You are currently viewing सेवाभावी वैद्यकीय प्रवासाचा भावनिक शेवट; डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना सन्मानपूर्वक निरोप

सेवाभावी वैद्यकीय प्रवासाचा भावनिक शेवट; डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना सन्मानपूर्वक निरोप

सेवाभावी वैद्यकीय प्रवासाचा भावनिक शेवट; डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना सन्मानपूर्वक निरोप

३० वर्षांच्या आरोग्यसेवेचा गौरव; दोडामार्ग ते सावंतवाडीपर्यंत रुग्णसेवेत दिले उल्लेखनीय योगदान

सावंतवाडी

“आईच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी डॉक्टर होण्याचा घेतलेला निर्णय आणि पुढे ऊस शेतीत काम करत असताना मिळालेली संधी, यातूनच माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. गेली ३० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी भागात सेवाभावाने रुग्णांची सेवा करता आली, याचे मला परम समाधान आहे,” अशा भावुक शब्दांत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेला गौरवित सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात विशेष निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. ऐवळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
जुन्या आठवणींना उजाळा देताना डॉ. ऐवळे म्हणाले, सावंतवाडीत कार्यरत असताना एका मुलाच्या निधनाच्या दुःखद प्रसंगामुळे जिल्हा सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पत्नीच्या आग्रहामुळे सावंतवाडीतील घर कायम ठेवले आणि पुढे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात रुजू होत एकहाती रुग्णालयाची धुरा सांभाळली. लोकवर्गणीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून देत रुग्णालयाला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला. सर्जन, फिजिशियन आणि स्त्रीरोगतज्ज्ञ अशा विविध भूमिकांतून त्यांनी रुग्णसेवा बजावली.
वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असताना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू, सीटी स्कॅन व डायलिसिस सेंटरसारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात यश मिळाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
या समारंभात क्ष-किरण तंत्रज्ञ शिवाजी देवर्डेकर हेही सेवानिवृत्त झाल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. ऐवळे यांच्या कार्याचा गौरव केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, निवासी अधीक्षक डॉ. सुबोध इंगळे, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, दोडामार्ग उपसभापती गणेशप्रसाद गवस, उबाठा शिवसेना नेते बाबुराव धुरी, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, रुग्ण कल्याण समिती सदस्य देव्या सुर्याजी, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, ॲड. नकुल पार्सेकर, सौ. सीमा मठकर तसेच डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. पंकज पाटील, डॉ. संजय वाळके, डॉ. नित्यानंद मसूरकर, डॉ. संदीप सावंत, डॉ. निखील अवधूत, डॉ. मणेर, सिस्टर राणे यांच्यासह उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा