देवगड येथे १७ मे रोजी होणार ‘नाट्य महोत्सव २०२५’ चे उद्घाटन
१८ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ‘नाट्य गौरव पुरस्कार २०२५ ‘ चे वितरण-अॅड. सिद्धेश माणगांवकर, दयानंद पाटील यांची माहिती
देवगड
युथ फोरम, देवगड आयोजित व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश
राणे यांच्या विशेष सहकार्यातून देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या
‘नाट्य महोत्सव २०२५’ चे उद्घाटन १७ मे रोजी सायंकाळी ७ वा. करण्यात येणार आहे. १७ व १८ मे असा दोन
दिवस हा नाट्य महोत्सव रंगणार असून या नाट्य महोत्सवांतर्गत नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ
कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तर नाट्य महोत्सवाच्या पहिल्या पर्वाचे औचित्य साधून १८ मे रोजी
पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते कै. संजय भालचंद्र धुरी स्मृतिप्रित्यर्थ ‘नाट्य गौरव पुरस्कार २०२५’ चे वितरण
करण्यात येणार आहे, अशी माहिती युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर व भाजप युवामोर्चाचे देवगड-
जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांनी दिली.
नाट्य महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून नियोजनाबाबत संयुक्तपणे माहिती देताना अॅड. माणगावकर व श्री.
पाटील म्हणाले, १७ व १८ मे रोजी सायंकाळी ७ वा. देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या पटांगणावर ‘नाट्य महोत्सव
२०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्य महोत्सवांतर्गत विविध विषयांवरील दर्जेदार सहा एकांकिकांची
नाट्य मेजवानी प्रेक्षकांना मिळणार असून यात रत्नागिरी, चिपळूण, कुडाळसह देवगडमधील नाट्य कलाकृतींचा
समावेश आहे. या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन १७ रोजी सायंकाळी ७ वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात
येणार आहे. उद्घाटनप्रसंगी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, जिल्हा
बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. अविनाश माणगांवकर, भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, पडेल मंडल अध्यक्ष
महेश उर्फ बंड्या नारकर, भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम, माजी सभापती रवी पाळेकर, माजी नगराध्यक्ष
योगेश चांदोस्कर, युथ फोरमचे उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमित पारकर, सांस्कृतिक विभागप्रमुख ऋत्विक
धुरी, कार्यक्रम प्रमुख आकाश सकपाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा नाट्य महोत्सव प्रेक्षकांसाठी
विनामूल्य असून सुमारे ५०० हून क्षमतेची आसन व्यवस्था महोत्सवाच्या पटांगणावर ठेवण्यात आली आहे. युथ
फोरम आयोजित नाट्य महोत्सवाचे हे पहिले पर्व असल्याने यावर्षी प्रथमच देवगड येथील सुप्रसिद्ध कलाकार कै.
संजय भालचंद्र धुरी यांच्या स्मरणार्थ नाट्य चळवळीतील एका ज्येष्ठ कलाकाराला ‘नाट्य गौरव पुरस्कार २०२५ ‘
देण्याचा निर्णय संस्थेने घेतला असून या पुरस्काराचे वितरण १८ मे रोजी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार
आहे. तसेच दोन दिवशीय नाट्य महोत्सवात ज्येष्ठ कलाकारांचा विशेष सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात
येणार आहे. देवगडातील नाट्य चळवळीला ऊर्जितावस्था निर्माण करून देण्यासाठी युथ फोरम- देवगड या संस्थेने
पुढाकार घेतला असून यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांचे विशेष सहकार्य संस्थेला लाभले आहे. त्यामुळे हा नाट्य
महोत्सव यशस्वी होण्यासाठी व नाट्य चळवळीत रसिक प्रेक्षक या नात्याने सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी या नाट्य
महोत्सवाचा प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अॅड. माणगांवकर व श्री. पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.