दीपक केसरकर यांना डावलून शिवसेना गेली बॅकफूटवर

दीपक केसरकर यांना डावलून शिवसेना गेली बॅकफूटवर

राणे फॅक्टरचा फटका बसला शिवसेनेबरोबरच मूळ भाजपावासींना.

विशेष संपादकीय….

नारायण राणे यांचा दौडता वारू रोखला होता तो सावंतवाडीचे शांत संयमी आमदार दीपक केसरकर यांनीच. नारायण राणे यांची दादागिरी आणि राजकीय दहशतवाद ही कारणे पुढे करत दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या मनावर ती बिंबवली आणि त्यामुळेच नारायण राणे यांना टक्कर देणारा जिल्ह्यातील एकमेव चेहरा म्हणून केसरकर यांची ओळख निर्माण झाली. जिल्ह्यात केसरकर यांना दबंग नेता म्हणून ओळखू लागले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली.
काँग्रेसमधून आलेले वैभव नाईक यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात गावागावात शिवसेना वाढवली, परंतु नारायण राणे यांच्या विरोधात लढण्याची प्रवृत्ती त्यांना निर्माण करता आली नव्हती. दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना जिल्ह्यात खऱ्या अर्थाने वाढली, फोफावली. केसरकरांनी राणेंच्या प्रवृत्तीच्या विरोधात रणशिंग फुंकले आणि राणेंचा जिल्ह्यावर असलेला २५ वर्षांचा निर्विवाद अंमल संपुष्टात आणला. शिवसेनेला खासदारकी, आमदारकी मिळवून देण्यात केसरकरांचा सिंहाचा वाटा होता. परंतु केसरकरांचे वाढते प्राबल्य जसे विरोधकांना खुपत होते तसे पक्षातील वरिष्ठांना देखील खुपत राहिले. त्यामुळे केसरकरांचे महत्व कमी करण्यासाठी शिवसेनेतच दबाव गट निर्माण झाला, आणि पुढील मंत्रिमंडळात जिल्ह्याच्या बाहेरील उदय सामंत यांना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणत केसरकरांचे खच्चीकरण करण्यात आले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. उदय सामंत कॅबिनेट मंत्री असून देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करू शकले नाहीत किव्हा जिल्ह्यात शिवसेनेला अच्छे दिन दाखवू शकले नाहीत. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तर शिवसेनेचा सपशेल पराभव झाला आणि भाजपावासी झालेल्या खासदार नारायण राणे यांना मात्र जिल्हावासीयांनी भूमिपुत्र म्हणून अच्छेदिन दाखवले.
नारायण राणे भाजपावासी झाले तिथेच भाजपाला जिल्ह्यात तळाच्या स्थानावरून डायरेक्ट पहिल्या स्थानावर झेप घेता आली. जिल्ह्यातील सर्वच सत्तास्थाने नारायण राणे यांच्या अधिपत्याखाली आली. परिणामी भाजपा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष बनला. नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यावरही काँग्रेस जिल्ह्यात पहिल्या नंबर वर होता, परंतु जिल्ह्यातील मूळ काँग्रेसवाले कुठे होते? नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यावर राणे समर्थक काँग्रेस अशीच जिल्ह्यातील काँग्रेसची ओळख होती आणि आज नारायण राणे भाजपामध्ये गेल्यावर भाजपाची अवस्था काय आहे? हा देखील महत्वाचा प्रश्न बनला आहे.
जिल्हापरिषदेच्या विषय समिती सभापती निवडीमध्ये भाजपा मधील दुफळी पाहिल्यांदाच जिल्हावासीयांच्या समोर उघडपणे आली. आम्ही सारे भाऊ भाऊ असे वागणारे जुने नवे भाजप कार्यकर्ते, नेते आतून कसे आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हापरिषद माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचा राजीनामा. भाजपाचे आप्पा गोगटे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलेले जुने भाजपा नेते म्हणजे माधव भंडारी, राजेंद्र म्हापसेकर, यशवंत आठलेकर इत्यादी होय. भाजपाची ताकद आधीपासूनच देवगड व दोडामार्ग येथेच होती. अलीकडे तर दोडामार्ग म्हणजे राजेंद्र म्हापसेकर असे समीकरण तयार झाले होते. परंतु जिल्हापरिषदेच्या विषय समिती सभापती निवडीत राणे स्टाईल झालेली राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या सौ अनिशा दळवी यांची निवड राजेंद्र म्हापसेकर व जुन्या कार्यकर्त्यांना रुचली नाही. परिणामी राजेंद्र म्हापसेकर यांनी जिल्हापरिषद उपाध्यक्षपदा बरोबरच पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आणि भाजपमधील जुन्या नव्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर आले.
राजेंद्र म्हापसेकर यांनी काहीही कारण देऊन आपण नारायण राणे यांचा चाहता आहे असे म्हटले तरी देवाला मानणारा माणूस देवावर नाराज होऊन मंदिरात प्रवेश करत नाही असे होत नाही त्याचप्रमाणे नारायण राणे यांचा चाहता असलेले राजेंद्र म्हापसेकर त्यांनी केलेल्या निवडीवर नाराज होऊन ज्या पक्षात हयात घालवली त्याचा त्याग करण्याचा विचार देखील त्यांनी केला नसता. माजी आमदार प्रमोद जठार असो वा राजन तेली यांनी देखील याविषयावर जास्त भाष्य केले नाही त्यामुळे भाजपामध्ये कुठेतरी जुने नवे विरोधाचे पाणी मुरतंय एवढं मात्र नक्कीच.
एकंदरीत परिस्थितीचा अभ्यास केला असता दोन महासागर जिथे एकत्र आलेत तिथे त्यांनी आपल्या पाण्याचा रंग देखील वेगळाच राखला आहे मग दोन पक्ष एकत्र आल्यावर तरी कसे काय मनापासून एक होतील? नारायण राणे समर्थकांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला तरी त्यांचे स्वतःचे अस्तित्व ते कधीच मिटवू शकत नाहीत, ते ज्या पक्षात जातात त्यांचे मात्र अस्तित्व मिटते हे पूर्वानुभावावरून दिसून आले आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यावर जी गत जुन्या काँग्रेस नेत्या कार्यकर्त्यांची झालेली तीच गत आता भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांची नेत्यांची होताना दिसत आहे. त्यावेळी खच्चीकरण झालेले जुने काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील काँग्रेस आजही उभारी घेऊ शकलेली नाही, त्यामुळे भविष्यात जुने भाजप कार्यकर्ते, नेते यांची काय परिस्थिती होईल असा प्रश्न आता जुन्या निष्ठावंत भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना पडलेला आहे. भाजपा आपले स्वतःचे अस्तित्व राखेल की राणेंची भाजपा अशी ओळख निर्माण होईल हे येणारा काळच दाखवून देईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा