एकाच दगडात दोन पक्षी….

एकाच दगडात दोन पक्षी….

सावंतवाडीत राजेसरकारांनी जागा देण्याचं कबूल करूनही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळ येथे हलविण्याचा शिवसेनेच्या नेत्यांचा डाव…

पडवे येथील नारायण राणेंचे हॉस्पिटलला आणि सावंतवाडीत केसरकरांना शह… एकाच दगडात दोन पक्षी मारून आरोग्याचंही राजकारण…

♦दीपक केसरकर राज्याचे गृहराज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून घेतले होते, तसेच हॉस्पिटल उभारणीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद सुद्धा करून हॉस्पिटलचा मार्ग मोकळा करून घेतला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी सावंतवाडीत नियोजित जागेत भूमिपूजन करून हॉस्पिटल च्या कामास सुरुवात होईल अशी आशा निर्माण झाली होती. परंतु भूमिपूजन होऊनही आजपर्यंत हॉस्पिटल चे काम पुढे सरकले नाही.

♦अलीकडेच खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेत, सावंतवाडी शहरात जागा उपलब्ध न झाल्यास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नेरूर, कुडाळ येथे हलविण्यात येईल असं सांगितलं. परंतु दोनच दिवसात खासदार व पालकमंत्री उदय सामंत यांनी दौऱ्यावर आले असता, वेत्ये (ता.सावंतवाडी) येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सहा एकर जागेत हॉस्पिटल होणार अशी माहिती दिली व जिल्हा प्रशासनास कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना केल्याचं सांगितलं होतं.

♦दीपक केसरकर यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीतच नियोजित जागेत होणार त्यासाठी राजघराण्याशी संवाद साधून जागा देण्याबाबत बोलणी करणार असं सांगितलं. राज घराण्याकडून युवराज लखमराजे भोसलेंनी हॉस्पिटल सारख्या आरोग्याच्या बाबीसाठी आपण जागा देण्यास तयार असल्याचे जाहीर करून हॉस्पिटल स्थलांतराच्या विषयास पूर्णविराम मिळाल्यासारखे वाटत होते.

♦आजच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडीत होणारे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीत किंवा वेत्ये येथे होणार नसून ते कुडाळ येथे करण्याचे शिवसेनेच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आधीच ठरवले असून राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडूनही त्यास दुजोरा देण्यात आला आहे. सावंतवाडीत मंजूर असलेलं हॉस्पिटल कुडाळ येथे नेऊन शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री आरोग्याचंही राजकारण करत असल्याचं दिसून येत आहे. सावंतवाडीतील लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून हॉस्पिटल वेत्ये येथे होणार असं भासवून, सावंतवाडीतील लोकांचा विरोध दाखवून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळ येथे नेण्याचा त्यांचा डाव आहे.

♦पडवे (ता.कुडाळ) येथे नारायण राणे यांचे अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालेले असून मेडिकल कॉलेजलाही मंजुरी मिळाली आहे. असे असताना एकाच तालुक्यात दुसरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करून शिवसेनेचे नेते नारायण राणे यांना कुडाळात अडचणीत आणायचा प्रयत्न करत आहेत, तसेच सावंतवाडीतून हॉस्पिटल कुडाळला नेऊन दीपक केसरकर यांना राजकीय धक्का देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. त्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा शिवसेनेच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.

♦करोडो रुपये खर्ची करून जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे शिवधनुष्य नारायण राणे यांनी पेलले होते. एवढा अवाढव्य खर्च करण्याचं बळ जिल्ह्यातील दुसऱ्या कोणत्याही नेत्यांत नाही तसेच लोकांना कमीतकमी खर्चात सेवा मिळाव्या यासाठी मेडिकल कॉलेजही मंजूर करून घेतलं, आणि येत्या काही दिवसात मेडिकल कॉलेज सुरू सुद्धा होईल आणि जिल्ह्यातून एमबीबीएस डॉक्टर बाहेर पडतील अशी आशा निर्माण झाली आहे. परंतु आरोग्याच्याही प्रश्नात जनतेला वेठीस धरण्याचे काम शिवसेनेचे नेते करत असल्याचं दिसून येत आहे. एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळ तालुक्यात असताना दुसरे सावंतवाडीत मंजूर झालेलं हॉस्पिटल कुडाळात उभारून शिवसेनेचे नेते कोणते ध्येय्य साध्य करणार आहेत हे सुद्धा मोठा प्रश्न आहे.

♦आरोग्याच्या प्रश्नावर सावंतवाडीतील जनतेस वेठीस धरून नारायण राणे व दीपक केसरकर यांना शह देण्यापेक्षाही जनतेच्या आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य द्यावे अशी समस्त सावंतवाडीकर जनतेची इच्छा आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून हॉस्पिटल सावंतवाडीत जागा उपलब्ध असतानाही कुडाळ येथे नेण्याचा प्रयत्न होत असल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा