेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा