You are currently viewing कणकवली गणपती साना-जाणवली महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले

कणकवली गणपती साना-जाणवली महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाची कार्यवाही*

कणकवली : कणकवली शहरातील गणपती साना ते जाणवली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे पडलेले मोठमोठे खड्डे अखेर बुजविण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सक्त सूचना दिल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांसह स्थानिक ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे शाळा संस्थेनेही रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याबाबत संबंधित विभागाकडे पत्राद्वारे मागणी केली होती.

दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बांधकाम विभागाने ठेकेदार अनिस नाईक यांना खड्डे बुजविण्याची सूचना केली होती. आज या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले.

खड्डे बुजविण्यात आल्याने वाहनचालक, स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे तसेच बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा