You are currently viewing सावंतवाडी नगराध्यक्षांना मद्यविक्री परवानाधारक बार असोसिएशनने दिलेला पाठिंबा योग्यच…

सावंतवाडी नगराध्यक्षांना मद्यविक्री परवानाधारक बार असोसिएशनने दिलेला पाठिंबा योग्यच…

गोवा बनावटीच्या दारूचा अवैध्य धंदा करणारे कोणत्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी?

संपादकीय

सावंतवाडी राजाश्रय लाभलेले सुंदर सुसंस्कृत शहर. गेल्या वीस वर्षांत प्रगतीचा आणि विकासाचा चढता आलेख असणारे जिल्ह्यातील प्रेक्षणीय शहर. परंतु विकास खुंटला, रखडला म्हणून ओरड करत बऱ्याच वर्षांनी सावंतवाडीत सत्ता बदल झाला आणि त्या बदला बरोबरच शहरात अनेक गैरधंद्याना ऊत आला. गैरधंदे पूर्वीपासूनच होते, परंतु गेल्या काही काळात मात्र ते मोकाटपणे होऊ लागले. आणि याला कारण म्हणजे काही राजकीय पक्षांमध्ये असलेले लोकप्रतिनिधी, आणि पक्षाचे पदाधिकारीच गैरधंद्यांचे चालक-मालक सर्वस्व….!
पूर्वीच्या काळात चांगल्या कलेला राजाश्रय मिळायचा, आजकाल अवैध्य अनैतिक धंद्यांना राजकीय आश्रय मिळतो. किंबहुना आपले अनैतिक धंदे मोकाटपणे, बिनधास्तपणे सुरू ठेवण्यासाठीच अशी गैरमार्गाने पैसे कमावणारी माणसे राजकीय व्यक्तींना हाताशी धरून राजकारणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करून एखादं राजकीय पद पदरात पाडून घेतात आणि व्हाइट कॉलर असल्यासारखे लोकांना, युवकांना देशोधडीला लावणारे दारू, मटका सारखे गैरधंदे करतात. राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी अशा लोकांना जवळ करतात कारण त्यांची पैशांची भूक गैरधंदेवाल्यांकडूनच भागवली जाते. त्यामुळेच राजकारणातील बादशाह आपला राजकीय आखाडा चालविण्यासाठी गोंधळ घालणारे बिरबल आपल्या मागेपुढे ठेवतात.
सावंतवाडी नगराध्यक्षांनी शहरातील युवक गैरधंद्यांकडे ओढले जातात, शहरात अनैतिक धंदे सुरू आहेत, गोवा बनावटीची भेसळयुक्त दारू विकली जाते अशा मुद्द्यांवर उघडलेली मोहीम नक्कीच स्तुत्य आहे. शहरात काही परमिटरूम मधून गोवा बनावटीची दारू भेसळ करून खुलेआम विकली जात आहे. शहरातील प्रसिद्ध कंटक पाणंद येथून बाहेर येत अशी भेसळयुक्त दारू पिऊन कधी बिल्डिंगच्या खालील पाण्यात, कधी गटारात, तर कधी तलावात पडून कित्येकजण मृत्युमुखी पडले आहेत, परंतु अशा भेसळयुक्त दारूच्या दुकानांवर कारवाई झालेली ऐकिवात नाही. सर्रासपणे गोवा बनावटीची भेसळयुक्त दारू लेबल बदलून विकली जाते. भरवस्तीत असलेल्या या दारू दुकानांवर सकाळी लोक देवाची पूजा करण्या अगोदर उभे राहतात. आणि लोकांच्या याच प्रवृत्तीमुळे हे दारुवाले भेसळयुक्त दारू पाजून त्यांच्या आयुष्यात गोंधळ घालतात. विदेशी दारूच्या बाटलीत गोव्याच्या बनावट दारूचा गोंधळ घालणारा हा दारुवाला सत्ताधारी राजकीय पक्षाचा पुढारी असल्याने अशा गैरधंद्याना राजकीय वरदहस्त लाभतो. त्यामुळे मोकाटपणे गैरधंदे करायला मोकळे होतात, आणि त्यांच्याच पक्षांचे नेते लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी पुन्हा दारूच्या धंद्यांच्या नावाने ओरड मारायला सुरुवात करतात. त्यामुळे प्रशासनाला दोष देताना अशा राजकीय नेत्यांनी आपण कोणकोणत्या गैरधंदेवाल्या व्यक्तींना आपल्या पक्षाची पदे दिली? कोणाकोणाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणले? याचीही समीक्षा करणे गरजेचे आहे.
जिल्हा परवानाधारक आणि बार असोसिएशन ने संजू परब यांना दिलेला पाठिंबा नक्कीच योग्य आहे, परंतु हे करताना नक्की आपल्यापैकी कोण गोवा बनावटीची चोरीछुपे वाहतूक व भेसळ करून विक्री करतो याकडेही गांभीर्याने पाहून त्याचीही तक्रार करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही भेसळयुक्त दारू पिऊन कित्येक संसार तर उध्वस्त होतातच, परंतु १५/२० वर्षांची कोवळी मुले दारू विक्री आणि वाहतुकीतून बक्कळ पैसा मिळतो म्हणून या धंद्यांकडे वळून आपलं आयुष्य बरबाद करत आहेत, त्याला आळा बसणे महत्वाचे आहे.
दारूच्या बरोबरीने मटका व्यवसाय जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. सावंतवाडी पोलिसांकडून मटका स्वीकारणाऱ्या टपरीवर कारवाई करून चार पाच हजारांचा गल्ला आणि साहित्य जप्त करून कारवाईच्या नावाखाली लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणे म्हणजे मटक्याचा बंदोबस्त होत नाही. मुळात या टपरिवाल्यांचा जप्त झालेला गल्ला त्यांना मटका कंपनी नुकसान म्हणून भरपाई देते. जर पोलिसांना खरोखरच कारवाई करायची असेल तर सावंतवाडीतील कुठच्या घरात, बंगल्यात कंपनीचे ऑफिस सुरू आहे याची माहिती नसते असे नव्हे. खरोखरच कारवाई करायची असेल तर मटका चालवणाऱ्या कंपनींवर कारवाई करा. त्यामुळे टपरीवर कारवाई करून पाठ थोपटून घेण्याचे नाटक हे सर्वसामान्य सावंतवाडीकर कित्येकवर्षं पाहत आलेले आहेत. मटक्याच्या नावाने ओरडणाऱ्यानी मटका कंपन्या कोणत्या राजकीय पुढाऱ्यांच्या आहेत यावरही लक्ष द्यावे, अन्यथा लोकांना सावंतवाडीकरांची काळजी असल्याचे भासवून आपणच गैरधंद्याना संरक्षण दिल्यासारखे होईल.
गेले कित्येक महिने मीडिया अवैध्य दारूच्या नावाने ओरडत होती, आज नगराध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेऊन गोवा बनावटीच्या भेसळयुक्त दारूच्या धंद्याविरोधात आवाज उठविला आहे, परंतु सावंतवाडीत अधिकृत परमिट रूमच्या नावाखाली भेसळयुक्त दारूचा धंदा कोण करतात हे सर्व सावंतवाडीकरांना माहिती आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी अशा बोगस, अवैध्य भेसळयुक्त दारू विक्री करणाऱ्या दारुवाल्यांचा बिमोड केल्याशिवाय गप्प बसू नये भले ते कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असोत वा लोकप्रतिनिधी. त्यासाठी नक्कीच सर्व सावंतवाडीकर त्यांच्या पाठीशी राहतील यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा