You are currently viewing अभिप्राय.. अभिप्राय…
Oplus_16908288

अभिप्राय.. अभिप्राय…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*अभिप्राय.. अभिप्राय…*

 

आपल्याकडे एक म्हण आहे,” मियॅां मुठभर नि दाढी हातभर”..

आपल्या कलाकृतीवर अभिप्राय आल्यास कुणाला आवडत नाही? स्तुती माणसाला नेहमीच प्रिय असते. देवही याला अपवाद नाहीत. पण म्हणून दिसली रचना कि दे अभिप्राय अशी कृती करू नयेच पण अभिप्राय देतांना ती रचना खरोखर त्या तोडीची आहे का? हा विचार करतांना दोन वेळा ती रचना वाचून थोडे थांबून अभिप्राय दिल्यास योग्य तो अभिप्राय दिला जातो. अन्यथा ती कलाकृती साहित्यिकमुल्ये

नसतांनाही आपण स्तुतीपर अभिप्राय दिल्यास

आपण त्या साहित्यिकाचा गैरसमज करून देतो,

त्याला वाटते मी फार थोर साहित्यिक झालो, व

त्याच्या प्रगतीत येथेच अडथळा निर्माण होतो.

त्याची प्रगती खुंटतेच. तो धडपड करेनासा होतो

व त्याच्या घसरणीला येथूनच सुरूवात होते.

उत्तम साहित्यकृतीसाठी धडपड व संघर्ष संपला कि साहित्यिक संपला असे समजावे.

 

उत्तम साहित्यिक होण्यासाठी अनेक वर्षे तप करावे लागते.गवताच्या भाल्यांसारखे साहित्यिक

उगवू लागले तर अशा साहित्यिकांच्या साहित्याला काय मूल्य असणार? आणि अशांना

विनाकारण आपण चढवले तर त्यांची प्रगती कशी होणार? संगीतात जशी “ सा” घोटवण्यात

वर्षे जातात तेव्हा कुठे सूर लागतो त्याप्रमाणे अनेक वर्षे वाचन केल्यानंतर लेखकालाही सूर

सापडतो.

 

आणि ज्याला सूर सापडला, ज्याचा पाया पक्का

आहे अशा साहित्यिकाची इमारत कधीही डळमळत नाही. अशा परिपक्व साहित्यिकाला

अभिप्राय देतांना हातचे राखून लिहू नये व कच्या

लेखकाला उठसूठ अभिप्राय देऊन चढवू नये.

त्याला हातपाय मारू द्यावे, पेरू द्यावे, त्याची

योग्यता मग आपोआप सिद्ध होते. त्याला कुणीही

आडकाठी आणू शकत नाही.

 

जो कुणी काही रचना लिहितो, ती सर्व दृष्ट्या

श्रेष्ठ आहे का? कि केवळ त्या व्यक्तिला खूष

करून आपला बडेजाव वाढविण्यासाठी आपण

अभिप्राय देतो आहोत का याचे मनाशी आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. अभिप्राय द्यावाच,

नक्कीच द्यावा पण..विचार करूनच.

 

अभिप्राय देणे म्हणजे प्रस्तावना नव्हे कि ज्ञानाचे

प्रदर्शनही नव्हे. आपले ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी अनेक साहित्यप्रकारांचा वापर करून आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवण्याची

संधी नक्कीच आपल्याकडे असते. म्हणून अभिप्राय नेटका व तौलनिक असावा. एखादा

साहित्यप्रकार खूपच वाखाणण्यासारखा असेल

तरच अभिप्राय देणे योग्य असते.उठसूठ अभिप्राय

दिल्याने अभिप्राय व देणाऱ्याची किंमत इतरांच्या

नजरेत कमी होते. तो सवंग लोकप्रियतेचाच एक

प्रकार असतो व अशा बेगडी प्रवृत्तीचा पडदा एक

दिवस फाटतोच. अशाने लेखकाचे व अभिप्राय

देणाऱ्याचेही नुकसान होते.

 

कोणत्याही गोष्टीत शेवटी तारतम्य महत्वाचे असते, ते अगदी कुठेही? संसारात सुद्धा. अर्थात

सुज्ञ लोकांना या गोष्टी सांगाव्या लागत नाहीत.

त्या त्यांच्या अंगवळणीच पडलेल्या असतात.

आणि उत्तम दर्जाची साहित्यकृती नजरेसमोर

आल्याबरोबर आपले हात थांबतच नाहीत, ते

आपोआप अभिप्राय लिहू लागतात, कारण शेवटी

उत्तम ते उत्तमच.. तिथे आरशाची गरजच नसते.

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा